--------
पुन्हा घेतले
निष्पाप प्राण
-------
पंढरपूर : ऊसाच्या वाहतुकीने पंढरपूर तालुक्यात आणखी दोन चिमुकल्यांचे बळी घेतले असून सख्या बहिण भावाला या अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत.
उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर म्हणजे रस्त्यावरच्या निष्पाप माणसांचे प्राण नेण्यासाठी आलेले यमदूताचं आहेत हे आता नक्की झालेले आहे आणि या यमदूतांना आवर घालण्याची इच्छा अथवा धमक कुणाच्यातच नाही असे वारंवार अनुभवाला येऊ लागले आहे. साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरु झाले की कित्यकांचे प्राण या वाहनासाठीच आरक्षित असतात की काय असे वाटू लागले आहे. या वर्षीच्या गळीत हंगामाला सुरुवात झाल्यापासून पंढरपूरच्या आजूबाजूचा रस्त्यावर बेलगाम ट्रॅक्टरने कित्येकांचे प्राण घेतले आहेत आणि अजूनही त्यांचे समाधान झाले नाही की काय म्हणून चिमुकल्या सख्य्ख्या भाऊ बहिणीच्या जीवावर हे उठले आणि कोवळ्या कळ्या फुलण्यापूर्वीच खुडून नेण्यात आल्या.
पंढरपूर - नातेपुते मार्गावर एका ट्रॅक्टरने दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन चिमुकल्यांचा बळी गेला आणि ट्रॅक्टरने घेतलेल्या जिवात आणखी दोन प्राणांची भर पडली. माढा तालुक्यातील बावी येथील मयूर औदुंबर मोरे हे फलटण येथे नोकरीस आहेत. त्यांना परगावी जायचे असल्यामुळे रुद्र आणि त्रिशा या आपल्या दोन मुलांना गावी आजीजवळ सोडल्याचे होते. मुलांना सोडण्यासाठीच ते आपल्या बावी या गावी फलटण येथून दुचाकीवर निघाले होते. ते आपल्या दोन चिमुकल्यांचे घेऊन पिराची कुरोली जवळ आले असता अचानक एक ट्रॅक्टर भरधाव वेगाने आला आणि सरळ या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघेही दूर फेकले गेले आणि रस्त्यावर पडले. यात मुलगा रुद्र मयूर मोरे हा जागीच मृत्युमुखी पडला.
धडकेने उडून पडल्यानंतर मुलगी त्रिशा आणि तिचे वडील मयूर मोरे हे जखमी झाले. रस्त्यावर पडल्यानेही त्यांना जोराचा मार लागलेला होता. मुलगी त्रिशा हिला तर खूपच मार लागलेला होता. या दोन्ही जखमींना तातडीने अकलूज येथे उपचारासाठी हलविण्यात आले. अकलूज येथे प्रथमोपचार करून त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते पण उपचार सुरु असताना तिसऱ्या दिवशी चिमुकली मुलगी त्रिशा हिने देखील अखेरचा श्वास घेतला. या अपघातात एकूण दोघांचा, सख्य्ख्या भाऊ बहिणींचा बळी गेल्याने बावी गावावर शोककळा पसरली.
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाने अपघात केला की आता लोकांचा संताप अनावर होऊ लागला आहे. अत्यंत बेपर्वाईने ट्रॅक्टर चाललेले जनतेला रोज विविध रस्त्यावर पाहायला मिळत असतात. कर्णकर्कश गाणी वाजवत निघालेल्या ट्रॅक्टर चालकाचे लक्ष आजूबाजूला आजिबात नसते आणि पाठीमागून येणाऱ्या वाहनांची याना जाणीवही होत नसते. क्षमतेपेक्षा अधिक ऊंस भरून एकापेक्षा अनेक ट्रॉली लावून आपल्याच धुंदीत ही वाहने धावत असतात. त्यांच्या नागमोडी धावण्यामुळे याना कुणाच्याही जीवाची पर्वा नसते हे स्पष्टपणे रस्त्यारस्त्यावर पाहायला मिळत असते. रस्ता आपल्याच पिताश्रींच्या मालकीचा समजून रस्त्यात कुठेही आणि कशाही पद्धतीने ट्रॅक्टर उभा केला असतो आणि यातच अपघाताला निमंत्रण मिळते. रात्रीच्या वेळेलाही रस्त्याच्या मध्येच उसाने भरलेल्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर कसेही उन्हे असतात त्यामुळे आजवर अनेक अपघात करून अनेक जीव घेतले गेले आहेत. रस्त्यावरून धावतानाही हे जणू कुणाचा तरी जीव घेण्यासाठीच निघाले आहेत अशा पद्धतीने ट्रॅक्टर चालवत असतात. अशाच वाहतुकीने एका कुटुंबातील दोन दिवे विझविण्याचे पातक केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !