दापोली : राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक असतानाच एक बस चालकाने चक्क हातात बांगड्या भरून महामंडळाची ड्युटी केली त्यामुळे आंदोलनाएवढीच चर्चा या बस चालकाचीही सुरु झाली आहे.
ऐन दिवाळीत राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या वेदना समोर आल्या. अत्यंत तुटपुंजा पगार आणि तो देखील अनियमित मिळत असल्याने एस टी कर्मचारी आधीपासूनच उपेक्षित आहेत. सातत्याने त्यांचा आक्रोश सुरु असतो पण तेवढ्या गंभीरपणे त्यांच्या वेदनांकडे कोणी पाहिलेले नाही. यावर्षी दिवाळीच्या आधीपासूनच त्यांनी आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आणि एकसंघ होऊन एस टी कर्मचारी आता नेटाने लढा देऊ लागले आहेत. त्यांनी आता संपाचे हत्यार उपसले असून २५० पैकी १६० आगार सद्या बंद आहेत तर अन्य आगारातील कर्मचारीही या संपात सहभागी होण्याच्या तयारीत आहेत. एकीकडे संप चिघळण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच दुसरीकडे मात्र दापोली आगारातील अशोक वनवे यांनी केलेल्या कृतीची राज्यभर चर्चा सुरु झाली आहे.
मुळचे बीड जिल्ह्यातील असलेले अशोक वनवे हे राज्य परिवहन महामंडळाकडे चालक म्हणून सेवेत आहेत. सद्या ते दापोली आगारात काम करीत आहेत. राज्यात बहुसंख्य ठिकाणी एस टी सेवा संपामुळे प्रभावित झाली आहे पण कोकणात मात्र ती सुरळीत आहे. म्हणूनच की काय, चालक अशोक वनवे यांनी एका कृतीने एस. टी. कर्मचारी बांधवाना एक वेगळाच दणका दिला आहे. त्यांची चक्क हातात बांगड्या घातल्या आणि एस टी ची सेवा बजावली आहे. त्यांच्या या कृतीतून गेलेला संदेश अत्यंत प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. सगळीकडे एस टी कर्मचारी आकारामक असताना कोकणातील सेवा मात्र सुरळीत असल्यानेच त्यांनी ही कृती करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राज्य परिवहन महामंडळाचे बसचालक अशोक वनवे हे आपल्या हातात बांगड्या भरून आले आणि त्यांनी दापोली - ठाणे ही शिवशाही बस घेऊन आपली सेवा बजावली आहे. संताप आणि निषेध व्यक्त करण्याचे अनेक प्रकार आजवर समोर आले आहेत पण या प्रकाराने राज्य परिवहन कर्मचारी वर्गाला एक जबरदस्त संदेश देण्याचे काम वनवे यांनी केले आहे. चालक वनवे हे आपली बस घेऊन निघून गेले पण त्याचे पडसाद आधी दापोली स्थानकावर आणि नंतर राज्यभर उमटत आहेत. गेल्या काही काळात राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून आपल्या जीवनाचा अंत केला आहे त्यामुळे कर्मचारी अस्वस्थ असताना वनवे यांनी एक वेगळीच मशाल पेटवली आहे.
अशोक वणवे म्हणाले, अवघ्या तेरा हजाराच्या पगारात घर कसे चालवायचे हा आमच्यापुढे असलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. एस. टी. कर्मचारी आत्महत्या करीत असल्यामुळे आमच्या कुटुंबात यावर्षी दिवाळी साजरी करण्यात आली नाही. "कामावर जाऊ नका, आणि जायचेच असेल तर हातात बांगड्या भरून जा" असे पत्नीने सांगितले आहे. कामावर नाही गेलो तर मेमो मिळण्याची भीती आहे. आता आश्वासने नको आहेत, शासनाचा निर्णय हवा आहे !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !