BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ नोव्हें, २०२१

पंक्चर काढणाऱ्याने वाहन मालकालाच केले "पंक्चर" !




पुणे : मोठी भामटेगिरी करून एका पंक्चर काढणाऱ्याने एका दुचाकी धारकालाच पंक्चर केले आणि नंतर मात्र त्यालाही पोलिसांनी पंक्चर केल्याची वेगळीच घटना समोर आली आहे. 

हल्लीच्या काळात कोण कुणाला कशी टोपी घालेल आणि कोण कुणाला कधी शेंडी लावेल हे काही सांगता येत नाही. कष्ट न करता जास्तीत जास्त पैसे कसा मिळेल याकडे अलीकडे अनेकांचा कल वाढला आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकाराने गुन्हे करण्यात येऊ लागले आहेत. फसवणुकीचे अनके फंडे शोधले जातात आणि नंतर याचा उलगडा झाल्यानंतर आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. दुसऱ्याची फसवणूक करण्यासाठी अफलातून युक्त्या शोधल्या जातात त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक क्षणाला दक्ष असण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 

मोटार सायकलवरून प्रवास करताना टायर पंक्चर झाला तर काय करायचे ही भीती मनात असते, काही दुचाकींना सोबत एक टायर असतो पण बहुसंख्य दुचाकी केवळ दोन चाके घेऊनच धावत असतात. अशा वेळी रस्त्यात टायर पंक्चर झाला तर अनेक अडचणींचा सामना करण्याशिवाय पर्याय नसतो. आपण जात असलेल्या रस्त्यावर पंक्चर काढण्याचे दुकान असेलच असे नाही त्यामुळे मनात ही भीती असतेच आणि अशाच भीतीचा गैरफायदा उठवत एका पंक्चर काढणाऱ्याने इतरांना हाताशी धरून एक वाहनधारकाला गंडविले पण अखेर बिंग फुटले !

पुण्याच्या लोहगाव  येथे राहणाऱ्या संदीप शिंदे यांना एक धक्कादायक अनुभव आला. ते आपल्या दुचाकीवरून शिवाजीनगर येथून निगडीकडे निघाले असताना त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीवरील दोघांनी शिंदे याना थांबवले आणि तुमच्या गाडीच्या मागच्या चाकातील हवा खूप कमी झाली आहे असे माणुसकी दाखवत असल्याच्या थाटात सांगितले. ही बाब लक्षात आणून दिल्याबद्धल शिंदे यांनी त्या दोघांचे आभार मानले. मागून आलेल्या दुचाकीवरील दोघे एवढेच करून थांबले नाहीत तर त्यांनी शिंदे याना आणखी एक मदत केली. 

"पुढे गेल्यावर पंक्चरचे दुकान आहे, तेथे गेल्यावर दाखवा" असा सल्लाही त्या दोघांनी शिंदे याना दिला. साहजिकच शिंदे यांनी जवळच असलेल्या पंक्चरच्या दुकानात आपली दुचाकी नेली. दुकानदाराने गाडीचे चाक खोलून पंक्चर काढण्याचे नाटक सुरु केले आणि एकही पंक्चर नसलेल्या टायरमध्ये लोखंडी आणि अणकुचीदार टोच्या घेऊन तब्बल २६ पंक्चर केल्या आणि त्या काढल्या. २६ पंक्चर निघाल्याचे दाखवत शिंदे यांच्याकडून तीन हजार रुपये वसूलही केले. 

अखेर हा सर्व प्रकार पोलीस ठाण्यात पोहोचला आणि सगळे बिंग फुटले. संदीप शिंदे यांनी आपली कशाप्रकारे फसवणूक झाली हे नमूद करीत दुकान मालकासह चौघांच्या विरोधात खडकी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून बोपोडी येथील प्रशांत राजू वाघमारे, फांसीस सनी अमोलिक याना अटक केली. अन्य दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. अशी फसवणुकीची वेळ कुणावरही येऊ शकते म्हणून सावधान होण्याची गरज आहे.    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !