BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० नोव्हें, २०२१

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे ट्रेलर घुसले पोलीस चौकीत !

 
 

माळीनगर : ट्रॅक्टर चालकाचा बेफिकीरपणा पुन्हा एकदा समोर आला असून ट्रॅक्टरचे ट्रेलर निघून पोलीस चौकीत घुसले ट्रॅक्टर तसाच धावत राहिला पण चालकाला याचा पत्ताच लागला नाही.


ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाच्या बेपर्वाईने सतत अपघात होत आहेत, नागरिक सातत्याने ओरड करीत आहेत पण पोलीस यावर नियंत्रण आणताना दिसत नाहीत. आज मात्र हे ट्रेलर पोलीस चौकीतच घुसले आणि पोलिसांना जाणीव करून दिली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही परंतु मोठा अनर्थ मात्र टळला आहे. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर हे गेल्या काही वर्षांपासून यमदूत ठरू लागले आहेत. क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरणे, कर्णकर्कश गाणी लावत रस्त्याने धावणे, रस्त्यावर कोठेही ट्रॅक्टर उभा करणे, मागच्या बाजूला रिफ्लेक्टर नसणे अशा प्रकारची बेपर्वाई दाखवत आणि मुजोरी दाखवत हे ट्रॅक्टर धावत असतात. गेल्या पाच वर्षात १२३ जणांचा बळी ट्रॅक्टरचालकाच्या बेफिकिरीने गेले आहेत तरीही ही वाहतूक भानावर येताना दिसत नाही. 


माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यास ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने आज धडकी भरवली.  आज माळीनगर येथील पोलीस चौकीत ट्रॅक्टरचे ट्रेलर घुसले. ट्रॅक्टर आणि ट्रेलर यांच्यात जोडलेली पिन निसटून गेली आणि ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेऊन तसाच धावत राहिला. मागचे दोन्ही ट्रेलर अनियंत्रित होऊन रस्त्यालगत असलेल्या पोलीस चौकीत घुसले. यावेळी भाजीपाला विक्री करणारी महिला सुदैवाने आणि थोडक्यात बचावली. या अपघातावेळी रस्त्यावर गर्दी नव्हती आणि बाजाराचा दिवस नव्हता अन्यथा मोठा अनर्थ समोर आला असता. ट्रॅक्टर आणि ट्रॉली जोडताना लावली जाणारी क्वार्टर पिन जोडलेलीच नव्हती त्यामुळे मागचे दोन्ही ट्रेलर ट्रॅक्टरपासून वेगळे झाले आणि थेट पोलीस चौकीत घुसले. एवढे घडूनही चालकास याचा पत्ताही नव्हता.   विलग झालेले ट्रेलर थोडा वेळ ट्रॅक्टरमागे धावले आणि नंतर सरळ पोलीस चौकीत घुसले. 


पोलीस चौकीत घुसलेल्या या ट्रेलरवर क्रमांकही नाहीत. विना क्रमांकाचे अनेक ट्रेलर मुक्तपणे रस्त्यावरून धावत असतात पण त्यांना मज्जाव करणारे कुणीच नसते. आजच्या घटनेने पोलीस चौकीचे कंपाउंड, फलक याचे नुकसान झाले आहे, विजेच्या वायर, फोनच्या वायर तसेच केबल टी व्ही च्या वायर तुटल्या आहेत. जवळच विद्युत ट्रान्सफॉर्मर  होता . यावर जर ट्रेलर धडकले असते तरी  मोठा अनर्थ दिसला असता. याच परिसरात माळीनगर येथील आठवडा बाजार भरत असतो. बाजाराच्या दिवशी ही घटना घडली असती तर अनेकांचे प्राण गेले असते. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस यांनी अशा प्रकाराबाबत तातडीने दखल घेणे आवश्यक असून  सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र अशीच ट्रॅक्टर वाहतूक सुरु असते, याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !