दौंड : सोलापूर - पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात तब्बल २० ते २५ फुट कार हवेत उडाली आणि चित्रपट दाखवले जाते तसे दृश्य अनेकांना पहायला मिळाले. काळजाचा थरकाप उडविणारा अपघात होऊनही सुदैवाने अनेकांचे प्राण मात्र वाचले.
पुणे-सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील मळद हद्दीत आज हा अपघात झाला. पुण्याच्या दिशेने भरधाव येणाऱ्या मारुती इर्टिका गाडीला राज्य परिवहन महामंडळाच्या बसने कट मारला त्यामुळे हा अपघात घडला. बसने कट मारताच चालकाचा ताबा सुटला आणि गाडी बाजूच्या दगडांना धडकून हवेत उंच उडाली आणि विजेच्या खांबावर जाऊन धडकली. मारुती गाडी आधीच अत्यंत वेगात होती त्यामुळे ती वीस ते पंचवीस फूट हवेत उंच उडाली. हिंदी चित्रपटांच्या पडद्यावर गाड्यांचा जसा थरार पाहायला मिळतो त्यापेक्षाही हे चित्र भयावह होते. हवेत गाडी उंच उडालीच पण २२ के व्ही चा विद्यत पुरवठा सुरु असलेल्या खांबावर जाऊन आदळली. खांबावर वेगाने गाडी आदळल्यानंतर वीज वाहक तारा आणि चिनी मातीचे कप वेगळे झाले पण मोठा अनर्थ होता होता टळला. गाडी वेगात असताना हे घडल्यामुळे विजेचा खांबही वाकडा तिकडा झाला. अपघात पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता.
एवढा मोठा भयावह अपघात झाला असताना कट मारणारी बस न थांबता निघून गेली आहे. अशा भयानक अपघातातून कोणीच वाचले नसतील असे वाटत असताना सुदैवाने जीवितहानी झाली नाही. गाडीतून प्रवास करीत असलेल्या दोन महिला आणि पुरुष जखमी झाले आहेत. त्यांना दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर अपघात अनेकांनी आपल्या डोळ्यांनी पहिला आणि त्यांचा थरकाप उडाला. असा अपघात कधी पहिला नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मळद येथे नेहमीच अपघात होतात आणि आत्तापर्यंत झालेल्या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या ठिकाणी अपघात होऊ नयेत यासाठी संरक्षक कठडे उभारण्यात यावेत अशी मागणी सातत्याने होते आहे परंतु याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !