BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ नोव्हें, २०२१

पंढरपूर एस. टी. च्या धडकेत एकाचा मृत्यू ! तिघे जण जखमी !!





विटा : पंढरपूरकडून इस्लामपूरकडे निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाची बस आणि स्वीप्ट कार यांच्यात झालेल्या अपघातात वेळापूर येथील एकाचा मृत्यू झाला असून एकाच कुटुंबातील तिघेजण जखमी झाले आहेत. 

अलीकडे राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे अपघात वाढले आहेत. गेल्या काही दिवसात राज्यात एस टी चे अनेक अपघात होऊन कित्येकांचे प्राण गेले आहेत तर अनेकजण जखमी झाले आहेत. आता पुन्हा पंढरपूर - इस्लामपूर या बसला विट्याकडे येताना अपघात झाला. वेळापूर येथील कुटुंब स्विफ्ट कारने निघाले असताना हा अपघात झाला आहे. विजापूर- गुहागर मार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बस आणि स्विफ्ट कार यांच्यात धडक होऊन हा अपघात झाला आहे. 

इस्लामपूर आगाराची पंढरपूर- इस्लामपूर ही बस (एमएच ०७ / सी ९१७८) ही गाडी विट्याकडे येत होती. याच दरम्यान वेळापूर (माळशिरस) येथील रमेश निवृत्ती बनकर हे आपल्या कुटुंबासह कारने निघाले होते. भिवघाट मार्गाने ते आपल्या गावी निघाले असताना खानापूर तालुक्यातील सुलतानगादे येथे हा अपघात झाला. एस टी आणि बनकर यांची स्विफ्ट कर यांच्यात धडक झाली. समोरासमोर ही धडक झाल्याने कार चालवत असलेल्या रमेश बनकर यांना जोराचा मार लागला तर कारमधील त्यांची पत्नी आणि दोन लहान मुले जखमी झाली आहेत. रमेश बनकर यांच्या डोक्याला आणि छातीला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे तर तीस वर्षे वयाची त्यांची पत्नी साधना आणि सात वर्षे वयाची मुलगी सानवी, चार वर्षे वयाचा मुलगा सिद्धेश हे या अपघातात जखमी झाले आहेत. 

ऐन दिवाळीत बनकर कुटुंबावर अपघाताचे संकट कोसळले आहे. सदर अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून राज्य परिवहन महामंडळाच्या बसचेही मोठी नुकसान झाले आहे. एस टी चालक भैरू कांबळे याला विटा पोलिसांनी ताब्यात घेतले असून वेळापूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बस अलीकडे सतत अपघात करीत असून सुरक्षित प्रवासाचे ब्रीद कुठे गेले असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !