BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ डिसें, २०२१

करमाळ्यातील 'थप्पड की गुंज' , प्रतिध्वनी मात्र महाराष्ट्रात !


 


निट बघा, नाहीतर डोळे काढू !


पंढरपूर : 'लय मस्ती करू नका, वाकड्या नजरेनं बघाल तर डोळे काढू' अशा आक्रमक शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांनी दिग्विजय बागल यांना थेट इशारा दिला आहे. 


शेतकरी संघटनेच्या आंदोलनात करमाळ्यातील मकाई साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजयसिंह बागल यांनी मारहाण केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. शेतकरी संघटनेचे विजय रणदिवे आणि अन्य कार्यकर्ते एफआरपी च्या मागणीसाठी मकाई साखर कारखान्यावर गेले होते यावेळी चेअरमन बागल यांनी रणदिवे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि शिवीगाळ केली असा आरोप करीत आता स्वाभिमानी शेतकरी संघटना अत्यंत आक्रमक झाली आहे. कारखान्यावर झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने बागल अधिक अडचणीत आले असून बागल यांचे वर्तन काय आहे हेच या घटनेने दाखवून दिले आहे.  

 

करमाळा तालुक्यात घडलेल्या या घटनेचे पडसाद पंढरपूर तालुक्यातही अत्यंत तीव्रतेने उमटू लागले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी तर अत्यंत आक्रमक होत या घटनेचा निषेध तर केलाच आहे पण दिग्विजय बागल यांना थेट आव्हान दिले आहे. यामुळे सदर प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'सोमवारी आपण स्वतः करमाळा येथे येत असून तुमचे किती गुंड आहेत ते घेऊन या, आम्ही शेतकऱ्यांच्या फौजा घेऊन येत आहोत !' असे आव्हान तुपकर यांनी आधीच दिले होते. याशिवाय ' लय मस्ती करू नका, माज करू नका, भल्याभल्यांचा माज उतरवणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे, येथून पुढे स्वभिमानीच्या कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेनं बघायचा प्रयत्न केला तरी डोळे काढून ठेवल्याशिवाय राहणार नाही' असा सणसणीत आणि कडक इशारा देत बागल यांना थेट आव्हान दिले आहे.  

थकित एफआरपी न देता शेतकरी आणि संघटना प्रतिनिधींची मुस्कटदाबी केली जाते, जो बिलासाठी भिडतो, त्याच शेतकऱ्याची मुस्कटदाबी करून गुंड घेऊन मारहाण करतो, तोच मोकळा फिरतो ! हा महाराष्ट्र आहे की बिहार ? असा सवाल उपस्थित करीत पंढरीत बागल यांच्याविरोधात शेतकरी संघटनेने आज आंदोलन केले !   

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही या घटनेबाबत आपली संतप्त आणि आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजू शेट्टी हे अत्यंत आक्रमक नेते असून प्रसंगी ते कितीही मोठा नेता असला तरी भीक घालत नाहीत. दिग्विजय बागल यांना तर अजून राजकारण शिकायचे आहे. तेवढ्यातच त्यांची अशी प्रतिमा निर्माण होणे हे त्यांच्या राजकीय जीवनासाठीही धोक्याचे आहे. मकाई  कारखान्यावर घडलेल्या घटनेचे पडसाद सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरही उमटताना दिसू लागले असून बागल यांना हे अडचणीचे नक्कीच ठरणार आहे. साखर कारखान्यावर आंदोलने होतात, शेतकरी संतापून अनेकदा नको तेवढे ताणून धरतात पण भल्या भल्या साखर साम्राटानी आंदोलाकाव्र हात उचलण्याची घटना घडत नाही. बागल यांनी मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाच थेट अंगावर घेतले आहे त्यामुळे त्यांना वाटते तितके हे सोपे नाही. 

 

स्वाभिमानी शेतकरी संघटना 'त्या' घटनेवर प्रचंड आक्रमक असून हा संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्याच्या विविध भागातून या घटनेचे पडसाद उमटताना दिसत असून एकूण प्रकरणाचा भडका उडाला तर नवल वाटणार नाही अशी परिस्थिती सद्या तरी दिसत आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !