मंगळवेढा : मंगळवेढा - सोलापूर मार्गावर झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मंगळवेढा ते सोलापूर रस्त्यावर अलीकडे नेहमीच अपघात घडत असताना आज पुन्हा एक भीषण अपघात घडल्याची घटना घडली असून यात दोघे जागीच मृत्युमुखी पडले आहेत. श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या रस्त्याच्या जवळ दोन वाहनात समोरासमोर टक्कर होऊन हा अपघात घडला आहे. सोलापूरकडून मंगळवेढ्याच्या दिशेने येणारी कार आणि मंगळवेढ्याकडून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या टेम्पोची समोरासमोर टक्कर होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात ठार झालेले आणि जखमी असलेले सर्वजण जत तालुक्यातील उमदी येथील रहिवाशी आहेत.
उमदी येथून हे सर्वजण एका कार्यक्रमासाठी तीन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे गेले होते. कार्यक्रम संपवून ते आपल्या गावी परत जात असताना मंगळवेढ्याजवळ हा अपघात झाला आहे. अपघातात चार जण जबर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जैनुद्दीन काशीम यादगिरे (वय ४०) आणि मौलाना साजिद खान (वय ४५) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. समोरासमोर झालेल्या या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचे दिसत आहे. अत्यंत भीषण अशा झालेल्या या अपघातातील मृत्यूंची संख्या वाढण्याची शक्यता असून आणखी एका जखमीचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
वाचा >> जिवंत व्यक्ती सरकारी कागदावर झाल्या 'मयत ' !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !