पंढरपूर : ईडी, आयकर अशा संस्था गेल्या काही महिन्यांपासून रोजच्याच चर्चेत असताना आता पंढरपूर तालुक्यातील नेते आणि सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे नेते कल्याणराव काळे यांच्याविरोधात ईडी आणि आयकर विभागाकडे कोट्यवधीच्या घोटाळ्याची तक्रार करण्यात आली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून ईडी, आयकर सारख्या केंद्रीय यंत्रणा राज्यात अधिक चर्चेला आल्या आहेत, भाजपचे काही नेते या संस्थांकडे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या विरोधात सतत तक्रारी करीत आहेत पण पंढरपूर येथून राष्ट्रवादीच्याच माजी तालुकाध्याक्षांनी काळे यांच्यावर तक्रार केली असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.
राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी काळे यांच्यावर ३५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. काळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून सीताराम महाराज साखर कारखान्याचे शेअर्स देतो म्हणून शेतकरी, कामगार, शिक्षक, वाहन मालक अशा जवळपास १५ हजार लोकांकडून ३५ कोटी गोळा केले आणि घोटाळा केला असा गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हे चित्र पंढरपूर तालुक्यात आधीपासूनच पाहायला मिळत आहे पण आता तर राष्ट्रवादीच्या माजी तालुकाध्यक्ष असलेल्या ऍड. दीपक पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते असलेल्या कल्याणराव काळे यांच्या विरुद्ध थेट ईडी, आयकर विभाग, सेबी तसेच पोलीस यांच्याकडे मोठी तक्रार केली आहे.
लवकरच या प्रकरणाची चौकशीस सुरु होईल असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याचे ऍड पवार यांनी सांगितले तसेच या चौकशीत मोठा घोटाळा समोर येईल असेही पवार म्हणाले.
आरोप खोटे - काळे
असा कोणताही घोटाळा नसून आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपण पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत. शेतकऱ्यांनी अशा चुकीच्या आरोपांवर विश्वास ठेऊ नये असे सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी स्पष्ट केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !