BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ डिसें, २०२१

सोलापूर जिल्ह्यातून तेरा परप्रांतीय ऊसतोड कामगारांची मुक्तता !

 



अकलूज : शेतकऱ्याने रोखून धरलेल्या परप्रांतीय ऊसतोड कामगारांची पोलिसांनी सुटका केली.  शेतकऱ्याच्या ताब्यात अडकलेल्या या कामगारांना अखेर मोकळा श्वास घ्यायला मिळाला असून हे मजूर आपल्या गावी रवाना झाले आहेत. 


ऊसतोड कामगार आणि त्यांचे ठेकेदार हा एक कायम वादाचा विषय झाला आहे. तोडणी कामगार हा ऊसतोडीसाठी अत्यंत आवश्यक असतो आणि त्यांचा पुरवठा काही ठेकेदार करीत असतात. साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या आधीच हे ठेकेदार आपल्या टोळीसाठी संबंधितांकडून काही मोबदला आगाऊ रक्कम म्हणून घेतात आणि तारीख देवून येण्याची हमी देतात. अनेकदा ऊस तोड करणाऱ्या कामगारांची टोळी अपेक्षित स्थळी पोहोचत नाही आणि ही जाणीवपूर्वक केलेली फसवणूक असते. अशी फसवणूक दरवर्षी कुणाची ना कुणाची होत असते. अशाच काहीशा व्यवहारातून शेतकरी कामगारांना अडकवून ठेवत असतो पण कायद्याला ते मान्य नसते त्यामुळे त्यांची कायदेशीर सुटका होऊन शेतकऱ्यावर गुन्हे दाखल होत असतात. असाच काहीसा प्रकार माळशिरस तालुक्यातील अकलूज जवळील वाफेगाव येथे समोर आला आहे. 


वाफेगाव येथील एका शेतकऱ्याने मध्य प्रदेशातील ऊस तोड कामगारांना त्यांच्या गावी जाण्यापासून अटकाव केला होता. शेतकरी आणि मजूर यांच्या झालेल्या वादामुळे मजुरांना रोखून त्यांना त्यांच्या गावी जाऊ दिले जात नव्हते.  परंतु हे प्रकरण मध्य प्रदेशातील पोलिसांच्यापर्यंत पोहोचले आणि मध्य प्रदेश पोलिसानी त्यांच्या सुटकेसाठी पाउल उचलले.  


बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील १३ ऊस तोडणी कामगारांनी ठेकेदाराच्या माध्यमातून काही रक्कम उचल म्हणून घेतली होती आणि त्यानुसार यंदाच्या गळीत हंगामात उस तोडणी करण्यासाठी माळशिरस तालुक्यातील वाफेगाव येथील एका शेतकऱ्याकडे आले होते.  यानंतर संबंधित शेतकरी आणि उस तोडणी मजूर यांच्या काही वादावादी झाली. या वादावादीमुळे शेतकऱ्याने या मजुरांना आपल्या गावी जाण्यापासून रोखले.  य मजुरांनी ही माहिती आपल्या गावी कळवली आणि त्यानुसार तेथे पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यानुसार तेथील नायब तहसीलदार राम पगारे आणि अन्य अधिकारी तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अकलूज येथे दाखल झाले.  अकलूज पोलिसांना या घटनेची माहित देत आणि त्यांची मदत घेत पुढील कारवाई करण्यात आली.


सदर कामगार आणि शेतमालक यांना तातडीने पोलीस ठाण्यास हजर करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक यांनी माळीनगर बीटच्या कर्मचाऱ्यांना दिले असता पोलिसांनी त्यांना ठाण्यात हजर केले. त्यानंतर त्यांची सुटका होऊन खास गाडीने त्यांची मध्य प्रदेशात रवानगी करण्यात आली. अशा प्रकारच्या घटना दरवर्षी घडत असतात आणि मजुरांना बोलाविणारे आर्थिक नुकसानीत जात असतात. कायद्याचे स्मरण ठेवत ऊस तोड कामगारांना आधी उचल देण्याबाबत संबंधितानी विचार करण्याची वेळ आता आली आहे. गरजेपोटी आधी रक्कम दिली जाते आणि नंतर ठेकेदार अथवा मजूर तोंडी ठरलेल्या कराराशी प्रामाणिक राहत नसतील तरी ती खाजगी बाब ठरते त्यामुळे फसवणूक झाली तरी कायदेशीर दाद मागता येत नाही हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवून व्यवहार करावे लागणर आहेत. कायद्यानुसार तोंडी झालेल्या व्यवहारावर कुणालाही अटकाव करून ठेवता येणार नाही त्यामुळे आपण फसणार नाही याची काळजी ज्याने त्याने घेण्याची गरज आहे.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !