माळशिरस : येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. विश्वनाथ वडजे यांच्याविरोधात सव्वा लाख लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झाला असून या घटनेने सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यावर ही कारवाई केली असून मुख्याधिकारी वडजे यांनी ठेकेदाराकडून टक्केवारी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. माळशिरस येथील माउली चौक ते कचरेवाडी हद्दीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्याच्या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. सदर रस्त्याच्या कामाच्या बिलाचा चेक तिरुपती कन्स्ट्रक्शन यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. या बदल्यात बिलाच्या तीन टक्के रक्कम मुख्याधिकारी यांनी मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. त्यांनी ही तक्रार सांगली येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीनुसार सदर विभागाकडून पडताळणी करण्यात आली यात चेक जमा केल्याच्या मोबदल्यात एक लाख रुपये आणि नवीन काम मिळवून देण्यासाठी २६ हजार असे एकूण १ लाख २६ हजार रुपये मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.
लाचलुचपत विभागाने सापळा कारवाईचे नियोजन केले परंतु कारवाईचा संशय आल्यामुळे मुख्याधिकारी वडजे यांनी सदर लाच स्वीकारली नाही. प्राप्त पुराव्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्याधिकारी विश्वनाथ वडजे यांच्याविरुद्ध माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे केवळ माळशिरस तालुक्यातच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आधीपासूनच वडजे यांच्याबद्धल नाराजीचा सूर होता त्यामुळे माळशिरस येथे या कारवाईचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे.
गेल्या काही महिन्यात अनेक मोठे मासे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले असतानाही लाचखोरीचे प्रकार वाढीला लागलेले आहेत. ठेकेदारांच्या बिलांच्या मोबदल्यातील टक्केवारी कशी असते हे सामान्य जनतेलाही माहित आहे पण सर्वसामान्य जनतेची कामेही लाचखोरीशिवाय होत नाहीत. अशा लाचखोराना वठणीवर आणण्यासाठी नागरिकांनीच पुढे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करणे आवश्यक आहे. त्यांच्या जाळ्यात रोज मासे सापडू लागले की आपोआप जनतेचा त्रास आणि लाचखोर अधिकारी, कर्मचारी यांची मस्ती कमी होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !