आपल्याच तेराव्याला
आपलीच उपस्थिती !
अमरावती : आपल्या मृत्युपुर्वी आपलाच तेरावा करण्याचा कार्यक्रम निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने अखेर पार पाडला आणि यासाठी अनेक मित्र, नातेवाईक यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती देखील लावली !
आपल्याच तेराव्याला आपलीच उपस्थिती, ज्याचा तेरावा तेच स्वागताला हजर ... जिवंतपणी आपल्याच तेराव्याला आलेले लोक पाहून ते सुखावले होते, त्यांनी मस्त गप्पाटप्पा मारल्या आणि आपल्याच तेराव्याच्या भोजनाचा आस्वाद त्यांनी घेतला ... खरंच, जीना इसी का नाम है ...!
माणसांच्या मृत्युनंतर वेगवेगळे विधी केले जातात त्यात तेरावा एक असतो. आपली अंत्ययात्रा जशी कुणालाच पाहायला मिळत नाही तसे आपल्याच तेराव्याच्या विधीला आपण कधीच हजर राहू शकत नाही. असे असले तरी अमरावती जिल्हातील एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाने स्वतःच असा एक कार्यक्रम आयोजित केला आणि त्यासाठी त्यानीं आपले मित्र, नातेवाईक यांना जेवणासाठी निमंत्रणही पाठवले आणि ठरल्याप्रमाणे आपल्याच तेराव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आनंद देखील या निवृत्त अधिकाऱ्याने मिळवला.
पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करणारे सुखदेव डबराले हे साडे पाच वर्षांपूर्वी बुलढाणा येथून निवृत्त झाले. त्यांनी आता आपल्याच तेराव्याच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापली आणि त्यांनी ती वितरितही केली. आज ३१ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता आपल्या घरीच त्यांनी तेराव्याचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांच्या तेराव्याचे भोजन त्यांच्यासह त्यांचे मित्र आणि नतेवाइकनीही घेतले. अमरावती शहरात रहाटगाव येथे डबराले रहात आहेत. त्यांना एक मुलगाही असून तो मुंबईत बॉक्सिंग कोच आहे तर त्यांची मुलगी पोलीस उपनिरीक्षक म्हणून लवकरच रुजू होणार आहे. निवृत्त पोलीस उप निरीक्षक डबराले यांची प्रकृती उत्तम असून ते दररोज व्यायामही करतात. त्यांची मानसिक स्थिती व्यवस्थित आहे. अशा परिस्थितीत त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
त्यांच्या तेराव्याची निमंत्रण पत्रिका घेऊन ते स्वतः निमंत्रण देण्यास आलेले पाहून अनेकांची बोबडी वळाली पण कुणाला काही बोलता आले नाही. काय बोलावं हेच अनेकांना सुचत नव्हतं. डबराले यांचे हे नियोजन आणि कार्यक्रमाचे निमंत्रण पाहून अनेकांची अवस्था विचित्र होऊन बसली होती. माणूस जिवंत असताना त्याचा तेरावा कसा ? आणि त्यांनी केला तरी अशा कार्यक्रमाला जायचे तरी कसे ? कुणाच्या जिवंतपणी त्याच्या तेराव्याचे भोजन करायचे तरी कसे ? असे अनेक प्रश्न उभे राहिले असले तरी आज ३१ डिसेंबर रोजी हा कार्यक्रम विनाव्यत्यय संपन्न झाला आणि त्यासाठी त्यांचे सगे सोयरे आवर्जून उपस्थित राहिले. मित्र परिवारही मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि हे पाहून डबराले संतुष्ठ झाले.
डबराले यांनी या कार्यक्रमाबाबत मोकळेपणे खुलासाही केला आहे. ते म्हणतात, " माणसांच्या जीवनाची शाश्वती नाही म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आपण सेवेतून निवृत्त होऊन साडे पाच वर्षे झाली आहेत. सेवानिवृत्त झालेले अनेकजण दीड दोन वर्षात अखेरचा श्वास घेतात. मी मात्र निवृत्ती वेतनाचा आनंद घेत आहे. आयुष्याचा पुरेपूर आनंद आपणा लुटलेला असून आता कुठल्याही क्षणी मृत्यू आला तर त्याचे आनंदाने स्वागत करण्याची आपली तयारी आहे. मरण कधीही येऊ शकते, त्यामुळे जुने मित्र, दुरावलेले नातेवाईक या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र यावेत यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. "
निवृत्त पोलीस उप निरीक्षक सुखदेव डबराले यांनी जरी स्वतःच्या आनंदासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असला तरी त्यांच्या कुटुंबियांना मात्र वेदना होणे स्वाभाविक आहे. त्यांच्या पत्नीही या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे दुखावलेल्या आहेत तर पोलीस खात्यात असलेल्या त्यांच्या मोठ्या मुलीनेही विरोध दाखवला. त्यांची लहान मुलगी आणि जावई यांनी मात्र पाठींबा दर्शविला. ज्यांना ज्यांना त्यांनी निमंत्रित केले त्यांची मात्र पंचाईत झाली होती. या कार्यक्रमाला जावे की नको असा विचार करीत करीत जवळपास सगळेच या तेराविला उपस्थित राहिले आणि सुखदेव भाराऊन गेले.! 'याचसाठी केला होता अट्टाहास' असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. आलेल्या मित्रमंडळीचे आणि पाहुण्यांचे ते हसतमुखाने स्वागत करीत होते, सर्वांशी मनमोकळे बोलत होते आणि इतरांची खुशालीही विचारत होते. आलेल्यांची पंचाईत होत होती पण सुखराम मस्त सुखात होते. त्यांनी सर्वाना जेवायला बसवले आणि आपल्याच तेराव्याचे जेवण घेऊन तेही तृप्त झाले !
एवढं सगळं काही ठिकठाक असताना आपल्याच हयातीत आपलाच तेरावा कुणी घालेल काय ? असा प्रश्न कुणी विचारला तर तो स्वाभाविक आहे पण प्रत्येकाचे लॉजिक काही वेगळे असते, विचार वेगळे असतात आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही वेगवेगळा असतो. प्रचलित पद्धतीपेक्षा कुणी काही वेगळे करू लागले तर त्याची चर्चा तर होणारच ! पण हे अधिकारी म्हणतात , ' मृत्यू कुणाच्या हाती नाही आणि तो केंव्हा येईल हे देखील निश्चित नाही, मृत्युनंतर सर्व लोक अंत्यसंस्कार करण्यासाठी जमतात पण आपल्या अंत्यसंस्कारास आलेले लोक पाहायला आपणच नसतो. म्हणून मित्र आणि नातेवाईक यांच्यासोबत मस्त गप्पा मारून मरायचं हा विचार करूनच ३१ डिसेंबर रोजी आपण आपल्याच तेरावीचा कार्यक्रम आयोजित केला होता !'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !