पंढरपूर : कोरोनामुळे बंद असलेले सोलापूर जिल्ह्यातील आठवडा बाजार आणि जनावरांचा बाजार आता सुरु होत असून जिल्हाधिकारी यांनी तसे आदेश काढले आहेत.
कोरोनामुळे पावणे दोन वर्ष जनजीवन ठप्प होते, किरकोळ बाजारापासून मंदिरापर्यंत सगळे काही बंद होते. गेल्या काही दिवसांपासून कोरोना परतीच्या प्रवासाला लागल्याचे दिसत असून राज्य शासनाने हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने निर्बंध उठविण्यास सुरुवात केली आणि आता बंद असलेले बाजार सुरु करण्यासाठीही परवानगी देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रकारचे आठवडा बाजार आणि जनावरांचे बाजार भरविण्यास परवानगी देणारा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला आहे.
सोलापूर आयुक्तालयाची हद्द वगळून हा आदेश २८ ऑक्टोबरपासून लागू होत आहे परंतु कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे लागणार आहे. कोरोनाच्या अनुषंगाने शासन तसेच जिल्हा प्रशासन यांनी घालून दिलेले नियम पाळणे बंधनकारक असून या नियमांचे पालन होते की नाही हे स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस प्रशासनाने पहायचे आहे. बाजार भरण्याच्या ठिकाणी मास्कचा वापर, सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर अशा सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ठरवून दिलेल्या नियमानुसारच आठवडा बाजार सुरु होतील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस प्रशासनाने दिलेल्या अटी आणि नियमांचे पालन करूनच आठवडा बाजार आणि जनावरांचे बाजार भरविण्यास मान्यता असणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !