BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ नोव्हें, २०२१

बँकेपाठोपाठ आता पोस्ट ऑफिसही फोडले !

 



मंगळवेढा : अलीकडे चोरांनी बँकांकडे आपला मोर्चा वळवला असून आता तर मंगळवेढा येथील पोस्ट ऑफिस फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. 

बंद घरांचे खिडक्या दारे तोडून आणि कडी कोयंडे उचकटून होणाऱ्या चोऱ्यात अलीकडे लक्षणीय वाढ झालेली आहे. घराला कुलूप लावणे म्हणजे चोरांना निमंत्रण देण्यासारखे ठरू लागले आहे. कुलुपबंद असलेली घरे शोधून रात्री त्या घरात चोर आपले प्रताप दाखवू लागले आहेत. दरवाजा, खिडक्या अशा जमेल त्या प्रकाराने चोर घरात घुसून बिनधास्त चोऱ्या करीत आहेत पण अलीकडे बँक आणि त्यांची एटीएम मशीन संकटात आली आहे. एटीएम मशीन फोडण्यापासून पळविण्यापर्यंत सगळेच प्रकार चोर करीत होते. आता तर बँकेत घुसून चोरी करण्याचे प्रकार घडू लागले आहेत. 


पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र बँकेवर भरदिवसा दरोडा टाकण्यात आला, त्यानंतर बुलढाणा येथेही असाच प्रकार घडला. सोलापूर जिल्ह्यातही सांगोला तालुक्यात रात्रीच्या वेळी बँक फोडण्यात आली आणि आता मंगळवेढा येथील पोस्ट ऑफिस फोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. मध्यवर्ती भागात असलेल्या संत दामाजी चौकात असलेल्या टपाल कार्यालयावर चोरट्यांची नजर गेली आणि खिडकीचे गज कटावणीने वाकवून लॉकर उघडण्याचा प्रयत्न झाला आहे. काल सकाळी बँकेच्या कर्मचाऱ्याने स्वच्छतेसाठी टपाल कार्यालय उघडले तेंव्हा त्याला धक्काच बसला. अस्ताव्यस्त पडलेली कागदपत्रे, उघडे कपाट त्याला दिसले आणि त्या पाठोपाठ त्याचे लक्ष खिडकीकडे गेले असता खिडकीचे गज कापलेले असल्याचे त्याला दिसले. 


कटावणी वापरून खिडकीचे गज काढून टाकून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि ट्रेझरी रूमला लावलेले कुलूप कोयंडा उचकटून काढण्यात आल्याचेही दिसून आले. चोरांनी आतपर्यंत तर कौशल्याने प्रवेश केला पण त्यांना लॉकर काही उघडता आले नाही. लॉकरमध्ये एक लाख रुपयांची रक्कम होती पण लॉकर न उघडल्याने त्यांना रित्या हाती परतावे लागले आहे. या घटनेची चर्चा सुरु झाली होती पण उदय वाघमारे यांनी फिर्याद दिल्यानंतर मंगळवेढा पोलिसात अज्ञात चोराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील टपाल कार्यालयात चोरांनी हा प्रयत्न केल्याने नागरिकांत चर्चा आणि घबराट पसरली आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !