BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ नोव्हें, २०२१

कार्यक्रम सरकारचा, निमंत्रण प्रवेशिका भाजपची !

 




पंढरपूर : पालखी मार्गाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सरकारी असला तरी निमंत्रण पत्रिका मात्र भाजपने काढली असून पंढरीच्या प्रथम नागरिक यांचा पत्ता मात्र कट करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

पालखी मार्गाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंढरीत येत असल्याच्या अफवा उठविण्यात आल्या होत्या, अर्थात यावर बहुसंख्यानी विश्वास ठेवला नव्हता. आता ८ नोव्हेंबर रोजी पालखी मार्ग भूमिपूजन सोहळा संपन्न होत असून या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हीसीद्वारे उपस्थित असणार आहेत. श्री संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग (हडपसर - जेजुरी- मोहोळ) श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (पाटस - बारामती - तोंडले ) या मार्गाचे भूमिपूजन होत आहे. हा सोहळा पंढरीत होत असून हा कार्यक्रम सरकारी आहे पण सोलापूर भाजपने "निमंत्रण पत्रिका" नव्हे तर "निमंत्रण प्रवेशिका" काढली आहे.



सरकारी कार्यक्रमात संपूर्ण नियोजन सरकारी असते पण अलीकडे शासनाच्या कार्यक्रमातही श्रेय घेण्यासाठी अनेकजण धडपड करीत असतात. हा प्रकार देखील श्रेय लाटण्याचाच आहे की काय असा सवाल सोशल मीडियावरून विचारला जाऊ लागला आहे. आज समाजमाध्यमावर ही निमंत्रण प्रवेशिका वेगाने व्हायरल होत आहे आणि त्याबरोबर अनेक जण यावर टीकाही करताना दिसू लागले आहेत. काहींनी याला हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. हा कार्यक्रम केंद्र सरकारचा असताना आणि राष्ट्रीय मार्ग प्राधिकरण या कार्यक्रमाचे नियोजन करीत असते. असे असताना सोलापूर भाजपने थेट पक्षाच्या नावावर निमंत्रण प्रवेशिका अशा नावाने  पत्रिका काढलेली आहे आणि ती व्हायरल देखील करण्यात आली आहे.  या पत्रिकेवर आयोजक म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष आणि सोलापूर शहराध्यक्ष यांची नावे आहेत. 

भाजपच्या अनेक नेत्यांची नावे या पत्रिकेत आहेत. सरकारी कार्यक्रम असल्याने प्रोटोकॉल म्हणून राज्यातील अनेक नेत्यांना उपस्थितीतचे निमंत्रण दिलेले असते पण या पत्रिकेवर केवळ भाजपच्याच नेत्यांची नवे आहेत त्यामुळे हा सरकारी कार्यक्रम असूनही केवळ एका पक्षाचा कार्यक्रम असल्याचा भास होऊ लागला आहे. विशेष म्हणजे या पत्रिकेत पंढरीच्या प्रथम नागरिक असलेल्या नगराध्यक्षा सौ. साधना भोसले यांचेही नाव नाही. भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात आघाडीवर असणाऱ्या आणि प्रचारात त्यांचा वापर करून घेणाऱ्या मंडळींनी त्यांच्या नावाचाही विचार केला नाही याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगराध्यक्ष यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असून सोशल मीडियाने जोरदार हल्ला चढवला आहे. 

एक चांगला कार्यक्रम पंढरीत होत असताना कार्यक्रम होण्यापूर्वीच तो अशा प्रकारे वादात सापडला आहे. हा प्रकार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही मान्य होणार नाही. नितीन गडकरी हे भाजपचेच आहेत आणि विरोधी पक्षातील लोकही गडकरी यांच्या कामाचे कौतुक तर करतातच. गडकरी कधीही पक्षीय वादात सापडले नाहीत की कुणावर टीका करीत बसले नाहीत. त्यांचे काम देशभर दिसत आहे. अकारण श्रेय घेण्याच्या प्रयत्नातून हा प्रकार झाला असावा अशीही शक्यता व्यक्त होत आहे.     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !