राजकारण करू नका !
पालकमंत्र्याचं आवाहन
पंढरपूर : पोलिसांनी त्यांचे काम योग्य पद्धतीने केले आहे त्यामुळे अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी कुणी राजकारण करू नये असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
पंढरीतील एका अल्पवयीन मुलीवर सात दिवस अत्याचार झाल्याची तक्रार पोलीस पंढरपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आणि शहरात खळबळ उडाली. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पण या घटनेला राजकारणाची किनार चिकटू लागली. आ. गोपीचंद पडळकर यांनी पोलिसांवर तोंडसुख घेतले आणि महाराष्ट्र पेटण्याची भाषाही केली. पोलिसांनी या घटनेची तक्रार घेतली नसती अथवा गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली असती तरी आ. पडळकर यांचा संताप रास्त ठरला असता. आरोपी हा महाविकास आघाडीच्या एका नेत्याच्या संपर्कातील आहे, त्याने गुन्ह्यात सरकारी गाडीचा वापर केला असे आरोपही काहींनी केले होते.
पंढरपूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी विकास जाधव याला त्वरित अटक केली आणि या गुन्ह्याचा तपासही सुरु केला. सदर आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडीही देण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पोलिसांच्या कामाचे कौतुक केले आहे. पोलिसांनी त्यांचे काम केले आहे त्यामुळे पोलिसांना दोष देणे योग्य नाही, कुणी राजकारण करू नये अशा शब्दात भरणे यांनी सुनावले आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठीही आपण प्रयत्न करू असे त्यांनी म्हटले आहे.
या घटनेतील आरोपीने सरकारी गाडी वापरल्याचाही मोठा आरोप करण्यात आला होता पण या घटनेत आरोपीकडे सरकारी गाडी नव्हती, त्याने दुचाकींचा वापर केला असून ही दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी त्यांचे काम चोखपणे बजावले आहे असा खुलासा करीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पोलिसांच्या कामाचे कौतुक केले आहे. भरणेमामांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचा विषय उपस्थित केला आहे. हा विषय केवळ पत्रकारपरिषदेपुरता मर्यादित न राहता यासाठी जलदगतीने हालचाली होण्याची गरज आहे. या मागणीसाठी राजकीय, सामाजिक संघटनाही आवाज उठवतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सह आरोपी कोण ?
या घटनेतील सहआरोपी कोण आहेत आणि पोलीस त्यांना कधी अटक करतात याकडे आता लक्ष लागले आहे. सात दिवसात या घटनेत कोण सहभागी आहेत आणि या गुन्ह्यात कशी मदत केली याची माहिती बाहेर येण्याची प्रतीक्षा उरली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !