BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० डिसें, २०२१

खळबळजनक निष्कर्ष ! मुलांच्या एकाग्रतेवर होतोय गंभीर परिणाम !!



मुंबई : आपल्या लहान मुलांच्या हातात आई वडील मोठ्या कौतुकाने स्मार्ट फोन देतात पण याचे गंभीर दुष्परिणाम समोर आले असून मुलांची एकाग्रता आणि आरोग्य यावर विपरीत परिणाम होत असल्याचा निष्कर्ष अभ्यासातून पुढे आला आहे.


स्मार्ट फोन हा जीवनाचा अत्यावश्यक भाग कधी बनला हे कुणालाच समजू शकले नाही. खिशात पैसा नसला तरी चालेल पण स्मार्ट फोन आवश्यक ठरू लागला आहे. स्मार्ट फोन हा काळानुरुप गरजेचा जरूर आहे पण त्याचा गरजेपेक्षा अधिक आणि अयोग्य वापर होत असल्याचेच अधिक दिसून येत आहे. चार मित्र एकत्र आले तर सुरुवातीला काही क्षण बोलतात आणि नंतर प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये व्यस्त होतात. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, नातं असं सगळंच काही हरवून गेलं आहे पण लहान मुलाचं आरोग्य धोक्यात आणण्याचं काम हा स्मार्ट फोन करू लागल्याचं दिसून येत आहे. 


लहान मूल रडायला लागलं की त्याच्यापुढे मोबाईल पकडून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला जातो. मोबाईल कशाला म्हणतात हे समजायच्या वयाच्या आधीपासून त्याच्या डोळ्यापुढे मोबाईल दिला जात आहे. मुलांनी जेवण करावे म्हणून त्याला मोबाईल दिला जातो आणि नंतर अभ्यास करण्यासाठीही आता मोबाईल आवश्यक ठरला आहे. एकंदर जन्माला आल्यापासूनच मोबाईल एक प्रकारे जीवनावश्यक बनू लागला आहे. याचे धोके आजवर अनेक अभ्यासकांनी सांगितले असले तरी त्याकडे दुर्लक्ष करून आई वडील हे प्रकार करीतच आहेत. आता तर राष्ट्रीय बाल हक्क आयोगानं याकडे लक्ष वेधले असून देशातील ३७.१५ टक्के मुलांची एकाग्रता कमी झाल्याचा आणि मानसिकतेवर गंभीर परिणाम झाल्याचा निष्कर्ष  काढण्यात आला आहे. 

मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होत असून याबाबत राष्ट्रीय बालहक्क आयोगाने केलेल्या अभ्यासातून ही मोठी माहिती समोर आली आहे. स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे मुलांची एकाग्रताच कमी होत असल्याचं या अभ्यासातून दिसून आले आहे.  त्यात लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन अभ्यासामुळे तर स्मार्ट फोन शिवाय पर्याय उरला नाही. अभ्यास आणि इंटरनेटचा अमर्याद वापर यामुळे हा मोठा धोका निर्माण झाला आहे. राष्ट्रीय बाळ अधिकार संरक्षण आयोगाने यावर अभ्यास केला असता समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. मुले इंटरनेट आणि स्मार्ट फोन यांचा वापर कशा प्रकारे आणि किती करीत आहेत, किती मुले मोबाईलच्या आहारी गेले आहेत आणि याचा त्यांच्यावर नेमका काय परिणाम होत आहे याचा अभ्यास करून त्यातून निघालेला निष्कर्ष आयोगाने समोर आणला आहे. देशातील शहरी आणि ग्रामीण विभागातील  पाच हजार मुलांचा सर्व्हे करून आयोगाने हा अभ्यास केला आहे.


या अभ्यासात देशातील ३७. १५ टक्के मुलांची एकाग्रता स्मार्ट फोनचा  अतिवापर केल्याने कमी झाल्याचे दिसून आले आहे, ७६.२० टक्के मुलांना मोबाईल हा मनोरंजनासाठी वापरायला आवडत आहे.  विशेष म्हणजे यातील ४८.२० टक्के मुलांनी जग स्मार्ट फोनच्या आहारी गेले असल्याचे म्हटले आहे.  देशातील २३.८० टक्के मुले झोपण्याच्या वेळेला स्मार्ट फोनचा वापर अधिक प्रमाणात करीत आहेत तर अभ्यासावेळी १३.९० टक्के विद्यार्थी सतत तर २३.३० टक्के विद्यार्थी अधूनमधून फोनचा वापर करीत असल्याचे दिसून आले आहे. यातील ७६.२० टक्के पालकांनी मात्र मुलांच्या मोबाईल वापराच्या वेळा निश्चित केल्या आहेत.

  

मोबाईलच्या अति वापरामुळे मुलांचे खेळणे बंद झाले असून मैदानी खेळाचा तर पुरता विसर मुलांना पडला आहे. त्यामुळे शारीरिक व्यायाम मिळणेही कठीण झाले आहे, त्यात मोबाईलच्या अधिक वापरामुळे आरोग्य आणि मानसिकता यावर गंभीर दुष्परिणाम होत असल्याचे पुन्हा पुन्हा समोर येत आहे. असे असले तरी मुलांचा अधिकाधिक वेळ हा मोबाईलवर जात असून व्यत्यय नको म्हणून आई वडील मुलांच्या हाती स्मार्ट फोन देत आपली कटकट संपवतात. मुलांच्या आरोग्याचे काय ? याचा विचारही असंख्य पालक करताना दिसत नाही. मुलांवर प्रेम आणि त्यांच्या भविष्याची चिंता असेल तर पालकांनी आता तरी सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे. 


कुठल्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा आपण वापर कसे करतो यावर बरेच काही अवलंबून आहे. चांगल्या गोष्टीसाठी आणि मर्यादित स्वरुपात वापर केल्यास प्रत्येक नवी सुविधा ही अत्यंत उपयोगी आहे पण कुठल्याही सुविधेचा अति आणि गैरवापर केल्यास नुकसान ठरलेले असते. स्मार्ट फोन ही काळाची गरज बनली असून यामुळे अगणित सुविधा मिळू शकतात पण ज्यांना अशा सुविधांचा गैरवापर करायचा आहे त्यांना कुणीही समजाऊ शकत नाही हे या आधीही स्पष्ट झालेले आहे. आग ही जेवण तयार करायला मदत करते म्हणून तिचा उपयोगच आहे पण हीच आग गैर मार्गाने वापरली तर ती सगळं काही जाळूनही टाकते. आवश्यकतेपुरती आग वापरली तर भाकरी भाजली जाते आणि तिच्या वापराची मर्यादा ओलांडली की भाकरीचाही ती कोळसा करते एवढी साधी बाब आहे. आजवर मोबाईलच्या अतिवापराचे अनेक दुष्परिणाम समोर आले आहेत, आपल्या अवतीभवती अनेक वाईट गोष्टी घडलेल्या आहेत पण तरीही डोळेझाक केली जात आहे. जाणीवपूर्वक केलेल्या डोळेझाकीमुळे नुकसान तर सहन करावेच लागणार आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर किती आणि कसा करावा ? लहान मुलांच्या हाती किती काल हा फोन ठेवावा याचा विचार आता पालकांनी गंभीरपणे करण्याची आवश्यकता आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !