BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ डिसें, २०२१

अखेर महाराष्ट्रात कोरोनाचे नवे निर्बंध लागू !

 

ओमीक्रॉन सुसाट !


मुंबई : कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने आणि तिसरी लाट नजरेच्या टप्प्यात आल्याने राज्य शासनाने अखेर महाराष्ट्रात नवे निर्बंध लागू केले आहेत. 

कोरोना रुग्ण महाराष्ट्रात वाढत असताना ओमीक्रॉनसारख्या नव्या विषाणूने शिरकाव केल्याने आणि राज्यात रुग्णांची संख्या अधिक वाढत असल्याने निर्बंध लागू होणार याचे संकेत गेल्या काही दिवसात मिळत होते. काल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तर तसे स्पष्ट संकेत देत मुख्यमंत्री आज किंवा उद्या निर्बंध घोषित करतील असे स्पष्ट सांगितले होते पण काल रात्रीच याबाबत निर्णय झाला आणि नवी नियमावली घॊषित देखील करण्यात आली आहे. रुग्ण वाढले तर निर्बंध कडक करावेच लागतात असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काळ सांगितले होते.



काल गुरुवारी राज्यात नव्या ५ हजार ३६८ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून फक्त  मुंबईतच ३ हजार ६७१ बाधित आहेत. देशात ओमीक्रॉन रुग्णांची संख्या १००२ एवढी झाली असून राज्यात ही संख्या ४५० च्या पुढे गेली आहे. काल राज्यात १९८ नवे ओमीक्रॉन रुग्ण आढळले आहेत.    
 

कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढू लागल्याने काल रात्री राज्य सरकारने राज्यभर कठोर निर्णय लागू केले असून विवाह आणि अंत्यसंस्कार यासाठीही उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. विवाह समारंभासाठी आता केवळ ५० तर अंत्यसंस्कारासाठी केवळ २० व्यक्तींनाच उपस्थित राहता येणार आहे. आज  नववर्षाच्या पूर्वसंध्येला अनेक ठिकाणी गर्दी होत असते हे लक्षात घेऊन पर्यटनस्थळावर जामावबंदीचे आदेश लागू केले गेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री, टास्क फोर्स आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत निर्बंधाबाबत सविस्तर चर्चा झाली आणि रात्री या निर्बंधाबाबत घोषणा करण्यात आली. या निर्बंधांव्यतिरिक्त आणखी कठोर निर्बंध लागू करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला मुभा देण्यात आली आहे. 


सार्वजनिक स्थळे, पर्यटन स्थळे, गर्दीची ठिकाणे, बीच, मोकळ्या जागा, खुली मैदाने अशा ठिकाणी गर्दी करण्यात मनाई करण्यात आली असून अशा ठिकाणच्या प्रशासनाने जमावबंदीचे कलम लागू करावे, बंदिस्त जागा किंवा खुल्या जागेत होत असलेल्या विवाह समारंभात जास्तीत जास्त ५० व्यक्तींची उपस्थिती असावी, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक  असा कोणताही कार्यक्रम असेल तरी ५० पेक्षा अधिक व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही मग तो कार्यक्रम उघड्या किंवा बंदिस्त  जागेत असला तरी हेच नियम लागू राहणार आहेत. अंत्यसंस्कार किंवा त्यासंबंधीचे विधी यासाठी केवळ २० व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल. अशी ही नवी नियमावली शासनाने जारी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत गेला तर हे निर्बंध अधिक कठोर होत जाणार आहेत. 


राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा झोप उडवली असून गेल्या २४ तासात मुंबईत ३ हजार ६७१ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. केवळ २४ तासात ४६ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजार ३६० असून आत्तापर्यंत मुंबईत १६ हजार ३७५ रुग्णांचा बळी कोरोनाने घेतला आहे. राजयताही कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून काल एका दिवसात राजय्त ५ हजार ३६८ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर २४ तासात २२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. ओमीक्रॉन रुग्णांच्या संख्येतही वाढच होत असून २४ तासात १९८ नवे रुग्ण राज्यात आढळून आले आहेत. यापैकी १९० रुग्ण केवळ एकट्या मुंबईतील आहेत. 


ओमीक्रॉन चा पहिला बळी !


राज्यात  ओमीक्रॉन वाढत असताना आणि हा किती घातक आहे यावर अजून अभ्यास सुरु असतानाच या विषाणूचा पहिला बळी समोर आला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एका ५२ वर्षे व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराने २८ डिसेंबर रोजी झाला होता,  ही व्यक्ती नायजेरियाला जाऊन आलेली होती. या व्यक्तीच्या नमुन्यात व्हायरस ओमीक्रॉनची पुष्टी करण्यात आली आहे. सदर व्यक्ती गेल्या १३ वर्षांपासून मधुमेहाने पीडित होती.  


लसीकरणच प्रभावी !


ओमीक्रॉन चा फैलाव जगभर आणि वेगाने होत असून कोरोना प्रतिबंधात्मक लस न घेतलेल्या व्यक्तींना याचा संसर्ग होण्याची अधिक शक्यता असली तरी लस घेतलेल्या व्यक्तींनाही ओमीक्रॉनही बाधा होत आहे. तरीही ओमीक्रॉनला दूर ठेवण्यासाठी लसीकरण हा पर्याय अजूनही प्रभावी आहे असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य संशोधक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले आहे, अनेक देशात ओमीक्रॉन वेगाने पसरत आहे पण त्याची तीव्रता अजूनही नव्या पातळीवर पोहोचलेली नाही त्यामुळे ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी शक्य तेवढ्या लवकर लस घेणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !