BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ डिसें, २०२१

सोळा वर्षाच्या मुलानेच केला पाच वर्षीय बालकाचा खून !

 



तुळजापूर : सांगवी मार्डी येथील पाच वर्षीय बालकाचा खून हा गावातीलच सोळा वर्षीय मुलाने केल्याचे निष्पन्न झाले असून केवळ चिडविल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आल्याची समोर आले आहे. 


तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी या गावातील अवघ्या पाच वर्षाचे बालक बेपत्ता झाले होते आणि नंतर त्याची हत्या झाली असल्याचे समोर आले. या घटनेने तुळजापूर तालुका हादरून गेला आणि केवळ पाच वर्षे वयाच्या बालकाचा खून झाल्याने पोलिसांसमोरही तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले होते. पोलिसांनी मात्र अत्यंत वेगाने या खुनाचे रहस्य उलघडले आणि अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने या बालकाची हत्या केल्याचे उघडकीस आले. या खुनातील एकूण घटना पाहिल्या असता एखाद्या सराईत गुन्हेगाराने करावे असे कृत्य अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने केले आहे. खून करण्यापासून पुरावा नष्ट करण्यापर्यंत त्याने जे केले ते सगळेच धक्कादायक आहे. 'क्राईम पेट्रोल' ही मालिका पाहून त्याने हे सगळे प्रकार केले असल्याचेही उघड झाले आहे. 


अकरावीत विज्ञान शाखेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाला गावात एका टोपण नावाने चिडवत असतात पण यातून मात्र अवघ्या पाच वर्षे वयाच्या बालकाला आपला प्राण गमवावा लागला. रस्त्याने जाताना या बालकाने त्याला त्याच नावाने हाक मारली आणि त्यामुळे या विद्यार्थ्याला राग आला. रागाच्या भरात त्याने  या बालकाच्या कानाखाली वाजवली. कानशिलात जोरात लागल्यामुळे पाच वर्षाचा मुलगा बेशुध्द झाला. आणि येथून पुढे या हत्येची खरी कहाणी सुरु झाली. बेशुध्द झालेल्या बालकाला घेऊन हा विद्यार्थी आपल्या घरी आला, त्याने नायलॉनच्या दोरीने सदर बालकाचा गळा आवळला. यात बेशुद्ध आलेल्या लहानग्या बालकाचा जीव गेला. या बालकाच्या कुटुंबातील सगळे सदस्य मात्र शोध घेत राहिले आणि अखेर त्याचे अपहरण झाले असावे असे वाटल्याने त्यांनी पोलिसात माहिती दिली.


वाचा : >>>  पंढरपूर तालुक्यातील पंधरा जणांना सक्तमजुरी !


अवघ्या सोळा वर्षाच्या या आरोपीने सगळे काही थंड डोक्याने केले होते. बालकाचा प्राण घेतल्यानंतर त्याने मृतदेहाच्या कानातील बाळी काढून घेतली आणि आपल्या बुटात लपवली. एवढ्यावर तो थांबला नाही तर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न त्याने सुरु केला. मृतदेहावर गादी आणि अन्य काही समान टाकून मृतदेह शेजारी राहत असलेल्या चुलत्याच्या घरी नेऊन टाकला. हा सर्व प्रकार अकरावीत शिकणाऱ्या मुलाने केला हे आश्चर्यजनक आहे.  बालकाची हत्या करून मृतदेह चुलत्याच्या घरात नेऊन टाकल्यावर त्याने पुढच्या परिणामाचाही विचार सुरु केला. खून केला म्हणून अल्पवयीन मुलाला किती शिक्षा होते हे जाणून घेण्यास त्याने सुरुवात केली. रात्रभर इंटरनेटवर शोध घेत तो याची माहिती मिळवत असल्याचेही तपासात समोर आले. 


खून केल्यावर अल्पवयीन मुलाला किती शिक्षा होते याची रात्रभर माहिती त्याने मिळवली आणि सकाळी आपल्याया हात दिसले असल्याचे त्याने वडिलांना सांगितले. यानंतर पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली आणि एकेक रहस्य बाहेर येऊ लागले. पोलिसांनी बारकाईने तपास करून अकरावीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यास ताब्यात घेतले. क्राईम पेट्रोल ही मालिका पाहून या आरोपीने हे कृत्य केले असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अल्पवयीन मुलाने केलेल्या या कृत्याने पोलीसही हादरून गेले आणि परिसरात या घटनेने खळबळ उडवून दिली आहे. अकरावीत शिकणारा मुलगा एवढे काही करू शकतो यावर सहजासहजी कुणाचा विश्वास बसत नव्हता. पोलिसांनी मात्र काही तासात या खुनाचे रहस्य उलगडले आहे.       


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !