परभणी : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावर स्मशानभूमीतच एकाने हल्ला केला आणि बंदूक असती तर ठार केले असते अशी धमकीही दिली त्यामुळे परभणी जिल्हाभर खळबळ उडाली आहे.
विधानपरिषदेचे सदस्य असलेले आमदार बाबाजानी दुर्रानी हे पाथरी येथील एका अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गेले होते यावेळी एकाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला आणि स्मशानात एकच गोंधळ उडाला. आमदार दुर्राणी हे कब्रस्थानात पोहोचल्यानंतर ही घटना घडली. मोहम्मद बिन सईद नावाचा व्यक्ती अचानक आ. दुर्रानी यांच्याजवळ आला आणि त्याने थेट आमदारांना मारायला सुरुवात केली. त्याने थेट थप्पड मारली आणि मारतच राहिला. थप्पड आणि चापट मारत राहिल्याने कब्रस्तानमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. अंत्यविधीसारखे गंभीर आणि दु;खी वातावरण असताना हे सगळे अनपेक्षित सुरु झाले त्यामुळे कुणालाच काही कळले नाही.
आमदार अथवा कोणत्याही लोकप्रतिनिधींवर टीका होणे स्वाभाविक आहे, नाराजीही असू शकते पण कुणीतरी उठतं आणि आमदाराच्या थेट कानाखाली वाजवतं, अशा घटना महाराष्ट्रात तरी घडत नाहीत. मग अशी घटना का घडली ? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनीच शोधायला हवं !
आमदारावर हल्ला करणाऱ्या या व्यक्तीने यावेळी सर्वांसमक्ष धमकीही दिली, "बंदूक असती तर तुला ठार मारले असते" असे म्हणत त्याने मारहाण सुरूच ठेवली. त्यानंतर मात्र आजूबाजूचे लोक मध्ये पडले आणि ही मारहाण थांबवली. त्यानंतर मोहम्मद तेथून निघून गेला. आमदार दुर्रानी यांनी तेथून थेट पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. दरम्यान या घटनेचे पडसाद गाव आणि परिसरात उमटू लागले. तणावाची परिस्थिती निर्माण झालीच पण लोक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याच्या समोर एकत्र आले. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे. अचानकपणे आणि कब्रस्तानसारख्या ठिकाणी आमदारांना ही मारहाण कशासाठी करण्यात आली हे मात्र समजू शकले नाही.
या घटनेनंतर मात्र आमदार दुर्रानी समर्थक संतप्त असून व्यापाऱ्यांनी पोलिसांना एक निवेदन दिले आहे. संबधित आरोपीवर तडीपारीची कारवाई करण्यात यावी अन्यथा २२ नोव्हेंबर पासून बाजारपेठ बंद ठेवण्यात येईल असा इशाराच व्यापाऱ्यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !