मैदानावर क्रिकेट प्रेमींची मनं जिंकणाऱ्या विराट कोहलीने मैदानाबाहेरही प्रतिस्पर्धी संघाचे मन जिंकून आपण केवळ कर्णधारच नाही तर 'राजा माणूस' ही आहे हेच दाखवून दिले आणि जगभर कोहलीचे कौतुक झाले.
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याने मैदानावर एकेक विक्रम करीत क्रिकेट प्रेक्षकांना भरभरून आनंद दिला आहे. तो मैदानावर आला त्याची बॅट तळपते आणि आक्रमक होत तो चेंडूवर तुटून पडतो. आक्रमक शैलीचा हा फलंदाज मैदानाच्या बाहेर मात्र अगदी दिलदार माणूस आहे याची अनेक उदाहरणे यापूर्वी समोर आलेली आहेत. सद्या सुरु असलेल्या टी २० विश्वचषक कप स्पर्धेवेळी त्याचे हे रूप आणखी समोर आले आणि प्रतिस्पर्ध्यांसह जगभर विराटच्या दिलदारीचे कौतुक होऊ लागले. प्रतिस्पर्धी संघाला आधी मैदानात बदडून काढले आणि नंतर विराट त्यांच्याच ड्रेसिंग रूम मध्ये गेला.
युएई येथे काल टी २० विश्वचषक स्पर्धेतील भारताचा एक सामना स्कॉटलंड संघाशी झाला. आठ गडी राखून भारताने हा सामना दणदणितपणे जिंकला आणि त्यासोबत विराट कोहलीने पराभूत केलेल्या कर्णधाराचे आणि स्कॉटलंड संघाचे मनही जिंकून घेतले. जगभर याची चर्चा सुरु झाली आणि विराट राजा माणूस असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. स्कॉटलंड संघाबरोबर क्रिकेट खेळताना विराट आणि भारतीय संघ आक्रमक मूढमध्ये दिसत होते आणि भारतीय संघाने तशी विराट खेळीही केली. दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात खेळताना भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि स्कॉटलंड संघाचा डाव अवघ्या ८४ धावांवर संपवला. रोहित शर्मा आणि के एल राहुल यांच्या तडाखेबाज खेळी अवघ्या ६.३ षटकात भारतीय संघाने विजयावर शिक्कामोर्तब केले त्यामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीत भारतीय संघ कायम राहिला आहे. रविवारी अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना होणार असून हा सामना भारतीय संघावर परिणाम करणार आहे.
विश्वचषक स्पर्धेतील सामना जिंकणं हा कुठल्याही संघाच्या बाबतीत आनंदाचा क्षण असतोच, पण भारतीय संघाने अतिरिक्त उन्माद दाखवत हा विजय साजरा केला नाहीच शिवाय सामना संपल्यानंतर विराट कोहली हा स्कॉटलंड संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला. त्याच्याशोबात जसप्रीत बुमराह, के एल राहूल, रविचंद्रन अश्विन हे देखील होते. क्रिकेट जगतात सहसा अशा घटना घडत नाहीत पण काल मात्र ते घडले ! विराट आणि भारतीय खेळाडूंनी स्कॉटलंड संघाशी काही वेळ संवाद साधलाच पण तरुण खेळाडूंना काही टिप्स देखील दिल्या. ही माहिती स्कॉटलंड क्रिकेटच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून छायाचित्रे शेअर करून देण्यात आली. शिवाय विराट कोहली आणि त्याच्या टीमबाबत आणखी आदर वाढला असल्याचेही सांगण्यात आले आहे.
सामना संपल्यानंतर आणि तो मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर विराट कोहली आणि इतर खेळाडू स्कॉटलंड संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये कशाला गेले असावेत असा प्रश्न अनेकांना पडला होता. ते स्वाभाविकही आहे. नंतर मात्र या कारणाचा उलगडा झाला आणि विराट कोहलीचा दिलदारपणा पुन्हा एकदा जगाने पाहिला ! याला कारणही तसेच होते. स्कॉटलंड संघाचा कर्णधार कायले कोएत्झर याने सामना सुरु होण्यापूर्वीच पत्रकार परिषदेत एक मागणी केली होती. "सामना संपल्यानंतर विराट कोहली याला आपल्या ड्रेसिंग रूममध्ये पहायला आवडेल, अनुभवी खेळाडूंशी बोलून आमच्या संघातील तरुण खेळाडूंना त्याचा फायदा होईल" असे असे विधान स्कॉटलंड कर्णधाराने केले होते. त्याची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी विराट थेट त्यांच्या इच्छेनुरूप त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि मनमोकळा संवाद साधला. प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराने प्रत्यक्ष नव्हे तर अप्रत्यक्ष व्यक्त केलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी विराट त्यांच्या भेटीला गेला आणि साऱ्या जगाला विराटमधील राजा माणसाचे दर्शन झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !