BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ नोव्हें, २०२१

विठ्ठल कारखान्याच्या कामगाराचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न !

✪ मोठी बातमी ✪ पराभवाचा असाही दणका ! पेट्रोल आणि डीझेलचे दर आज मध्यरात्रीपासून केले कमी... निवडणुकात सगळीकडे पराभव होताच दर घसरले ..! ✪


 पंढरपूर : आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ऐन दिवाळीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगाराने आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कारखाना कामगारांवर किती वाईट वेळ आली याचे दर्शनच घडले.

दिवाळीचा आनंदाचा आणि प्रकाशाचा उत्सव सुरु झाला आहे पण प्रकाशाच्या या उत्सवात गरीबाच्या घरी आणि मनातही अंधार आहे. एकीकडे दिवे आणि पणतीत तेल जळत असताना गरीबाच्या घरात मिरचीच्या पावडरवर घेण्यासाठीही तेलाची धार मिळत नाही. कुणाच्या बंगल्यावर रोषणाई लखलख करीत असताना कुणाच्या घरात मिणमिणता उजेडही नाही अशी विसंगती कायमच दिसत असते. एकीकडे दिवाळीचा आनंद साजरा केला जात असताना दुसरीकडे बाळंतपणासाठी आलेल्या मुलीसाठी खर्च करायला खिशात रुपयाही नाही म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या एका कामगाराने आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना समोर आली आहे. 

नेपतगाव येथे राहणारे अशोक दादा हेगडकर हे विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे अभियांत्रिकी विभागात सेवेत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसारत्यांना गेल्या अकरा महिन्यापासून कामाचे वेतन कारखान्याकडून मिळाले नाही. तीन वर्षापासून कामगारांना बोनसही दिला गेला नाही. एकंदर आर्थिक परिस्थिती हलाखीची बनली असताना त्यांची मुलगी बाळंतपणासाठी आणि दिवाळी सणासाठी घरी आली आहे आणि घरात रुपया शिल्लक नाही. आर्थिक परिस्थितीतला वैतागून त्यांनी कारखान्यावर जाऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणी ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे निघाले होते. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले. 


शेतकरी संघटनेचे माउली हळवणकर आणि इतरांनी हेगडकर यांची समजूत काढली आहे, त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम त्यांनी केल्याने 'आता आपण असे काही करणार नाही पण कारखान्याच्या चेअरमन यांनी आमच्या पैशाची व्यवस्था करावी अन्यथा पुढे जे घडेल त्याला त्यांना सामोरे जावे लागेल असे अशोक हेगडकर यांनी सांगितले. अशोक हेगडकर यांना गेल्या २२ महिन्यांपासून कारखान्याने एक रुपयाचे वेतन दिले नाही. या निराशेतून आत्महत्या करण्यासाठी ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर गेले होते. कर्मचारी अडचणीत असताना चेअरमन गेल्या दोन महिनांपासून बेपत्ता आहेत, ते कुठल्या कर्मचारी अथवा सभासदानाही सापडत नाहीत त्यामुळे कारखाना संचालक मंडळाचा आम्ही निषेध करतो असे शेतकरी संघटनेचे माउली  हळवणकर यांनी सांगितले. 

कामगारांची आर्थिक परिस्थिती वाईट असली तरी कुणीही आत्महत्या करण्याचा विचार मनात आणू नये, आपण लढा देऊन कामगारांचे पगार आणि उसाची बिले घेऊ, आम्ही या सर्वांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू असे अभिवचन हळवणकर यांनी दिले. उसाची बिले न मिळाल्याने आधीच शेतकरी हैराण झालेले असताना आता कर्मचारी टोकाचे पाऊल उचलू लागल्याचे आजच्या घटनेने समोर  आले आहे.    

विठ्ठल कारखाना प्रशासनाने याबाबत खुलासा करणे आवश्यक आहे. सदर कर्मचाऱ्याला कशामुळे वेतन मिळणे नाही ? या कर्मचाऱ्याचा काही दोष आहे की कारखान्याचा काही गोंधळ आहे? किती कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत आणि कशासाठी ? या सर्व प्रश्नांची उत्तरे किमान सभासदांना तरी मिळायला हवीत. शेतकऱ्यांचा राजवाडा अशा घटनांनी बदनाम होण्याची शक्यता असून चेअरमन आणि संचालक मंडळ यांनी याबाबत जाहीर खुलासा करण्याची आवश्यकता आहे अन्यथा एक जुनी संस्था बदनाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

✪ मोठी बातमी ✪ पराभवाचा असाही दणका ! पेट्रोल आणि डीझेलचे दर आज मध्यरात्रीपासून केले कमी... निवडणुकात सगळीकडे पराभव होताच दर घसरले ..! ✪

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !