BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ नोव्हें, २०२१

'त्या' गाढवाचा ऐन दिवाळीत धुमाकूळ !

 


पंढरपूर : कुणाचे पांग कधी फिटतील हे काही सांगता येत नाही असं म्हणतात ते काही खोटं नाही, सोशल मीडियावर अनेकांचा विषय चर्चिला जातो पण या दिवाळीत चक्क एक गाढव सोशल मीडियावर 'हिरो' ठरू लागलं आहे. 

सगळ्यांचेच दिवस कधी ना कधी येतात असं म्हणतात, रावाचा रंक होतो तर रंकाचाही कधी राव होत असतो हे आपण या दुनियेत पाहत असतोच ! हल्ली सोशल मीडियाचा जमाना आहे त्यामुळे प्रत्येकाला व्यक्त व्हायला वाव आहे. पटलेलं आणि न पटलेलं सगळंच मोकळेपणानं इथं मांडलं जातं ! सोशल मीडियावर राग असतो, आनंद असतो तशी चीडही असते. जो तो आपापल्या पद्धतीने इथे व्यक्त होत असतो. कधीकधी तर सभ्यतेच्या सगळ्या मर्यादाही पार केल्या जातात. व्यक्त तर व्हायलाच हवं पण सभ्यताही पाळायला हवी ! सोशल मीडियावर राजकीय पुढाऱ्यांना जागा मिळते, चित्रपटातील अभिनेते अभिनेत्री एवढेच काय अधिकारी यानाही जागा मिळते ! दिवसरात्र ओझी वाहणाऱ्या गाढवाला कोण जागा देणार ? पण या दिवाळीत एका गाढवाने सोशल मीडिया व्यापून टाकला आहे आणि पोस्ट लिहिणाऱ्याचं मोठं कौतुकही होत आहे. म्हणूनच दिवाळीत एक गाढव हिरो बनून सोशल मीडियावर धुमाकूळ घालू लागलं आहे !

गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल कंपन्यांचे 'अच्छे दिन' सुरु झाले आहेत. दरवाढीचा झटका सामान्य ग्राहकांना बसत असला तरी पेट्रोल कंपन्या मालामाल होत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एकदा खिल्ली उडवताना म्हणाले होते. " उद्या पेट्रोल शंभर रुपयावर गेले तर आश्चर्य वाटणार नाही !" यावेळी सगळ्यांना वाटत होतं, केंद्र सरकार असं काही घडू देणार नाही. पण कसचं काय ! शंभरी केंव्हा ओलांडली हे सामान्य माणसाला कळू देखील दिलं नाही ! दर कमी करा म्हणून सामान्य माणूस आक्रोश करतो आहे पण त्याचं कोण ऐकणार ? निवडणुकीशिवाय त्याला कधी आणि कोण किंमत देणार ? नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला धोबीपछाड मिळाली आणि एका रात्रीत पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले ! वाढवले भरभक्कम आणि कमी केले पाच दहा रुपये ... याचे पडसाद तर उमटणारच की ! प्रचंड टिंगल झाली या दर कपातीची ! राजकीय पक्ष भले काहीही म्हणो, सामान्य माणसांनीही खिली उडवली. सोशल मीडिया अशावेळी कसा मागे राहील ? "आम्हाला काय येडं समजता काय ?" इथपासून अगदी तिथपर्यंत लोकांनी सरकारच्या निर्णयाला पेट्रोलने धुवून काढलं !

समाज माध्यमांवर ग्राहकांच्या अनेक प्रतिक्रिया झळकल्या आणि त्यांना दादही तेवढीच मनमोकळी मिळाली आहे. एका गाढवाची मात्र मोठी चर्चा होत आहे. कुणीतरी एका गाढवाची गोष्ट सांगून इंधन दर कपातीवर भाष्य केले आहे. हे भाष्य एवढे लोकप्रिय झाले आहे की जो तो परस्परांना ही पोस्ट पाठवून आपला संताप व्यक्त करू लागला आहे. बिच्चारे गाढव दमले तरी नेटकरी दमायला तयार नाहीत. प्रत्येकाच्या मनातली भावना आणि संताप या पोस्टमधून व्यक्त होत असल्याने एक गाढव सोशल मीडियावर कधी 'हिरो' होऊन बसलं ते कळलंही नाही. 

अशी आहे 'ती' पोस्ट !

"एक असतं गाढव. मालक रोज त्याला ओझी वहायला वापरायचा. एकदा मालक त्याच्या पाठीवर ६० किलो ओझं ठेवतो. गाढव ते वजन सहज घेऊन जाते. दुसऱ्या दिवशी मालक ७० किलो वजन ठेवतो, गाढव ते वजन हळूहळू घेऊन जाते. तिसऱ्या दिवशी मालक ८० किलो वजन ठेवतो. आता गाढवाचे पाय लटपटायला लागतात. तरीपण मनाचा हिय्या करून गाढव ते वजन घेऊन जाते. चौथ्या दिवशी लालची मालक ९० किलो वजन ठेवतो ! ९५, १००,...११० ...११५ ...! आता मात्र गाढव मटकन खाली बसतं आणि रडायला लागतं ! शेवटी मालक दयेचे नाटक करून त्यातील पाच किलो वजन कमी करतो आणि पाठीवरून हात फिरवतो.  पाच किलो वजन कमी झालय म्हणून गाढवाला आनंद होतो आणि ११० किलो वजन नव्या उमेदीनं वहायला तयार होतो ... ते ही अगदी हसत हसत ! पेट्रोल, डिझेलचं पण असंच झालं आहे राव !"           



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !