BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ नोव्हें, २०२१

धाडसी दरोडा ! सोलापूर जिल्ह्यातही दरोडेखोरांचा धुमाकूळ !


माढा : ऐन दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या रात्री सोलापूर जिल्ह्यातील माढा  तालुक्यातील वडशिंगे येथे दरोडेखोरांनी दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लुटला आहे आणि दरोड्यावेळी केलेल्या मारहाणीत काही जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. 

एकीकडे दिवाळीचा आनंद घेत असताना अनेक ठिकाणी अपघात आणि चोऱ्या होण्याच्या घटना घडल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात तर जबरी दरोड्याचा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. कुटुंबाला मारहाण करून दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला आहे तर दरोड्यात मोठी लुटही करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिक दहशतीखाली असल्याचे दिसत आहे.

चोरी, दरोडा अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा सक्षम करण्यात आलेली असतानाही वडशिंगे येथे हा दरोडा पडला आहे. वडशिंगे गावात मध्यभागी असलेल्या सुरेश कदम यांच्या घरावर मध्यरात्री हा दरोडा पडला. घरात प्रवेश केल्यानंतर दरोडेखोरांनी लाकडी दांडके आणि पाईप यांनी मारहाण करीत घरातील सदस्यांकडे सोने आणि पैशाची मागणी केली. यावेळी दरोडेखोरांनी रोख रक्कम ९० हजार आणि ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, सोन्याच्या अंगठ्या, कर्णफुले, झुबे, पैंजण, जोडवे असा २ लाख ८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. 

हा दरोडा घालून दरोडेखोरांचे समाधान झाले नाही. त्यांनी निमगाव रस्त्यावर असलेल्या आणखी एका घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न फसला. हा प्रयत्न होण्याआधीच ग्राम सुरक्षा दल सावध झाले होते. फोन खणखणल्याने लोक जागे झाले होते त्यामुळे दरोडेखोरांना येथून पळ काढण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. पुन्हा एकदा ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे आणखी एक दरोडा टाळला आहे. परंतु या यंत्रणेमुळे प्रत्येक गुन्हा टाळता येईल असे दिसून आले नाही. या घटनेने परिसरात मात्र घबराट निर्माण झाली असून वाडी वस्त्यावरील लोक दरोडेखोरांच्या दहशतीखाली आहेत. कदम यांच्या घरावर दरोडा टाकून केलेल्या मारहाणीत सुरेश कदम यांच्यासह त्यांची पत्नी वैशाली आणि मुलगा रितेश हे जखमी झाले आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !