BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ नोव्हें, २०२१

प्रेम कर बाबा.. पण जरा लांबूनच..! एकतर्फी प्रेमवीराने केले आशा भोसले यांना हैराण !!



चित्रपटातल्या नट्यांबाबत काही प्रेक्षकांचा बराच गैरसमज असताे. चित्रपटातील दृष्यात दाखवतात ते सगळं खरं खरं असतं असा अनेकांचा समज असताे. काही तरूण मंडळी तर आपल्या खाेलीत नट्यांचे फोटो  लाऊन त्यांच्यावर एकर्ती प्रेम करीत असतात आणि यातून बऱ्याच  काही धम्माल घटनाही घडतात. ग्लॅमरची ही दुनिया तशी वेगळीच असते पण त्या ग्लॅमरमध्येही तरूणांचे वेडेपण बरंच काही करून जात असतं. बरं ही मंडळी केवळ हा विषय आपल्यापुरता ठेवत नाहीत तर तरूण नट्यांचे पत्ते शाेधून त्यांना पत्र... नव्हे नव्हे, प्रेमपत्र लिहीत असतात. नट्यांची आपली करमणूक हाेते पण या तथाकथित प्रेमवीरांचं हृदय कसं अगदी रक्तबंबाळ हाेऊन जात असतं. अनेक नट्यांबाबत असे किस्से घडलेले आहेत परंतू त्या निदान पडद्यावरतरी दिसत असतात. असे प्रसंग गायिकांच्याही वाट्याला (की नशिबाला?) आले आहेत. प्रख्यात गायिका आशा भाेसले यांनाही कळत नकळत या अनुभवातून जावं लागलं असून त्यांची कथा तर इतरांपेक्षा अगदीच वेगळी आहे. तसं पाहिलं तर आशा भाेसले यांना इतरांसारखा त्रास चाहत्यांनी दिला नाही. चाहते त्यांच्या गाण्यावर प्रेम करायचेच पण त्यांच्या शालीनतेबाबत चाहत्यांनाचा थेट अनुभव त्यांनी अनेकदा घेतला आहे. 

एकदा आशा भाेसले विमानतळावर बसलेल्या हाेत्या. त्यांच्यापासून जवळच एक मुस्लिम कुटुंब बसलेलं हाेतं. त्यातल्या एकानं आशाबाईंना पाहिलं आणि ताे आपल्या जागेवरून उठून आशाबाईंच्या आजूबाजूला चकरा मारायला लागला. ताे काही बाेलत नव्हता पण तेथेच आजूबाजूला घुटमळत हाेता. आशाबाईंच्या हे लक्षातही आलं हाेतं. काही वेळानं ताे अगदीच जवळ आला आणि त्यानं आपण आशा भाेसलेच असल्याची त्यांच्याकडूनच खात्री करून घेतली. त्यानं आशाबाईंचा फोटो एका पुस्तकात पाहिल्याचं आणि त्यावरून ओळखल्याचंही सांगितलं. त्याला आशाबाई भेटल्याचा आनंद झालाच हाेता पण ताे जे बाेलला त्यामुळे आशाबाईंना निश्चितच एक वेगळा आनंद मिळून गेला हाेता. ताे म्हणाला हाेता, "फोटोत जशा दिसला अगदी तशाच आहात तुम्ही.. अंगावरून पदर घेतलेला.. साडीही अगदी तशीच. फिल्मलाईनमध्ये इतकं सगळं काही चाललेलं असताना तुम्ही मात्र एवढ्या शालीन आहात. खरच ताेड नाही."  त्याच्या या विधानांनी आशाबाई निश्चितच सुखावल्या. चित्रपटक्षेत्रातील अभिनेत्रीकडे पाहण्याचा दृष्टीकाेन चांगला नसला तरी आपल्याशी किती आदराने लाेक वागतात याची त्यांना जाणीव झालेली हाेती. एकीकडे असा प्रसंग आनंद देऊन गेला असला तरी कळत नकळत त्यांना  एकदा विचित्र अनुभवाला मात्र सामाेरे जावे लागले हाेते.

आशा भाेसले यांच्या उमेदीच्या आणि तरूणपणीच्या काळात दूरदर्शनसारखं प्रभावी माध्यम तर नव्हतंच पण आत्तासारखी चित्रपटाची आणि कलावंताची माहितीही त्याकाळी तेवढीशी कुठं छापून येत नव्हती. त्यात १९५३-५४ सालातला काळ. आशाबाईंचे फोटोही ताेपर्यंत कुठं छापून आलेले नव्हते. आशा भाेसले यांच्या गाण्यावर मात्र अनेकजण फिदा झालेले हाेते. ते गाणं ऐकून आशाबाईना पत्रही लिहायचे पण त्यातील एक पत्र हे प्रेमपत्र असायचं. एक पंजाबी तर अशी प्रेमपत्र सतत लिहायचा. या पंजाब्याची आलेली ही प्रेमपत्र आशा भाेसले यांच्या पतीच्या हातात पडायची आणि ते आशाबाईंवर भडकायचे. ती प्रेमपत्रच अशी असायची की ती वाचल्यावर आशाबाई त्या मजनूला भेटत असतील असा संशयही त्यांना यायचा. काहीवेळा तर त्यांच्यावर तसा आराेपही करण्यात आला. या मजनूच्या वारंवार येणाऱ्या प्रेमपत्रांमुळे आशाबाई अक्षरश: वैतागलेल्या हाेत्या. अखेर आशाबाईंनी त्या मजनूला पत्र लिहलं. तसं पाहिलं तर आशाबाई चाहत्यांच्या पत्रांनाही सहसा उत्तरं देत नव्हत्या कारण त्यांचं अक्षर खराब,  त्यामुळे पत्र लिहणं त्या टाळत हाेत्या. असं असलं तरी मजनूच्या वाढत्या प्रेमापुढं त्यांना झुकावं लागलं. ‘माझं लग्न झालेलं असून मी  मुलांची आई आहे, तुझी प्रेमपत्र माझा नवरा वाचताे आणि मला भांडताे. कृपा कर आणि अशी पत्रं पाठवायचं बंद कर’ असं आशाबाईंनी त्या मजनूला पत्रानं कळवलं. बिच्चारा मजनू पुन्हा अशी पत्र लिहायच्या भानगडीत पडला नाही परंतू त्यानंतर त्यापेक्षाही अवलीया मजनूने आशाबाईंचा चांगलाच पिच्छा पुरवला.

१९६० साली आशाबाई नुकत्याच ‘प्रभु-कुंज’ मध्ये रहायला आलेल्या हाेत्या. एक चाहता आशाबाईंची गाणी ऐकून त्यांच्या एकर्ती प्रेमात पडलेला हाेता. राेज रात्री हा मजनू आशाबाईंना  फोन करायचा आणि शेराेशायरी ऐकवायचा. कधी कधी आशाबाईंच्याच गाण्याच्या रेकाॅर्ड ताे आशाबाईंनाच फोनवर ऐकवायचा आणि आपण किती प्रेम करताे हे दाखवायचा. त्याच्या राेजच्या या फोनला आशाबाई कंटाळल्या हाेत्या. एके दिवशी असाच फोन आल्यावर आशाबाईंनी त्याला त्याचं नाव विचारलं तेंव्हा त्यानं नाव तर सांगितलंच पण आपलं वय २१ वर्षाचं असल्याचंही त्यानं सांगून टाकलं. आशाबाईंना यावेळी मात्र हसू आलं. आशाबाई त्याला म्हणाल्या, ‘बाबारे, तू माझ्यावर प्रेम वगैरे करताेस ते ठीक आहे पण मला तुझ्या वयाची मुलं आहेत हे तुला माहित आहे का..?’ खरं तर हे ऐकून त्यानं गपगुमान फोन ठेवायला हवा हाेता पण तसं झालं नाही. आशाबाई खाेटंच बाेलत आहेत असं त्याला वाटलं आणि त्यानं तसं बाेलूनही दाखवलं. अखेर आशाबाईंनी त्याला घरी येण्याचं निमंत्रण दिलं. तुला माझं घर माहित असेलच त्यामुळं तू घरीच का येत नाहीस? असं आशाबाईंनी त्याला विचारलं तेंव्हा ताे घरी यायला तयार झाला नाही. ताे म्हणाला, ‘मला माहित आहे तुम्ही मला घरी का बाेलवता आहात ते.. मला घरी बाेलावणार आणि बदडून काढणार...’ त्याची भीतीही रास्तच हाेती पण आशाबाईंनी त्याला विश्वास देत समजावले. ‘आम्ही सभ्य माणसं आहाेत, आम्ही असलं काही करणार नाही. तू त्याची भीती न बाळगता घरी ये..’असं अशाबाईंनी त्याला सांगितलं. अनेकदा विश्वास दिल्यावर त्याला जरासा धीर आला.

धाडस करून एके दिवशी हा मजनू थेट आशाबाईंच्या घरी पाेहाेचला. दिसायला हा तरूण देखणा हाेता. घरी आल्यावर ताे आशाबाईंकडे एकटक पहातच राहीला हाेता. आशाबाईंनी अधिक वेळ न दवडता आपल्या वर्षा, नंदू, हेमंत या मुलांना हाक मारली. आशाबाईंच्या हाकेबराेबर आतून ही तिन्हीही मुले तेथे आली. आशाबाई त्याला म्हणाल्या, ‘पाहिली का माझी मुलं! मी तुला सांगत हाेते पण तुला खरं वाटत नव्हतं. आता तरी खात्री पटली की नाही?’ सगळा पुरावाच समाेर आला हाेता. काय बाेलावं हे त्या मजनूला काही कळेनासं झालं हाेतं. ताे पहातच राहीला हाेता. आशाबाईंनी मुलांना आत जायला सांगितलं. मुलं आत गेली पण या मजनूला अजूनही विश्वास बसत नव्हता. ताे म्हणाला, ‘अहाे, तुमचा आवाज तर एवढा गाेड आहे मग तुमचं वय एवढं कसं..? आशाबाईंनी त्याला आपण आवाजासाठी घेत असलेल्या काळजीची आणि दक्षतेची माहितीही सांगितली. ताे पहातच राहीला हाेता. एवढं सगळं सांगितल्यावर या मजनूपासून आणि त्याच्या राेजच्या फोनपासून आपली सुटका हाेईल असं आशाबाईंना वाटलं. सगळं बाेलून झाल्यावर ताे जायलाही निघाला आणि जाता जाता ताे म्हणाला, ‘काही असाे,मी तुमच्यावर प्रेम करीतच राहणार...’ त्याचं हे बाेलणं ऐकून आता आशाबाई त्याच्याकडे पहात राहील्या आणि शेवटी मिस्कीलपणे म्हणाल्या,  ’प्रेम करताेस तर कर बाबा.. पण जरा लांबूनच, जास्त जवळ येऊ नकाे...’!                                                                      - अशोक गोडगे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !