सोलापूर : अक्कलकोट- सोलापूर रस्त्यावर झालेल्या अपघातात सहा जणांचे बळी गेले असून यावर शिक्कामोर्तब झाले असून एस. टी. संपामुळेच पाच जणांचे प्राण गेले आहेत.
आज सोलापूर - अक्कलकोट रस्त्यावर झालेल्या अपघाताने सोलापूर जिल्हा हादरून गेला असून अपघात घडल्यानंतर नेमके किती जणांचे बळी गेले यावर एकमत होताना दिसत नव्हते परंतु हळूहळू हे चित्र स्पष्ट झाले असून पाच जण ठार झाले आहेत तर सात जण जखमी झाले आहेत. मृत झालेल्या व्यक्तींची ओळख पटली असून चार जण हे अक्कलकोट तालुक्यातीलच आहेत तर मृतातील एका महिलेची ओळख पटू शकली नाही. पाच मृतांपैकी तीन पुरुष आणि दोन महिला आहेत.
सहावा बळी !
अपघातातील मृतांची संख्या आता सहा झाली असून एका तरुण शिक्षकाचाही प्राण गेला आहे. २८ वर्षे वय असलेले आनंद युवराज लोणारी हे अक्कलकोट येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक होते. अपघातात ते जखमी झाले होते आणि उपचारावेळी त्यांचे निधन झाले.
कट्ट्याव्वा यलाप्पा बनसोडे (वय ५५), बसवराज यलाप्पा बनसोडे (वय ४२), आनंद इराप्पा गायकवाड (वय २५, ब्यागेहळळी, ता. अक्कलकोट ), लक्ष्मण मुरलीधर शिंदे (वय ४२ बनजगोळ, अक्कलकोट ) या चार जणांसह सुमारे ३५ वर्षाचे वय असलेली एक अनोळखी महिला असे पाच जणांचा मृतांत समावेश आहे. जखमीत अमरोद्दीन पिरजादे (वय ५०), अक्षय लक्ष्मण शिंदे (वय १९), आनंद युवराज लोणारी (वय २४), गुरुराज राजेंद्र वंजारे (वय २८), समर्थ प्रशांत अनंत (वय २०), सैपन इब्राहिम वाडीकर (वय ६०) यांचा समावेश आहे.
क्रुझर गाडीत अधिक प्रवासी बसवून ही गाडी भरधाव वेगाने सोलापूरकडे जात असतानाच उजव्या बाजूचा टायर फुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. गाडीतील प्रवाशी दूरवर फेकले गेले आणि गाडीचा चक्काचूर झाला आहे. मृतदेह रस्त्यावर आणि रस्त्याच्या बाजूलाही पडलेले होते आणि हे विदारक चित्र काळजाचा ठोका चुकवणारे होते. अपघात होताच आजूबाजूचे नागरिक धावत आले आणि त्यांनी अपघातग्रस्तांना शक्य ती मदत केली. यावेळी नागरिकांनी प्रशासनाच्या बेपर्वाईचा निषेध केला.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्याने एस टी वाहतूक पूर्ण बंद आहे. परिणामी खाजगी वाहनांची चलती आहे. खाजगी वाहनातून प्रवासी कोंबून वाहने धावताना दिसत असून एस टी च्या संपामुळेच पाच जणांचा बाली गेल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. एकाच वेळी पाच जणांचे बळी गेल्याने अक्कलकोट तालुक्यात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !