BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ नोव्हें, २०२१

एका फटाक्यामुळे चिरला गळा आणि तरुणाचा झाला मृत्यू !


शिरूर (पुणे ) : दिवाळीचा आनंद घेत असताना एका  फटाक्यांमुळे तरुणाचा गळा चिरला आणि त्याचा अंत झाल्याची दुर्दैवी घटना ऐन दिवाळीत घडली आहे. 

फटाके हे सर्वदृष्टीने घातक असले तरी दिवाळीत ते फोडल्याशिवाय अनेकांना दिवाळीचा आनंद मिळत नाही. प्रदूषण रोखण्यासाठी फटाके फोडू नका असे आवाहन केले जाते शिवाय काही ठराविक फटाक्यांना बंदी आहे पण या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून फटाके फोडले जातात आणि त्यामुळे झालले नुकसानही नंतर समोर येते. तीन वर्षाच्या मुलाने फटाका गिळला त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुजरातमध्ये नुकतीच समोर आली तर हिंगोली येथे फटाका फोडताना झाल्याल्या एका अपघातात मुलगा जखमी झाला परंतु सुदैवाने त्याचा डोळा थोडक्यात बचावला. फटाक्यामुळे सतत एकापेक्षा एक अपघात घडत असलेल्या बातम्या समोर येत असतानाही फटाक्यांचा आवाज मात्र कमी होत नाही.

पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे तर फटाका फोडताना अगदीच विचित्र घटना घडली आणि यात एका तरुणाला आपला जीव गमाविण्याची वेळ आली.  रोहन अनिल मल्लाव हा २० वर्षे वयाचा तरुण दिवाळीचा जल्लोष करीत असताना अकल्पित अपघात घडला. तो फटाका फोडत असताना फटाक्यांमुळे जवळ पडलेला एक पत्रा उडाला आणि थेट या तरुणाच्या गळ्याला लागला. वेगाने गळ्यावर आलेल्या या पत्र्यामुळे त्याचा गळा चिरला आणि तो रक्तबंबाळ झाला. ऍटमबॉम्ब फुटताच पत्र्याचा एक तुकडा उडाला आणि थेट गळ्यात घुसला. या पत्र्याचा वेग एवढा होता की पत्र्याच्या एका तुकड्याने त्याचा पूर्ण जबडा कापला गेला आणि दुसऱ्याच क्षणी तो जमिनीवर कोसळला. 

रक्तबंबाळ अवस्थेतील या तरुणाला पाहून सुरुवातीला कुणाच्याच काही लक्षात आले नाही. अचानक हा काय प्रकार घडला हेच समजू शकत नव्हते. आजूबाजूला असलेल्या लोकांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत म्हणून घोषित केले. ऐन दिवाळीत आणि दिवाळीचा जल्लोष साजरा करताना त्याला आलेला हा मृत्यू पाहून परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले. केवळ एका फटाक्याने एक तरुणाचा काही क्षणात प्राण घेतला आणि ऐन दिवाळीत त्याच्या कुटुंबावर शोक करण्याची वेळ आली. फटाके फोडत असताना असे काही घडेल याची त्याला कल्पनाही नव्हती. अशा घटना विचारात घेऊन तरी फटाक्यांबाबत हजारदा विचार करण्याची वेळ आली आहे.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !