BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ नोव्हें, २०२१

तारीख पे तारीख... २२१ वर्षापूर्वीच्या खटल्याचा निकाल अजूनही नाही !

 




मुंबई : 'तारीख पे तारीख, तारीख पे तारीख ...' हा सनी देओल याचा चित्रपटातील एक संवाद नेहमी उच्चारला जातो. न्यायालयात खटल्याचा निकाल वेळेत लागत नाही ही अनेकांची तक्रार असते पण तब्बल २२१ वर्षे फक्त तारीख घेत खटला प्रलंबित असल्याचे माध्यमातून समोर आले आहे. 

न्यायालयात असलेल्या खटल्याचा निकाल लवकर लागावा अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते पण प्रत्यक्षात तसे घडत नाही. योग्य न्याय होण्यासाठी न्यायालयाला आवश्यक त्या सर्वच बाबी पडताळून पहाव्या लागतात. न्यायालयात निकाल विलंबाने येण्यास अनेक कारणे असतात. एखादा २० वर्षांपूर्वीचा खटला प्रलंबित असला तरी अनेकांच्या भुवया उंचावतात. पण तब्बल २२१ वर्षे एखादा खटला प्रलंबित असल्याचं ऐकलं तर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण अशा एका खटल्याबाबत माध्यमातून बरीच माहिती समोर आली आहे. 

कोलकाता उच्च न्यायालयात AST/1/1800 या क्रमांकाचा एक खटला २२१ वर्षांपासून सुरु असून हा खटला देशातील सर्वात जुना खटला असल्याचे सांगितले जाते. या खटल्याचे प्रकरण सन १८०० मध्ये कनिष्ठ न्यायालयात दाखल झाले होते. न्यायालयात या खटल्याची सुनावणीही सुरु झाली आणि पुन्हा ठप्प झाली. २० नोव्हेंबर २०१८ साली या खटल्यातील शेवटची सुनावणी कोलकाता उच्च न्यायालयात झाली. सदर खटल्याच्या फायली १७० वर्षे कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित होत्या. खटला खूप काळ रखडल्याने वेगात सुनावणी होण्यासाठी १ जानेवारी १९७० रोजी कोलकाता उच्च न्यायालयात त्याबाबत नोंद करण्यात आली परंतु येथेही ५१ वर्षांपासून हा खटला 'तारीख पे तारीख' यातच रखडला आहे. 

देशातील अनेक न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले खटले आहेत. विलंबाने न्याय मिळणे हे न्याय नाकारण्यासारखेच आहे असे म्हटले जाते पण कुठल्या ना कुठल्या कारणांनी न्यायालयात वर्षानुवर्षे खटले प्रलंबित राहतात. पण २२१ वर्षे एक खटला प्रलंबित राहतो हे आश्चर्यकारक म्हणावे लागेल. राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रीड यांच्या आकड्यानुसार देशातील १७ हजार जिल्हा आणि अधिनस्थ न्यायालयात ८९ हजार खटले प्रलंबित आहेत आणि ते ३० वर्षांपेक्षा अधिक जुने आहेत. एकूण प्रलंबित खटल्यांची संख्या ३.६ कोटी आहे. याबाबत सरकारी सर्वेक्षण करण्यात आले असून त्यानुसार सद्याच्या वेगाने खटल्यांचे निकाल लागत राहिले तर सगळे खटले निकालात निघण्यासाठी ३२४ वर्षांचा काळ लागणार आहे. कनिष्ठ स्तरावरील न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यात ६० वर्षांहून जुने असलेले १४० खटले आहेत. 

आपल्यावर काही अन्याय झाला असला तर न्यायाची मागणी करण्यासाठी लोक न्यायालयाचे दरवाजे ठोठावतात. या ठिकाणीच न्याय मिळत असतो म्हणून प्रकरण निकाली निघण्याची प्रतीक्षा केली जाते पण खटल्याचा निकाल लागत नाही. तारीख मिळत राहते पण निकाल मिळत नाही आणि वर्षानुवर्षे आयुष्यातील मोठा कालावधी न्यायालयाच्या आवारात जातो. न्याय मागणारा नैसर्गिक मृत्यूने जग सोडून जातो पण  खटला मात्र न्यायालयातच प्रलंबित असतो. त्याच्या पुढच्या पिढीच्या हयातीत तरी हा निकाल मिळेल की नाही याची शाश्वती नसते. मृत्यूनंतर मिळालेल्या निकालाला न्याय कसे समाजात येईल ? कारणे काहीही असू शकतात पण वर्षानुवर्षे खटले न्यायालयात प्रलंबित राहतात हे मात्र जळजळीत वास्तव आहे.  एखादा खटला २२१ वर्षे प्रलंबित राहतो या सारखा दुसरा पुरावा काय असू शकतो !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !