BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ नोव्हें, २०२१

बापरे ! न्यायाधीशांच्या स्कुटीच्या आत लपून बसलास साप !

 


सोलापूर : दारात लावलेल्या स्कुटी गाडीच्या आत जाऊन साप लपून बसल्याची घटना समोर आली असून या सापाला बाहेर काढण्यासाठी मेकॅनिक आणि सर्पमित्राला पाचारण करावे लागले आहे. 

साप कुठेही निघतो आणि डोळ्यादेखत तो कुठे जातो याचा पत्ताही लागत नाही. विषारी सापापासून मानवाच्या जीवाला धोका असतो म्हणून साप दिसताच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. अनेकदा अनपेक्षितरित्या साप आपल्या घरातही दिसून येतो आणि मग भलतीच तारांबळ उडते. सोलापुरात मात्र एका सापाने अनेकांना घाम फोडला. दारात लावलेल्या स्कुटीच्या आतल्या बाजूला एका सापाने आश्रय घेतला आणि अनेकांची पळता भुई थोडी झाली. 

सोलापूरच्या कुमठा नाका परिसरातील न्यायाधीश वसाहतीत हा प्रकार उघडकीस आला. न्यायाधीश रेणुका गायकवाड यांच्या बंगल्यावर पांडुरंग गोडसे हे गार्ड म्हणून कर्तव्यावर हा होते. सायंकाळच्या सुमारास एक साप दाराजवळच लावलेल्या स्कुटीच्या दिशेने चालला असल्याचे दिसले. त्यांनी पुढे जाऊन पहिले पण तोपर्यंत हा साप सरळ स्कुटीच्या आत घुसला आणि तो नेमके कोठे गेलाय हे समजू शकले नाही. गोडसे यांनी हा प्रकार न्यायाधीश गायकवाड याना सांगितला. न्यायाधीश गायकवाड आणि स्कुटीची पहाणी केली पण साप काही दिसला नाही. गोडसे यांनी तर साप स्कुटीच्या आत शिरताना पहिले पण तपासणी करूनही साप दिसत नव्हता. अत्यंत आतल्या बाजूला जाऊन हा साप लपून बसलेला होता. 

सर्पमित्राला पाचारण करण्याशिवाय गत्यंतर नव्हते त्यामुळे सर्पमित्रांना बोलाविण्यात आले. त्यांनाही हा लपलेला साप दिसत नव्हता. अखेर एका मेकॅनिकला बोलवावे लागले आणि त्याच्याकडून स्कुटी खोलून घ्यावी लागली. त्यानंतर मात्र लपलेल्या सापाचे दर्शन झाले आणि हा साप डिक्कीच्या खालच्या बाजूच्या अडचणीच्या जागी लपून बसल्याचे दिसले. तोपर्यंत जमलेल्या अनेकांची पाचावर धारण बसली होती. सदर साप हा तस्कर जातीचा असून बिनविषारी असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. सदर साप बाटलीत घालून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आला. 

नागरिकांनी मात्र अशा घटनापासून शिकण्याची गरज आहे. प्रत्येकाच्या गाड्या रात्रभर दारात लावलेल्या असतात त्यामुळे सकाळी गाडी वापरण्यापूर्वी निरीक्षण करण्याची गरज आहे. सर्पमित्रांनीही याबाबत आवाहन केले असून सद्य हिवाळ्याच्या दिवसांमुळे साप थंडीपासून बचाव करण्यासाठी गाडीचा आश्रय घेतात त्यामुळे सतर्क असणे गरजेचे आहे, सकाळी गाडीचा वापर करण्यापूर्वी गाडी सुरु करून रेस केल्यास व्हायब्रेशनमुळे साप बाहेर पडू शकतो त्यामुळे नागरिकांनी सतर्क असावे असे आवाहन करण्यात आले आहे.          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !