BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ डिसें, २०२१

सोलापूर जिल्ह्यात पावणे दोन लाख व्यक्ती कोरोनाबाधित !

 


पंढरपूर : सोलापूर जिल्हा आता कोरोनामुक्त होण्याच्या उंबरठ्यावर असून आत्तापर्यंत जिल्हा ग्रामीणमध्ये पावणे दोन लाख व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली तर ३ हजार ६६८ कोरोनाबाधीतांचा बळी गेला आहे.  पंढरपूर तालुक्यातील सर्वाधिक बळी कोरोनाने झाले आहेत. 

दोन वर्षापासून देशासह महाराष्ट्र कोरोनाशी लढा देत आहे आणि  या लढ्यात कोरोनाने अपरिमित आणि भरून  न येणारे नुकसान केले आहे. तिसऱ्या लाटेची भीती आता अधिक गडद होऊ लागली असली तरी सोलापूर जिल्हा सद्यातरी कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत असल्याचे दिसत आहे. कोरोनाने उद्योगधंदे बंद पाडले, अर्थचक्र जागीच थांबवले तर सर्वसामान्यांना जगणे कठीण केले. घराघरात या कोरोनाने दहशत माजवली आणि घरातील कर्त्या व्यक्ती कोरोनाने हिराऊन नेल्या आहेत. कित्येक कुटुंब पोरके झाले आहेत पण तिसऱ्या लाटेच्या दडपणातही कोरोनामुक्तीकडे वेगाने वाटचाल सुरु असल्याचे समोर आले आहे. 

काल प्राप्त झालेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आता केवळ ७४ रुग्ण उपचार घेत आहेत.  यात अक्कलकोट -१, बार्शी - १०, करमाळा - ७, माढा - २१, माळशिरस- १०, मंगळवेढा - १, मोहोळ -३, उत्तर सोलापूर - २, पंढरपूर - १४, सांगोला- ४, दक्षिण सोलापूर - १ अशा रुग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १ लाख ७४ हजार ९८३ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आणि यातील १ लाख ७१ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरीही गेले आहेत. आता केवळ ७४ रुग्ण उपचार घेत आहेत. दुर्दैवाने सोलापूर जिल्हा ग्रामीण मधील ३ हजार ६६८ रुग्ण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यात पंढरपूर तालुका जिल्ह्यात सर्वाधिक आहे .  एकट्या पंढरपूर तालुक्यातील ६५९ व्यक्ती कोरोनामुळे दगावल्या आहेत.  अक्कलकोट -२०७, बार्शी - ५१२, करमाळा -२२०, माढा - ४४०, माळशिरस- ५०१, मंगळवेढा - २०४, मोहोळ -४३७, उत्तर सोलापूर - १६१, पंढरपूर - ६५९, सांगोला- १४६, दक्षिण सोलापूर - १८१ अशा मृत्यूंचा समावेश आहे. 

मृत्यू पावलेल्या आकड्यात पंढरपूर तालुका सर्वाधिक आहेच पण सोलापूर जिल्हाच्या ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण पंढरपूर तालुक्यातीलच आहेत. संपूर्ण जिल्हा ग्रामीण मध्ये बाधित झालेल्या १ लाख ७४ हजार ९८३ रुग्णांपैकी ३४ हजार ३०७ रुग्ण एकट्या पंढरपूर तालुक्यातील आहेत. अक्कलकोट -४५८०, बार्शी - २२६८२, करमाळा -१६३४४, माढा - २२६२५, माळशिरस- ३३९६६, मंगळवेढा - ९८७५, मोहोळ - १०२२५ , उत्तर सोलापूर - ३०९२, पंढरपूर - ३४३०७, सांगोला- १३१८८, दक्षिण सोलापूर - ४०९९  अशी तालुकानिहाय बाधित व्यक्तींची आकडेवारी आहे. 
सोलापूर जिल्हा ग्रामीणमधील एकूण बाधित रुग्णांपैकी शहरी विभागातील ३१ हजार ७५३ तर ग्रामीण विभागातील  १ लाख ४३ हजार २३० रुग्ण आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण विभागातील बाधित रुग्णांची संख्या मोठी आहे, अर्थातच मृत्यूचे प्रमाणही ग्रामीण भागातच अधिक आहे. कोरोनामुळे शहरी भागातील ७८६ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत तर ग्रामीण भागातील २ हजार ८८२ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. सद्या उपचार घेत असलेल्या रूग्णातही शहरी भागातील २० तर ग्रामीण भागातील ५४ रुग्ण आहेत.  जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्याचे झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !