BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ डिसें, २०२१

भाजपचे आमदार हरवलेत ! शोधून देणाऱ्यास एका कोंबडीचे बक्षीस !

 

एक कोंबडी बक्षीस !


मुंबई : भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि केंद्रीय मात्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांची पुरती खिल्ली उडविण्यात आली असून राणे हरविल्याचे बॅनर मुंबईत झळकले असून त्यांना शोधून देणाऱ्यास कोंबडी बक्षीस देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

 


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आमदार असलेले चिरंजीव नितेश राणे हे नेहमीच टीकेचे धनी होत असतात. राजकीय परिपक्वतेचा अभाव त्यांच्यात मोठ्या प्रमाणात असल्याचे नेहमीच म्हटले जाते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमोर 'म्यांव म्यांव' करण्याचा जो प्रकार त्यांनी केला त्यातून त्यांचा बालिशपणा दिसला अशाही प्रतिक्रिया उमटल्या. त्यांची नेहमीची विधाने अशाच अंगाने चर्चिली जात असतात पण विधानभवन परिसरात त्यांनी केलेला पोरकटपणा महाराष्ट्राला रुचला नाही. त्यांच्या या प्रकारामुळे विधानसभेतही मोठा हंगामा झाला आणि त्यापाठोपाठ त्यांच्यावर पोलीस यंत्रणेचा ससेमिरा लागला

 

संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी त्यांचा संबंध असल्याचा सुगावा पोलिसांना लागला आणि पोलीस त्यांच्या मागे लागले. पोलीस आपल्याला अटक करू पाहताहेत हे लक्षात येताच आमदार असलेले नितेश राणे 'नॉट रिचेबल' झाले आणि यामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली. म्यांव म्यांव करणारे नितेश राणे हेच मांजरासारखे लपून बसल्याचे टोमणेही अनेकांनी मारलेच पण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जमीनच अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आणि राणे अधिकच गोत्यात आले. पोलीस त्यांना कुठल्याही क्षणी अटक करतील हे स्पष्टच आहे त्यामुळे ते पोलिसांच्या नजरेपासून दूर आहेत. सिंधुदुर्ग न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात ते उच्च न्यायालयात दाद मागणार आहेतच पण तोपर्यंत त्यांना पोलिसांच्या नजरेपासून दूर रहावेच लागणार आहे.

 

आमदार नितेश राणे पोलिसांच्या नजरेपासून दूर आणि नॉट रिचेबल असल्याने त्यांच्या विरोधकांना आयतीच संधी चालून आली आणि त्यांनी या संधीचा आपल्या पद्धतीने फायदाही उठवला आहे. मुंबईत करण्यात आलेली बॅनरबाजी चर्चेची ठरली असून आमदार नितेश राणे हरवले आहेत, त्यांना शोधून देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस देण्यात येईल असा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे. अत्यंत कमी शब्दात असलेले हे बॅनर खूप काही सांगून जात असल्याने या बॅनरची राज्यभर चर्चा सुरु झाली आहे. या बॅनरची चर्चा खूप होतेय पण ते कोणी लावले याबाबत काहीच उल्लेख नाही. त्यामुळे हे बॅनर नक्की कुणी लावले हे समजू शकत नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !