BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ नोव्हें, २०२१

बोकडासाठी गळ्याला लावला सत्तूर, नंतर चित्रपट स्टाईल पाठलागाचा थरार !




पंढरपूर : 'तुझ्या बापाला पैसे दिलेत, बोकड आम्हाला दे' असे धमकावत गळ्याला सत्तूर लावला आणि बोकड पळवून नेले. त्यानंतर मात्र चित्रपट स्टाईल पाठलाग झाला आणि आरोपींची गाडी बंद पडल्यामुळे दोघे पळून गेले तर एकाच्या मुसक्या आवळल्या. 

ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील रोपळे परिसरात वेगळीच खळबळ उडाली आहे.  रोपळे येथील महादेव पोपट जाधव यांनी याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार महादेव जाधव यांचा मुलगा करण हा शेळ्या चरण्यासाठी कालव्याच्या बाजूला गेला होता. यावेळी काळ्या रंगाच्या एका चार चाकी गाडीतून तिघेजण आले आणि करण याच्या गळ्याला सत्तूर लावला. 'तुझ्या बापाला पैसे दिले आहेत, बोकड आम्हाला दे' असं म्हणत धमकी देऊ लागले, त्यानंतर त्यांनी बोकड घेतले आणि पळून गेले. ही माहिती मिळताच करणचे वडील महादेव जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी आणि चौकशी केली असता गाडी रोपळे गावाच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. 

जाधव हे गाडीचा शोध घेत रोपळे येथे आली आणि गाडीची चौकशी केली पण काही माहिती मिळू शकली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी संशयित गाडी रोपळे येथील हायस्कूलच्या समोर थांबली असल्याचा फोन आल्यानंतर जाधव हे तातडीने तेथे गेले. दरम्यान काही जणांनी या गाडीतील तिघाकडे चौकशी सुरु करताच त्यांनी तेथून पळ काढला. गाडी घेवून ते पंढरपूरच्या दिशेने वेगाने जात असताना उभ्या असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला मागून जोराची धडक मारली. तेथूनही ते पुढे पळून जाऊ लागले पण त्यांचे दुर्दैव आड आले. 

गाडी वेगाने पळून जात असल्याने काही जणांनी पुढच्या गावात संपर्क करून माहिती दिली आणि सदर वर्णनाची गाडी अडविण्यास सांगितले. दरम्यान आढीव - बाभूळगाव दरम्यान या संशयित आरोपींची गाडी भैरवनाथ पेट्रोल पंपाजवळ बंद पडली त्यामुळे आरोपींचा नाईलाज झाला. गाडीतून उतरून तिघांनी पळ काढला आणि जवळच्या ऊसात लपले. दरम्यान पाठीमागून त्यांच्या पाठलागावर असलेले लोक तेथे पोहोचले. गावातील काही लोकही मदतीसाठी तेथे आले आणि ऊसाच्या पिकात लपून बसलेल्या तिघांपैकी एकाला पकडण्यात यश आले. हा आरोपी बाभूळगाव येथीलच असल्याचे समोर आले. 

पंढरपूर तालुका पोलिसांना याची माहिती देताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेत त्यांच्या गाडीची तपासणी केली आणि दुसराच प्रकार समोर आला. हुंडाई सँट्रो गाडीत (एमएच २ एनए ८०४५) लाल कापड बांधलेला एक डेरा पोलिसांना दिसला. पोलिसांनी तपासणी केली असता या डेऱ्यात एक साप आढळून आला. पकडलेल्या संशयितांकडून त्याच्या साथीदाराची माहिती घेतली असता दोन्ही साथीदार हे मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील असल्याची माहिती त्याने दिली. डेऱ्यातील साप वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आला असून तो मांडूळ असल्याचे समोर आले. 


बोकड चोरण्याचा प्रयत्नात हा वेगळाच प्रकार समोर आला असून त्यांच्याकडे मांडूळ जातीचा साप आढळल्याने ते मांडुळाची तस्करी करीत असल्याची शक्यताही बळावली आहे. महादेव जाधव यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. गळ्याला सत्तूर लावून बोकडाची चोरी करायला गेले पण दुसराच गुन्हा उघडकीस आला आहे. या घटनेने रोपळे परिसरात खळबळ उडवून दिली असून रोपळे परिसरात या घटनेचीच चर्चा सुरु आहे. पंढरपूर तालुका पोलीस या घटनेबाबत अधिक चौकशी करीत आहेत. नेमका काय प्रकार असावा याची उत्सुकता पोलिसबरॊबरच रोपळे परिसरातील जनतेलाही लागली आहे.    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !