मुंबई : सोलापूरसह राज्यातील १३ जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला असून पुढील चार ते पाच दिवस पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पावसाळा संपून हिवाळा सुरु झाला तरी पावसाळ्याचे वातावरण अद्याप कमी व्हायला तयार नाही, सतत पावसाळी ढग येत असून कधी थंडी तर कधी उकाडा असे वातावरण निर्माण होत असतानाच आता हवामान विभागानेच याबाबत अंदाज व्यक्त करून पुढील चार पाच दिवस राज्यातील विविध जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर ऐन दिवाळीत राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. आता पुन्हा तो येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासूनचा हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे.
हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिली असून विजांच्या कडकडाटासह तीन ते चार तास पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हिवाळा सुरु झाला असला तरी हवामान हिवाळ्याचे नाही आणि आकाशात सतत ढगांची गर्दी दिसत आहे. दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याची माहिती समोर येत असतानाच अरबी समुद्रातही कमी दाबाचा पत्ता तयार झाला आहे. तो अधिकच सक्रीय होत असल्याने राज्यभरात पावसाळी वातावरणाचा अनुभव मिळत आहे. त्यामुळे आगामी चार ते पाच दिवस पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो. येत्या पाच दिवसांसाठी तीव्र हवामानाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे, त्यामुळे सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी कोसळतील तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या अंदाजामुळे शेतकरी वर्गात पुन्हा चिंतेचे ढग जमा होऊ लागले आहेत. या पावसाचा पेराण्यावर मोठा परिणाम होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा या अंदाजाकडे आणि आभाळाकडे लागले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !