BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ नोव्हें, २०२१

चमत्कार निसर्गाचा ! म्हशीला झाले चक्क पांढऱ्या रंगाचे रेडकू !


जेऊर (करमाळा ) : निसर्गाच्या मनात कधी काय येईल आणि काय चमत्कार दाखवेल हे कधी सांगता येत नाही. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात म्हशीने चक्क एक पांढऱ्या रंगाचे रेडकू जन्माला घातले आहे.
 
माणसाने प्रयत्न केले तरी प्रत्येकवेळी यश येतेच असे नाही पण निसर्गाने काही ठरवले तर ते कोणी रोखू शकत नाही. निसर्गाच्या नियमांपेक्षा काही वेगळे घडले की आपण त्याला निसर्गाचा चमत्कार, निसर्गाची किमया असे संबोधतो आणि अशा घटनांकडे कुतूहलाने पाहत राहतो. अनेकदा दोन पायांची शेळी, दोन तोंड असलेले वासरू जन्माला आलेले आहे, निसर्ग नियमांपेक्षा वेगळेपणाने जन्माला आल्याची अनेक उदाहरणे आहेत पण रंग बदलाचा विषय पहिल्यांदाच समोर आला असल्याचे सांगितले जात आहे.  करमाळा तालुक्यातील शेटफळ येथे अशीच एक घटना घडली आहे. काळ्याकुट्ट म्हशीने चक्क पांढऱ्या शुभ्र रेडकास जन्म दिला आहे. 

प्रत्येक प्राण्यांचे रंग ठरलेले आहेत आणि त्यात कधी बदल होत नाही. म्हशीला निसर्गत: काळा रंग मिळाला आहे. कोठेही गेले तरी म्हैस ही काळ्या रंगाचीच असल्याचे दिसते. म्हशीला होणारे रेडकू अर्थातच काळ्या रंगाचे जन्माला येते पण शेटफळ येथे मात्र हा निसर्गनियम बदलला असल्याचे समोर आले आहे. अर्थातच परिसरात याचे कुतूहल असणारच ! शेटफळ येथील शेतकरी मारुती रोंगे यांची म्हैस व्याली आणि तिने चक्क काळ्याऐवजी पांढऱ्या शुभ्र रंगाच्या रेडकास जन्म दिला. 


पांढरा रंग घेऊन रेडकू जन्माला आलेले पाहून शेतकरी मारुती रोंगे हे देखील आश्चर्यचकित झाले. या घटनेची बातमी परिसरात पसरली पण त्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हते. या बातमीकडे कुणी अफवा म्हणून पाहत होते तर कुणी याला निसर्गाचा चमत्कार म्हणत होते. काहींनी तर खात्री करून घेण्यासाठी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी या रेडकाला पहिले तेंव्हा त्यांचा विश्वास बसला. हा काय प्रकार असावा यावर उलट सुल्त चर्चा होऊ लागल्या आणि जो तो आपल्या बुद्धीप्रमाणे तर्क काढू लागला. या घटनेबाबत डॉक्टरांनी मात्र वेगळेच कारण सांगितले आहे.  अपवादात्मक परिस्थितीत असे होऊ शकते असे डॉक्टरांनी सांगितले. अमेरिका तसेच अन्य काही देशात असे प्रकार आढळले असून हार्मोन्समधील बदलामुळे असे क्वचित प्रसंगी घडू शकते, याकडे फारसे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता नसल्याचे पशुवैद्यक सांगत आहेत. परिसरात मात्र या घटनेचे मोठे कुतूहल असून शेतकरी वर्गात चर्चा होणेही स्वाभाविक आहे. असा प्रकार पहिल्यांदाच पाहत असल्याचे शेतकरी सांगू लागले आहेत.        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !