BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ डिसें, २०२१

पंढरपूरचा पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच !

 


सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला असलेल्या पंढरपूर मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादीचाच आमदार होणार असून एका सर्व्हेत हा निष्कर्ष समोर आला आहे. 


पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मजबूत बालेकिल्ला असून तालुक्यात आजही राष्ट्रवादीचे वातावरण आहे. दिवंगत आमदार भारतनाना भालके यांनी तर इतर कुणालाही डोके वर काढू दिले नव्हते पण सहानुभूतीचे वातावरण असतानाही भगीरथ भालके यांना निसटता पराभव पत्करावा लागला. या पराभवास विरोधक नव्हे तर अंतर्गत कलह जबाबदार होता हे आता सर्वसामान्य माणसाला कळून चुकले आहे. राष्ट्रवादीत अंतर्गत वाद ऐन निवडणुकीत उफाळून आला आणि वरिष्ठ पातळीवरील नेत्यांना हा वाद मिटविण्यात अपयश आल्याचे निकालाने सांगितले. पक्षाचा पराभव होऊनही स्थानिक दुही कमी झाली नसून वाढच झाली आहे त्यामुळे आता तरी पक्षाला ठोस भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली असून स्वत:ला पक्षापेक्षा मोठे समजणाऱ्याना बाहेरचा रस्ता दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. पक्षाने वेळीच पोस्टमार्टम केले नाही तर मात्र पक्षाची अवस्था स्थानिक पातळीवर कठीण होणार आहे. 


विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेले भाजप आमदार समाधान आवताडे यांच्याविषयी अल्पकाळात जनतेत नाराजी निर्माण झालेली असून त्यांना निवडून दिल्याबाद्धल मतदार आता उघडपणे पश्चाताप व्यक्त करीत आहेत. त्यातच 'दैनिक सकाळ' आणि 'साम टी व्ही' यांनी केलेल्या महासर्व्हेत पंढरपूर मतदार संघात राष्टवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारास विजय मिळणार असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. आज या मतदारसंघात निवडणूक झाली आणि राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत झाल्यास राष्टवादीचा उमेदवार विजयी होईल असा निष्कर्ष या सर्व्हेने काढला आहे. सकाळ आणि साम ही दोन्ही माध्यमे प्रचंड विश्वासार्ह आहेत त्यामुळे या निष्कर्षावर जनतेचाही विश्वास आहे. 


सोलापूर जिल्ह्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाल्यास जिल्ह्यातील अकरा जागांपैकी सात जागांवर महाविकास आघाडी विजयी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात करमाळा, बार्शी, मोहोळ, माढा, सोलापूर शहर मध्य, पंढरपूर आणि सांगोला या मतदार संघाचा समावेश आहे. अक्कलकोट, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर दक्षिण आणि माळशिरस या चार ठिकाणी भाजप अनुकुलता दाखविण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात आता निवडणुका झाल्यास भाजपचे पाच आमदार निवडून येतील असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीचे चार उमेदवार निवडून येतील असे सांगण्यात आले आहे, यात पंढरपूर, मोहोळ, करमाळा आणि माढा मतदारसंघाचा समावेश आहे. शिवसेनेच्या वाट्याला जिल्ह्यात फारसे काही मिळणार नसून केवळ सांगोला येथे शिवसेनेचा उमेदवार विजयी होईल तर काँग्रेस पक्षाचा उमेदवार सोलापूर शहर मध्य मतदार संघात विजयी होईल असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 


सदर महासर्व्हे अत्यंत बारकाईने आणि अभ्यासपूर्ण रीतीने करण्यात आला असून महाविकास आघाडी सोलापूर जिल्ह्यात आघाडीवर राहणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात अपघाताने भाजप उमेदवार निवडून आला असला तरी आता पुढच्या वेळेस हे चित्र दिसणे शक्य दिसत नाही. राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करून समाधान आवताडे पोटनिवडणुकीत थोडक्या मतांनी विजयी झाले होते, त्यांना भविष्यासाठी ही चांगली संधी होती परंतु अत्यंत कमी कालावधीत ते जनतेच्या मनातून उतरले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावर आता या महासर्व्हेने शिक्कामोर्तब केले आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !