BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ नोव्हें, २०२१

लक्ष्मी रुसली ! तब्बल दीडशे तोळे सोने आणि लाखोंची रक्कम चोरट्यांनी लांबवली !!


पुणे : लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेले दीडशे तोळे सोने आणि रोख रक्कम असा मिळून ४३ लाखांचा ऐवज चोरट्यांनी अर्ध्या रात्रीच लंपास करून आयएएस अधिकाऱ्याला ऐन दिवाळीतच मोठा तडाखा दिला आहे. 

सगळीकडे दिवाळीचा आनंद साजरा केला जात असताना पुण्याच्या एका निवृत्त महसूल अधिकाऱ्याच्या घरावर चोरट्यांनी डोळा ठेऊन लक्ष्मी पुजानाच्याच रात्री आणि पाडव्याच्या पहाटेपर्यंतच्या वेळेत मोठा डल्ला मारला आहे. महसूल खात्यातून  निवृत्त झालेल्या या अधिकाऱ्याचा मुलगाही आयएएस अधिकारी आहे. पुण्यातील मुंढवा येथील डेक्कन पेपर मील रोडवरील ज्ञानेश्वरी बंगल्यात ते राहतात. दत्तात्रय संभाजी डोईफोडे हे महसूल विभागातून मोठ्या पदावरून निवृत्त झाले आहेत आणि त्यांचा मुलगा सागर हे जम्मू काश्मीर येथे आयएएस अधिकारी पदावर आहेत. 

दिवाळीत घरोघरी लक्ष्मीचे पूजन केले जाते पण या डोईफोडे कुटुंबावर ऐन लक्ष्मी पूजनाच्या रात्रीच लक्ष्मी रुसल्याचे दिसत आहे. लक्ष्मी पूजन करताना लक्ष्मी देवीच्या प्रतिमेपुढे प्रातिनिधिक स्वरुपात काही रक्कम आणि सोने ठेवले जाते पण डोईफोडे कुटुंबाने चक्क दीड किलो सोने आई अडीच लाखाची रक्कम ठेवून लक्ष्मी पूजन केले आणि तेच त्यांना महागात पडले. घरातील जवळपास सगळेच दागिने त्यांनी या पूजनात ठेवले होते आणि चोरट्यांनी ते सगळेच लांबवले. डोईफोडे कुटुंबावर लक्ष्मी रुसली पण चोरट्यांना ती सद्या तरी पावली आहे. 

लक्ष्मी पूजनाच्या रात्री साडे अकरा वाजल्यापासून दिवाळी पाडव्याच्या पहाटेपर्यंतच्या वेळेत चोरट्यांनी ही मोठी चोरी केली आहे. हिऱ्यांचे सेट, ब्रासलेट, पाटल्या, नेकलेस, मोहनमाळ, बांगड्या, तोडे असे सगळेच दागिने आणि अडीच लाखाची रक्कम ठेऊन या कुटुंबाने लक्ष्मी पूजन केले होते. दीडशे तोळे वजनाचे म्हणजे जवळपास दीड किलो सोन्याचे हे दागिने होते. हे दागिने आणि रोख अडीच लाख रुपयांची रक्कम असे मिळून ४३ लाख ५० हजाराची ही चोरी आहे. एवढी मोठी चोरी झाल्याचे समजताच मुंढवा परिसरात हादरा बसला आहे पण काळजी न घेतल्याबाबत डोईफोडे कुटुंबालाही दोष दिला जात आहे. 

लक्ष्मी पूजनात एवढे सोने आणि रोख रक्कम ठेवली असताना रात्री या घराला कुलूप होते. चोरट्यांनी हीच संधी साधत बंगल्याच्या गेटचे कुलूप तोडले आणि हॉलच्या खिडकीचा गज कापून बंगल्यात प्रवेश केला. लक्ष्मी पूजनात ठेवलेले सर्वांच्या सर्व दीड किलो सोन्याचे दागिने आणि अडीच लाखाची रोख रक्कम घेऊन चोरटे अलगद पसार झाले. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे शाखेचे अधिकारी या बंगल्याकडे धावत सुटले. आता पोलीस या अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत. ऐन दिवाळीत झालेल्या या मोठ्या चोरीने मात्र प्रचंड खळबळ उडवून दिली असून परिसरातील नागरिकही हादरले आहेत. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !