BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ नोव्हें, २०२१

सावधान ! फटाके फोडून प्रदूषण केल्यास एक लाखाचा दंड !



 पंढरपूर : फटाके फोडून ध्वनी आणि वायू प्रदर्शन करणे आता भलतेच महागात पडणार असून असे करणाऱ्यास एक लाख रुपयांचा दंड तर भरावाच लागेल पण गुन्हा दाखल होऊन मालमत्ता सील करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. 

दिवाळीचा सण म्हटलं की आवाजाचे आणि आकर्षक फटाके सर्वप्रथम आठवत असतात. अलीकडच्या काळात फटाक्यांचा आनंद घेण्यावर अनेक मर्यादा येत आहेत. फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण होते म्हणून कमी आवाजाच्या फटाक्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. शोभेच्या काही फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असते. हे वायू प्रदूषण आरोग्याला अपायकारक असते. कोरोनाच्या काळात तर फुफ्फुसाची अधिक काळजी घेण्याची गरज असते आणि फटक्याच्या दुरामुळे फुफ्फुसाला धोका पोहोचत असतो त्यामुळे सावधगिरी ही महत्वाची असतानाच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने थेट मोठ्या कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नियम मोडणाऱ्या व्यक्तीस मोठा दणका बसू शकतो. 

वायू प्रदूषण प्रतिबंध व नियमन कायदा १९८१, ध्वनी प्रदूषण नियम २००० या नियमांच्या उल्लंघनावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने भरपाईची निश्चित केली आहे. या निर्णयास राष्ट्रीय हरित लवादाने मान्यता दिली असून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. नियमांचे पालन होते आहे की नाही हे पाहण्यासाठी पोलीस बारीक नजर ठेवत असून सोलापुरात २१ लाखांचे फटाके जप्त काण्यात आले आहेत तर २३ जणांच्या विरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. 

पोलीस प्रशासनाने दिलेल्या वेळेच्या व्यतिरिक्त फटाके फोडल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाची निश्चिती करण्यात आली आहे. त्यानुसार व्यावसायिक अथवा निवासी ठिकाणी फटाके फोडल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. शांतता असलेल्या ठिकाणी फटाके फोडल्यास ३ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. खुले मैदान, सभागृह, लॉन, मंगल कार्यालय अशा ठिकाणी फटाके फोडण्याचा प्रयत्न केल्यास पहिल्या वेळी २० हजार तर दुसऱ्या वेळी ४० हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. 

कुठलीही मिरवणूक ही फटाक्याशिवाय पूर्ण होतच नाही. फटाके फुटल्याशिवाय मिरवणूक निघाली असं वाटतंच नाही पण आता मिरवणूकही विना फटाक्यांची काढावी लागणार आहे. मिरवणुकीत फटाके वाजवल्यास १० ते २० हजार रुपयांचा दंड केला जाणार असून आयोजकांना हा दंड भरावा लागणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या नियमांचे उल्लंघन जर दोन पेक्षा अधिक वेळा केले तर मात्र भलतेच महागात पडणार आहे. दोन पेक्षा अधिक वेळा उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड आणि गुन्हा दाखल होणार आहे. पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करून मालमत्ता सील केली जाणार आहे. 

दिवाळी, नववर्ष अथवा ख्रिसमसचा आनंद साजरा करताना या नियमांकडे लक्ष ठेवण्याची गरज असून दुर्लक्ष केल्यास ऐन सणाच्या दिवसात कायद्याचे हे नवे संकट महागात पडणार आहे. पोलीस याबाबत अधिक दक्ष असून विना प्रदूषण सणासुदीचा आनंद घेणे हेच हितावह ठरणार आहे. सोलापूर पोलिसांनी तर कारवाईचा धडाकाच लावलेला आहे त्यामुळे सावधान होणे आवश्यक आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !