BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ डिसें, २०२१

पंढरपूरकडे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीला अपघात !

 


उस्मानाबाद : देवदर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या गाडीला झालेल्या अपघातात एक जण ठार तर ११ भाविक जखमी झाले असल्याची दुर्दैवी घटना बार्शी रोड पुलावर घडली आहे.  

चांगले रस्ते हे मृत्यूचे महामार्ग ठरत असल्याचे आज पुन्हा एकदा समोर आले असून पंढरपूरकडे देवाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना पंढरपुरात पोहोचण्याआधीच एका मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. रस्ते चांगले झाल्याने वेगावर नियंत्रण उरले नाही आणि त्यातून सातत्याने अपघाताच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. जालना येथून निघालेल्या भाविकांना तुळजापूर - सोलापूर मार्गावरील बार्शी पुलावर येथेच मोठ्या अपघातांचा सामना करावा लागला आहे. 

जालना जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अकरा जण आणि घनसांगावी येथील एक जण असे बारा भाविक पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेले होते. पंढरपूर येथे पोहोचण्यापूर्वी त्यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्याचे ठरवले आणि त्यांची क्रुझर (एम एच ३१ / व्ही ३२८१) शहराकडे वळण घेत असतानाच हा अपघात झाला. एक अज्ञात वाहनाने भाविकांच्या क्रुझर गाडीस पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एक भाविक जागीच ठार झाला तर अन्य अकरा भाविक गंभीररित्या जखमी झाले आहे. या जखमींना उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या या भाविकांनी वाटेत तुळजाभवानी मातेचे दर्शन होईल म्हणून तसे नियोजन केले पण बार्शी रोड पुलावर त्यांच्या गाडीला जोराची धडक देऊन अज्ञात वाहन पळून गेले. अत्यंत वेगाने ही धडक दिली गेल्याने एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य ११ भाविकांना जखमी व्हावे लागले. या क्रुझरमधील सर्व भाविक तरुण वयाचे आहेत. अपघाताची माहिती मिळताच तुळजापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी धावले. तुळजापूर येथे प्राथमिक उपचार करून जखमींना उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमीतील अनेकांना या अपघातात जबर मार लागला आहे. 

सदर अपघात करून पळून गेलेल्या वाहनाच्या चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा शोध पोलीस घेत आहेत. गेल्या काही काळात भाविकांच्या वाहनांना अनेक अपघात झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच अक्कलकोट - सोलापूर रस्त्यावर भाविकांच्या गाडीचा टायर फुटून मोठा अपघात झाला होता. देवदर्शनाला जाताना अनेक भाविक मिळून प्रवासाला निघतात आणि वाहनात क्षमतेपेक्षा अधिक लोक बसलेले असतात. वाहनाचे भाडे परवडावे म्हणून अनेक भाविक एकत्र येऊन देवदर्शनाला निघतात शिवाय चालकाला विश्रांती नसताना वाहन चालविण्यास भाग पाडले जाते. अशा प्रकारातूनही अनेक अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे. 

राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत, काही कामे अर्धवट असून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहन चालकाच्या ते लक्षात येत नाही आणि लक्षात येते तेंव्हा वाहनावर नियंत्रण करणे त्याच्या आवाक्याबाहेर गेलेले असते आणि अपघात होत आहेत. ठेकेदार अर्धवट काम सोडून जात असतो अशावेळी रस्त्यावरील वाहनांना पुढील धोक्याची सूचनाही मिळत नाही. रस्त्याचे काम पूर्ण झाले तरी मातीचे ढीग तसेच रस्त्यावर असतात यातूनही अपघात घडत आहेत. प्रशासनाने अशा प्रकारावर गंभीरपणे लक्ष दिल्यास अपघाताचे प्रमाण काही अंशी तरी कमी होऊ शकते.     


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !