BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ डिसें, २०२१

मनोरंजन : प्रवास विनाेदी चित्रपटांचा !

 


प्रवास विनाेदी चित्रपटांचा !


थकल्या भागल्या जिवाची खऱ्या अर्थानं करमणूक करताे ताे विनाेदी चित्रपट! माणसांच्या आयुष्यात विनाेदाला आणि पर्यायाने विनाेदी चित्रपटाला वेगळं महत्व आहे. मुकपटापासून अगदी आजपर्यंतही चित्रपटातील विनाेदाचं स्थान कायम राहीलं आहे. मराठी चित्रपटात तर तमाशापटाची लाट ओसरली आणि विनाेदाचा अखंड झरा वहातच राहीला. तमाशापटाचा जमाना संपत आला तेंव्हा मराठी चित्रपटाचं काय हाेणार हा प्रश्न सर्वांनाच पडलेला हाेता परंतु सचिन, अशाेक सराफ, महेश काेठारे, लक्ष्मीकांत बेर्डे अशा कलावंतांच्या विनाेदी चित्रपटाची एक लाट उसळली आणि मराठी चित्रपटाला चैतन्य प्राप्त झालं. चित्रपटांची भाषा काेणतीही असली तरी त्यात विनाेदाला तेवढंच महत्वाचं स्थान हाेतं. स्वातत्र्यपूर्व काळापासून चित्रपटांत विनाेदाला विशेष महत्व असून विनाेदासाठी अनेक कलावंत उदयास आले. काही विनाेदी नटांच्या जाेड्याही जमल्या. मा.भगवान, जाॅनी वाॅकर, मेहमूद अशी काही नावं विनाेदी अंगानंच पुढं आली. दामुआण्णा मालवणकर, राजा गाेसावी, शरद तळवलकर  असेही विनाेदी अभिनेते हाेऊन गेले. दादा काेंडके यांनी तर आपलं विनाेदी विश्व साकारलं आणि अजरामरही केलं. 

विनाेदी चित्रपटाचा प्रवास तसा मुकपटापासूनच आलेला आहे. चार्ली चॅपलीन,लाॅरेल हार्डी, हेराॅल्ड लाॅईड, बस्टर किटन अशा त्याकाळच्या विनाेदी नटांचे चित्रपट संपूर्ण भारतात लाेकप्रिय झालेले हाेते. भारतात मात्र असा संपूर्ण विनाेदी चित्रपट म्हणून क्वचितच चित्रपट पडद्यावर आले. प्रभात कंपनीने त्या काळी ‘राणीसाहेब’ हा विनाेदी मुकपट काढला हाेता आणि ताे चांगला गाजलाही! मुकपटाच्या जमान्यात आणि त्यानंतरही उपकथानकाची जाेड देऊन विनाेदी व्यक्तीरेखा साकारल्या जात हाेत्या. पहिला विनाेदी हिंदी बाेलपट म्हणून ‘चार चक्रम’ या चित्रपटाला ओळखलं जातं. १९३२ साली हा चित्रपट निघाला हाेता. याच साली निघालेल्या ‘झरीना’ या चित्रपटातून नूर महंमद चार्ली हा विनाेदी नट प्रकाशात आला. या नूर चार्लीची मुख्य भूमिका असलेला ‘पागल प्रेमी’ हा चित्रपट १९३३ साली आला पण ताे आपटला. १९४१ सालीही चार्लीचा ‘ढंढाेरा’ हा संपूर्ण विनाेदी चित्रपट आला पण त्यालाही अपेक्षित यश मिळालं नाही.


मुका चित्रपट बाेलायला लागला तेंव्हाच्या दहा वर्षात सागर मुव्हीटाेनने अनेक विनाेदी चित्रपटाची निर्मिती केली. यात माेतीलाल आणि शाेभना समर्थ यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘बेखराब जन’ हा हिंदी आणि गुजराथी भाषेतला चित्रपट चर्चेचा ठरला हाेता. ‘तिनसाै दिनके बाद’ (१९३८), ‘लेडिज ओन्ली’(१९३९) हे चित्रपटही संपूर्ण विनाेदी हाेते. ‘तीन साै दिन के बाद’ या चित्रपटातील माेतीलाल यांची भूमिका विशेष गाजली आणि याच चित्रपटाच्या कथेवर आधारित देव आनंद आणि साधना यांना घेऊन हृषिकेश मुखर्जी यांनी ‘असली नकली’ हा चित्रपट निर्माण केला पण त्याला मात्र हवे तसे यश मिळाले नाही. बाँबे टाॅकीजने ९ रिळांचा ‘मियाँबीबी’ हा विनाेदी चित्रपट काढला हाेता आणि त्याच्या जाेडीला ४ रिळांचा ‘ममता’ हा रडका चित्रपटही काढला हाेता. एकाच वेळी हे दाेन्ही चित्रपट दाखविले जात हाेते. दाेन्ही प्रकारचे प्रेक्षक मिळतील असे त्यांना वाटले हाेते पण त्यांचा हा प्रयत्न मात्र फसला. याच काळात कलकत्ता येथील मादन थिएटरर्सने ‘ताेफ का गाेला’ हा संपूर्ण विनाेदी चित्रपट काढला पण ताे चालू शकला नाही.फार्सिकल धाटणीचे हे विनाेदी चित्रपट हाेते पण माेतीलाल यांच्या विनाेदी चित्रपटात मात्र विनाेदाच्या सर्व प्रकारांना स्पर्श करण्यात येत हाेता. 


मराठी विनाेदी चित्रपटांचीही सुरूवातीला अशीच काहीशी अवस्था झाली हाेती. भट बेडेकर यांनी ‘सत्याचे प्रयाेग’ आणि ‘ठकीचे लग्न’ असे दाेन विनाेदी चित्रपट काढून विनाेदी मराठी चित्रपटांची सुरूवात केली. ‘ठकीचे लग्न’ हा चित्रपट तर राम गणेश गडकरी यांच्या गाजलेल्या कथेवर आधारित हाेता. ‘सत्याचे प्रयाेग’ या चित्रपटाची लांबी ६ हजार २२१ फुटांची हाेती आणि ‘ठकीचे लग्न’ ची लांबी ४ हजार ७१०फुट हाेती. हे दाेन्ही चित्रपट एकाच वेळी  दाखविले जात हाेते आणि या दाेन्ही चित्रपटात दामुआण्णा मालवणकरांचीच मुख्य भूमिका हाेती. मराठी चित्रपटात करण्यात आलेला हा नवा प्रयाेग चालला नाही त्यामुळे मालवणकरांच्या विनाेदी भूमिकांचा ठसा उमटला नाही. पहिले मराठी विनाेदी नट म्हणून मात्र दामुआण्णांची ओळख निर्माण झाली. मराठी चित्रपटात अत्रे आणि मा.विनायक यांचाही काळ नंतर आला आणि अत्र्यांच्या ‘प्रेमवीर’ या विनाेदी चित्रपटाला मात्र चांगले यश मिळाले. त्यानंतर आचार्य अत्रे आणि मा.विनायक यांनी मिळून ‘धर्मवीर’, ‘ब्रह्मचारी’, ‘ब्रँडीची बाटली’, ‘अर्धांगी’ असे एकामागून एक चित्रपट निर्माण केले. या सामाजिक विनाेदी चित्रपटांना यश मिळालेच परंतू त्यातील ‘ब्रह्मचारी’फारच गाजला आणि मा. विनायक हे देखील दामुआण्णासारखेच उत्तम विनाेदी नट आहेत हे प्रेक्षकांसमाेर आले. अत्रे आणि मा. विनायक यांची जाेडी फुटल्यानंतरही अत्र्यांनी ‘लपंडाव’, ‘पायाची दासी’, ‘घरजावई’, ‘ब्रह्मघाेटाळा’, ‘माेरूची मावशी’ यासारखे विनाेदी चित्रपट प्रेक्षकांना दिले. ‘संशयकल्लाेळ’ हे नाटक त्याकाळी आणि नंतरही गाजत राहीलं आहे, या नाटकावरच ‘तस्वीर’ हा चित्रपट काढण्यात आला हाेता.


 मा.विनायकांनीही ‘लग्न पहावं करून’ आणि ‘सरकारी पाहुणे’ हे विनाेदी चित्रपट निर्माण केले.  याच काळात विश्राम बेडेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘पहिला पाळणा’ हा चित्रपट आला. शांता हुबळीकर, बाबूराव पेंढारकरांच्या मुख्य भूमिका या चित्रपटात हाेत्या तर दिनकर कामण्णा आणि कुसुम देशपांडे यांच्या विनाेदी भूमिका हाेत्या. या चित्रपटातील सर्व विनाेद हे प्रसंगनिष्ठ असल्याने विनाेदी नटांची आवश्यकता भासली नाही. दिनकर कामण्णा आणि कुसुम देशपांडे यांची मुख्य भूमिका असलेला ‘नारद नारदी’ हा पाैराणिक ढाच्याचा विनाेदी चित्रपट चांगलाच गाजला आणि याच सुमारास म्हणजे १९४१- ४२ च्या काळात ‘म्युनिसीपालीटी’, ‘किती हसाल’ हे दाेन विनाेदी चित्रपट आले परंतु त्यातील संवाद हे डबल मिनिंगचे असल्यामुळे हे दाेन्ही चित्रपट त्या काळात चालले नाहीत. या काळातील मराठी विनाेदी चित्रपटांच्या हिंदी आवृत्याही निघाल्या पण महाराष्ट्राबाहेर या चित्रपटांकडे प्रेक्षक फिरकला नव्हता.


मा.विनायक यांच्या निधनानंतर मात्र विनाेदी मराठी चित्रपटांचं युग संपल्यासारखंच झालं. अत्रे यांनीही  ‘शामची आई’, ‘ज्याेतिबा फुले’ असे भावनाप्रधान आणि सामाजिक समस्यांवर आधारित चित्रपट निर्माण केले. विनाेदी मराठी चित्रपटाच्या युगाचा अस्त हाेताेय असं वाटत असतानाच राजा परांजपे यांनी पुन्हा मराठी विनाेदी चित्रपटांना बहार आणली. राजा परांजपे यांचा ‘पेडगावचे शहाणे’ हा विनाेदी चित्रपट खूपच गाजला. आजही या चित्रपटाला मराठी प्रेक्षकांत ओळख आहे. याच चित्रपटावर त्यांनी ‘चाचा चाैधरी’ हा हिंदी चित्रपट बनवला पण ताे अपयशी ठरला. हिंदी प्रेक्षकांना विनाेदी चित्रपट आवडत नाहीत असा समज हाेऊ लागला हाेता परंतु याच काळात हिंदीत अनेक विनाेदी चित्रपटही आले आणि ते चांगले चाललेही. विशेष म्हणजे हे सगळे हिंदी चित्रपट मुंबईतच तयार झालेले हाेते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात प्रसंगनिष्ठ विनाेदाचा ‘पगडी’ हा चित्रपट चांगलाच गाजला हाेता. आय.एस.जाेहर यांनी हिंदीतील विनाेदी चित्रपटात चांगलीच आघाडी घेतली. त्यांच्या ‘एक थी लडकी’ ला घवघवीत यश मिळाले. ‘श्रीमतीजी’, ‘हम सब चाेर है’, ‘बेवकू\’, ‘जाेहर मेहमूद इन गाेवा’, ‘जाेहर मेहमूद इन हाँगकाँग’ असे चित्रपट चांगलेच यशस्वी झाले. मेहमूद, जाॅनी वाॅकर, किशाेरकुमार यांनीही विनाेदी चित्रपट गाजवले आणि हिंदी भाषेतही विनाेदी चित्रपटांचा आपला वेगळा प्रेक्षक तयार केला. किशाेरकुमार आणि मेहमूद यांनी विनाेदी चित्रपटांचा एक जमाना जाेरदार गाजवला. ‘प्यार किये जा’, ‘पडाेसन’ तसेच किशाेरकुमारची प्रमुख भूमिका असलेले ‘न्यू दिल्ली’, ‘चलती का नाम गाडी’ असे अनेक विनाेदी चित्रपट हिट ठरले. मेहमूदनेही विनाेदी भूमिकात आपलं नाव अजरामर केलं. ‘छाेटी बहन’ या चित्रपटातून मेहमूद प्रथम विनाेदी नट म्हणून यशस्वी झाला आणि पुढे त्याची ही इमेज कायम राहीली. दुय्यम विनाेदी नट म्हणून काम करता करताच ताे निर्माता आणि दिग्दर्शक बनला. ‘कुवाँरा बाप’, ‘दाे फूल’, ‘सबसे बडा रूपैय्या’, ‘बाँबे टू गाेवा’ अशा कितीतरी विनाेदी आणि यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली. मेहमूद यांचे चित्रपट आणि विनाेदी भूमिका आजही प्रेक्षकांच्या डाेळयासमाेर आहेत.


जाॅनी वाॅकर, देवेन वर्मा, जगदीप, असरानी अशा अनेक कलावंतांनी हिंदीतील विनाेदी चित्रपट यशस्वी केले. बासु चटर्जी, गुलझार, हृषिकेश मुखर्जी यांनीही हिंदी विनाेदी चित्रपटासाठी अनमाेल याेगदान दिले आणि एकापेक्षा एक सरस विनाेदी चित्रपट पडद्यावर आले. उत्पल दत्त, अशाेककुमार आणि ए.के.हनगल यांच्या भूमिका असलेला ‘शाैकीन’ हा विनाेदी चित्रपट उत्कृष्ठ ठरला. आजही पडद्यावर विनाेदी हिंदी चित्रपट येत आहेत आणि त्यांना उदंड यश मिळत आहे. परेश रावल यांची भूमिका असलेला ‘हंगामा’ या चित्राने तर हिंदीतही विनाेदाचा नवा ट्रेंड आणला. या यशानंतर हिंदीत निखळ आणि केवळ विनाेदासाठीच निर्माण हाेत असलेल्या चित्रपटांची संख्या आणि यशही वाढताना दिसत आहे. हिंदीत विनाेदी भूमिका करण्यासाठी स्वतत्र विनाेदी कलावंत असायचे परंतु हळूहळू नायकही विनाेदी कामं करू लागले आणि स्वतंत्र विनाेदी कामं करणारे नट काहीसे बाजूला पडू लागले. सुपस्टार अमिताभ बच्चन यांनी तर मुख्य भूमिका करीत असताना अनेक चित्रपटातून काॅमेडीही केली आहे. असे प्रकार अनेक बड्या नटांनीही केले आहेत.


मराठी विनाेदी चित्रपटाचा प्रवास सुरू असताना राजा परांजपे यांचंही एक युग आलं हाेतं. राजा परांजपे, राजा ठाकूर, राजा गाेसावी हे तीन राजे विनाेदी चित्रपटांना समृध्द करीत हाेते. ‘लाखाची  गाेष्ट’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘गंगेत घाेडं न्हालं’, ‘बायकाे माहेरी जाते’ असे अनेक यशस्वी चित्रपट राजा परांजपे यांनी दिले तर राजा ठाकूर यांनीही ‘बाेलविता धनी’, ‘घरचं झालं थाेडं’, ‘मुंबईचा जावई’ यासारखे चांगले विनाेदी चित्रपट दिले. मराठी चित्रपटाच्या विश्वात तमाशापटाला महत्व आले आणि नंतर हळूहळू विनाेदी चित्रपटांची संख्या कमी हाेत राहीली. मराठी माणसाला तमाशा अधिक आवडत असल्यानं तशाच विषयावर चित्रपट येत राहीले आणि ते यशस्वीही झाले. मराठी चित्रपट म्हटलं की ताे तमाशापटच असणार असं एक समिकरण हाेत गेलं. अशा चित्रपटातूनही विनाेदाची पेरणी जाणीवपूर्वक हाेत राहीली पण संपूर्ण चित्रपट विनाेदासाठी ठेवण्यात आला नाही. काही काळ तमाशापटाने गाजवला खरा पण नंतर मात्र प्रेक्षकांना अशा चित्रपटांचा कंटाळा यायला लागला. नव्या पिढीला यात फारसा  रस उरला नाही आणि मग मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाकडेच पाठ फिरवली. मराठी सिनेमाला वाईट दिवस आले आहेत असं वाटत असतानाच सचिन पिळगावकर, महेश काेठारे, अशाेक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे अशा काही कलावंतांनी आणि निर्मात्यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि मराठी प्रेक्षकांना पुन्हा मराठी  चित्रपटाकडे ओढून आणले. ‘गंमत जंमत’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुमधडाका’,‘नवरी मिळे नवऱ्याला ’, ‘झपाटलेला’, ‘माझा पती कराेडपती’ ते अगदी ‘नवरा माझा नवसाचा’ असे अनेक विनाेदी मराठी चित्रपट प्रेक्षकांना दिले आणि मराठी प्रेक्षकांना पुन्हा मराठी पडद्यावर स्थिर करण्याचे काम केले.


मराठीतला चार्ली चॅप्लीन असणाèया दादा काेंडके यांनी मात्र विनाेदी मराठी चित्रपटात दिलेले याेगदान इतर कुणापेक्षाही माेठे ठरले. मराठीत एक नवा प्रवाह आणून दादांनी मराठी विनाेदाचे साेने केले. सुरूवातीला त्यांचा ‘साेंगाड्या’ अडचणीत आला पण या साेंगाड्यानं दादांना विनाेदी चित्रपटांचा ‘दादा’ बनवलं. व्दयर्थी संवादामुळं शहरी प्रेक्षकांनी नाकं मुरडली पण त्यांनीही लपूनछपून का हाेईना दादांचे हे विनाेद पचवले. दादांनी सामान्य, कष्टकरी, शेतकरी, कामगार यांच्यासाठीच विनाेदी चित्रपट बनवले. त्यांचा साधा सरळ आणि भाेळाभाबडा नायक महाराष्ट्राला आवडला. विनाेदाची आणि निखळ करमणुकीचा एक नवा ट्रेंड दादांनी सुरू केला. त्यांची नक्कल करणंही कुणाला जमलं नाही. दादांच्या चित्रपटांना केवळ विनाेदामुळेच गर्दी हाेत राहीली आणि आपल्या वेगळ्या काैशल्याने दादांनी विनाेदी मराठी चित्रपटांना वेगळीच झालर लावली. मुकपटापासून सुरू झालेला विनाेदी चित्रपटांचा प्रवास आजही सुरूच आहे. विनाेदी मराठी चित्रपटात हेलकावे खात आलेला विनाेद नंतर चित्रपटाचं मुख्य केंद्र बनला आहे. 

- अशोक गोडगे 

-------------------




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !