BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ डिसें, २०२१

सावधान ... विना परवाना वाहन चालवाल तर होईल दहा हजाराचा दंड !

 




मुंबई : वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास आता खिसा रिकामा करावा लागणार असून शासनाने नवा आदेश काढला असून चालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसेल तर दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. 

प्रत्येक शहरातील रस्त्यावरील वाहने आणि वाहतूक अमर्याद वाढलेली आहे, अत्यंत बेशिस्तपणे वाहने चालवली जातात आणि वाहतुकीच्या नियमांना सर्रास डावलले जाते, परिणामी अपघाताचे प्रमाण देखील वाढलेले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी शासनाने आता कठोर निर्णय घातला आहे. पाचशे रुपयांपासून दहा हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली असून १ डिसेंबर पासून याची अमलबजावणी सुरु झाली आहे. 

केंद्राच्या रस्ते व वाहतूक विभागाने २०१६ साली मोटार वाहन कायद्यात दंड वाढ करण्याचा एक प्रस्ताव सादर केला होता. केंद्र सरकारने २०१९ साली याबाबत संसदेत कायदा केला होता पण हा कायदा महाराष्ट्र शासनाने स्वीकारला नव्हता. या कायद्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास आकारल्या जाणाऱ्या दंडाची रक्कम अधिक असून ती कमी करण्यात यावी असा प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठवला होता पण केंद्राने या कायद्यात अथवा आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत कपात करण्यास नकार दिला होता. शेवटी महाराष्ट्र सरकारने १ डिसेंबरपासून राज्यात हा कायदा लागू केला आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारने एक शासन निर्णयही काढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता या नव्या दंडाची आकारणी सुरु झाली आहे. 

वाहन चालविण्याच्या परवान्याशिवाय वाहन चालविल्यास आता दहा हजार रुपयांचा दंड आकाराला जाणार आहे तर मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविल्यास पाच हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.  हेल्मेटशिवाय दुचाकी चालविल्यास पाचशे रुपये दंड आणि दुसऱ्यांदा हे उल्लंघन केले तर एक हजार पाचशे रुपये दंड केला जाणार आहे. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणेही आता महागात पडणार असून यासाठी पाचशे रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. दुचाकीवरून तिघांनी प्रवास केल्यास एक हजार रुपये,  अनावश्यक हॉर्न वाजविल्यास एक हजार रुपये, फॅन्सी नंबरप्लेट अथवा नियमबाह्य पद्धतीने बनवलेली नंबरप्लेट वाहनास लावल्यास पहिल्या वेळेस पाचशे रुपये आणि नंतर प्रत्येक वेळेस दीड हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे. 

'नो पार्किंग' क्षेत्रात वाहन उभे केल्यास पाचशे रुपये, धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्यास दुचाकीसाठी एक हजार तर चार चाकी वाहनासाठी दोन हजार रुपये, मर्यादा ओलांडून वेगाने वाहन चालविले तर पाच हजार आणि परवान्याशिवाय वाहन चालवले तर दहा हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.  वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास आता मोठा फटका बसणार असून वाढलेल्या दंडामुळे वाहतुकीत शिस्त लागण्याची अपेक्षा आहे. एकीकडे वाहतुकीला शिस्त लागण्याची अपेक्षा असली तरी दुसरीकडे पोलिसांची चिरीमिरी वाढण्याचाही यात मोठा धोका आहे.  महाराष्ट्रात हा नवा वाहतूक नियमांचा कायदा लागू करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी देखील सुरु झाली  आहे.  

अलीकडील काळात सगळीकडेच अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे, पूर्वी देशभरात रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट होती. यावेळी रस्त्यावर अधिक खड्डे होते म्हणून अपघात होत होते. आता देशभरात गुळगुळीत रस्ते तयार करण्यात आले आहेत. अरुंद रस्त्यांचे मोठे रस्ते झाले आहेत तर डांबरी रस्त्याची जागा आता सिमेंटच्या रस्त्यांनी घेतली आहे. रस्त्यावरील वाहतूक आणि  वाहने यांच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे. रस्ते रुंद होऊनही अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे शिवाय अत्यंत बेफिकीरपणे वाहने चालविणाऱ्या चालकांची मानसिकता बदलायला तयार नाही. प्रत्येकजण प्रचंड घाईत आणि वेगात आहे. त्याचा परिणाम म्हणून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि स्वतःसह इतरांच्या जीविताला सतत धोका निर्माण केला जात आहे. अशा वाहन चालकाला शिस्त लागणे आवश्यक असून त्यासाठी नवनवे कायदे आणि नियम केले जात आहेत. आता नव्याने लागू केल्या जात असलेल्या कायद्यामुळे वाहतुकीला शिस्त लागेल आणि अपघाताचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा आहे.        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !