BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० डिसें, २०२१

पंढरपूरजवळ झालेल्या अपघातात एक ठार, दोन जखमी !

 



पंढरपूर : पंढरपूर - करकंब रस्त्यावर पुन्हा एक अपघात होऊन एक जण जागीच ठार झाला असून याच अपघात स्थळी पुन्हा दुसरा अपघात होऊन दोघेजण जखमी झाले आहेत. 


पंढरपूर - सांगोला रस्ता हा मृत्यूचा महामार्ग बनलेला असताना पंढरपूर- करकंब रस्त्यावरही अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सिमेंटचा रस्ता झाल्यापासून या मार्गावर धावणारी वाहने भरधाव वेगात धावत असतात आणि अपघात करून कुणाच्या तरी जीवावर उठत असतात. याची पुनरावृत्ती काल सायंकाळी घडली असून एकाचा प्राण या अपघाताने घेतला आहे तर त्याच ठिकाणी अन्य एका चार चाकी वाहनातील दोघे जखमी होण्याची घटना घडली आहे. 


पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील बत्तीस वर्षीय सुदर्शन हनुमंत कोरके हे दुचाकीवरून पंढरपूरला निघाले होते. द्राक्ष बागेस फवारणी करण्याची कीटकनाशके आणण्यासाठी ते पंढरपूर येथे जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांना मागच्या बाजूने धडक मारली. कोरके हे अजोती गावाच्या जवळ आल्यानंतर हा अपघात झाला. पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या या अपघातात कोरके यांच्या डोक्याला  आणि छातीला जबर मार लागला. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत त्यांचा जागीच मृत्यू झाला. पाठीमागून धडक देणारे वाहन न थांबता पंढरपूरच्या दिशेने निघून गेले.

 

याच दरम्यान सुगाव भोसे येथून पंढरपूरच्या दिशेने येत असलेल्या चार चाकी वाहनाचाही येथेच अपघात झाला. अमोल देवकर आणि पवन पन्हाळकर हे दोघे चार चाकी वाहनातून पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. यावेळी अचानक समोर अपघात झाल्याने अपघातग्रस्त व्यक्तीला चुकविण्याच्या प्रयत्नात त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही गाडी रस्त्याच्या बाजूला खोल खड्ड्यात गेली आणि पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली. यात अपघातात अमोल देवकर आणि पवन पन्हाळकर हे दोघेही जखमी झाले तर वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. 


भोसे येथील सुदर्शन कोरके यांच्या अपघाती मृत्यूने भोसे परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. कोरके हे घरातील कर्ते होते आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांना अवघ्या सहा वर्षाचा एक मुलगा असून पत्नीसह आई, वडील, एक भाऊ, एक बहिण, भावजय असा त्यांचा परिवार आहे. पंढरपूर - करकंब दरम्यान अलीकडच्या काळात सतत अपघात होत असून या रस्त्यावरून धावणारी वाहने अत्यंत भरधाव आणि बेफिकीर धावत असतात. सतत कुणाचा ना कुणाचा अपघाती मृत्यू या मार्गावर होता असल्याने चिंता व्यक्त होत आहे.      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !