BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ नोव्हें, २०२१

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत वेगळीच खळबळ !

 


सोलापूर : एकीकडे भर दिवसा बँकावर दरोडे पडण्याच्या घटना समोर येत असताना सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत वेगळीच खळबळ उडाली असून सरव्यवस्थापक यांनीच पदाचा गैरवापर करून बँकेची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

राज्यात नुकतेच एकाच आठवड्यात दोन बँकेत भरदिवसा दरोडा पडण्याचा प्रकार झाला तर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सांगोला तालुक्यातील शाखेत तिजोरी फोडून सात लाखांची चोरी झाली, बँकेतील कागदपत्रे जाळून टाकण्यात आली.  जिल्हा मध्यवर्ती बँक ही राजकारणातही महत्वाची ठरत असत त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष या बँकेवर असते. सोलापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत येऊ लागली आहे.  सरव्यवस्थापकावरच फसवणूक केल्याचा आणि पदाचा गैर वापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सरव्यवस्थापक के. टी. मोटे यांनी खोट्या शैक्षणिक प्रमाणपत्राच्या आधारे अभियंता पदावर नोकरी मिळवली आणि सरव्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारून बँकेची फसवणूक केली,  पदाचा गैरवापर करून बँकेचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान केले यासह अन्य गंभीर स्वरूपाचे आरोप मोटे यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. विभागीय सहनिबंधक संगीत ठोंबरे यांनी जिल्हा बँकेच्या प्रशासनास मोटे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा मध्यावर्ती बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी सरव्यवस्थापक मोटे याना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यासह त्यांची खातेनिहाय चौकशीही सुरु करण्यात आली आहे. 

मोटे यांनी १९८५ साली पुण्याच्या ज्ञानेश्वर विद्यापीठातून टेक क्विक हा स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले परंतु या विद्यापीठाला कोणतीही मान्यता प्राप्त नाही असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. खोट्या शैक्षणिक प्रमाणपत्राच्या आधाराने मोटे  यांनी  आधी अभियंता आणि नंतर सरव्यवस्थापक पदावर नोकरी प्राप्त केली. मोटे यांच्यावर अशा प्रकारे ठपका ठेवण्यात आला असून सदर प्रकरण अधिक गंभीरतेने समोर येऊ लागले आहे. बँकेच्या सरव्यवस्थापकाच्या विरोधात हा प्रकार समोर आल्याने सोलापूर जिल्हा बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.


सरव्यवस्थापक मोठे यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर बँक प्रशासन पुढील काय कारवाई करतेय याकडेच लक्ष लागले आहे, जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्याशी संबंधित असल्याने सोलापूर जिल्ह्यात या प्रकरणाची चर्चा सुरु झाली आहे. बँकेत यापूर्वी असा प्रकार कधी घडला नव्हता. फसवणूक सिद्ध झाल्यास बँक प्रशासनाला गंभीर आणि कठोर निर्णय घेणे भाग पडणार आहे.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !