करमाळा : माय लेकीच्या खुनाच्या घटनेने आज केवळ करमाळा तालुकाच नव्हे तर सोलापूर जिल्हा हादरला असून अवघ्या १३ वर्षाच्या मुलीसह तिच्या आईला रक्ताच्या थारोळ्यात टाकून नराधम पळून गेला आहे.
करमाळा तालुक्यातील भिलारवाडी येथे आज ही भयावह, अमानुष घटना समोर आली आणि ज्याच्या त्याच्या काळजाचा ठोका चुकला . तेरा वर्षे वयाची श्रुती आणि तिची पस्तीस वर्षांची आई लक्ष्मी माने या दोघी आज राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. मयत लक्ष्मी माने यांचे पती आणि श्रुतीचा पिता आण्णा भास्कर माने हा मात्र दुचाकीवरून पळून गेला आहे. त्यानेच हे खून केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भल्या सकाळी आपल्या आजीजवळ झोपलेला पंधरा वर्षे वयाचा रोहित माने हा वडील आण्णा माने याच्या दुचाकीचा आवाज झाल्याने जागा झाला. रात्री जेवण केल्यानंतर आण्णा माने याने पत्नी लक्ष्मी, मुलगी श्रुती आणि मुलगा रोहित याला यांना झोपण्यासाठी एकाच खोलीत बोलावले होते पण फक्त रोहित त्या खोलीत न जाता आपल्या आजीजवळ जाऊन झोपला होता. एवढ्या लवकर वडिलांच्या गाडीचा आवाज कसा आला म्हणून रोहितने पहिले असता वडील आण्णा माने याच्या अंगावरील कपड्यावर रक्ताचे डाग दिसले. आण्णा माने तेथून पसार झाला पण रोहित हा प्रकार पाहून मोठ्याने ओरडू लागला. नक्की काय झालेय हे त्याला माहित नव्हते पण वडिलांच्या कपड्यावरील रक्ताचे डाग पाहून मात्र काहीतरी अघटित घडल्याचा त्याला अंदाज आलेला होता. दरम्यान त्याच्या आवाजाने आजूबाजूचे लोक जमा झाले.
जमलेल्या लोकांनी खोलीत जाऊन पहिले असता चिमुकली श्रुती आणि तिची आई रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली असल्याचे त्यांना पाहायला मिळाले आणि सर्वाना धक्काच बसला. घाईघाईने पळून गेलेल्या आण्णा माने यानेच हे दोन खून केले असल्याचे दिसून येत होते. आरोपीने रात्रीच्या वेळेलाच हे दोन खून केले असून त्यांचे मृतदेह रात्रीपासून रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे दिसत होते. या घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आण्णा माने हा पसार झाल्याने त्यानेच हे दोन्ही खून केले असल्याचा संशय गडद झाला असून हा अमानुष प्रकार कशासाठी केला हे कोणालाच समजू शकले नाही पण भिलारवाडी परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. संपूर्ण करमाळा तालुक्यात ही माहिती मिळाली आणि सर्वसामान्य माणूस या घटनेने हादरून गेला आहे.
रोहित वाचला !
आरोपीला संपूर्ण कुटुंब संपवून टाकायचे होते, रात्रीच्या जेवणानंतर पत्नी, श्रुती आणि रोहित या सर्वाना आण्णा माने याने एका खोलीत झोपायला सांगितले होते. त्याच्या सांगण्यावरून श्रुती आणि तिची आई त्या खोलीत झोपली. पंधरा वर्षे वयाचा रोहित मात्र या खोलीत न जातात आपल्या आजीजवळ झोपला म्हणून त्याचा जीव वाचला अन्यथा या नराधमाने त्यालाही रक्ताच्या थारोळ्यात झोपवले असते आणि दोघांसह त्याचाही प्राण गेला असता. एवढे कठोर कृत्य कशासाठी केले असावे असा प्रश्न प्रत्येकाला पडला असून पोलीस संशयित आरोपी आण्णा माने याचा शोध घेत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !