BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ ऑक्टो, २०२१

धावत्या एस टी बसने घेतला पेट आणि --

 



    एस. टी. पेटली,

    प्रवासी बचावले 

    सातारा : रस्त्यावर धावती बस अचानक पेटल्याने प्रचंड गोंधळ उडाला पण चालकाने राखलेल्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका झाला नाही. या आगीत बस  मात्र पूर्णपणे जळून खाक झाली आहे. 

    उन्हाळ्यात खाजगी वाहने पेटल्याची अनेक उदाहरणे आहेत. गाडी धावत असतानाच धूर येऊन नंतर गाडी पेटल्याच्या काही घटना आजवर घडल्या आहेत पण राज्य परिवहन महामंडळाच्या बसबाबत अशा घटना आपल्या ऐकिवात नसतात. पुणे बंगळूर महामार्गावर आनेवाडी टोळनाक्याच्या जवळ मात्र रात्री अशी घटना घडल्याचे समोर आले आहे. कोल्हापूरकडून पुण्याकडे निघालेली राज्य परिवहन महामंडळाची बस अचानक पेटल्याने एकच गोंधळ उडाला.   

    कोल्हापूर - अर्नाळा ही एस टी  (MH 09 FL 09983) कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघाली असता सातारा येथील बस स्थानकात पोहोचली. येथे काही वेळ थांबल्यानंतर ती पुण्याच्या दिशेने रवाना झाली. आनेवाडी टोळ नाक्याच्या जवळ आल्यावर मात्र बसमधून धूर येत असल्याची जाणीव चालकास झाली त्यामुळे त्यांनी तत्काळ बस महामार्गाच्या कडेला घेऊन थांबवली आणि प्रवाशांना खाली उतरवले. अचानक काय प्रकार घडला हे प्रवाशांच्या लक्षात आले नाही पण त्यांच्यात गोंधळ उडाला.

    चालकाने प्रवाशांना तातडीने खाली उतरवले आणि प्रवाशी खाली उतरताच बसने पेट घेतला. काही क्षणातच या आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण एस टी बस या आगीत जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाची यंत्रणा पोहोचली पण बस पूर्ण जळून गेली, जीवितहानी न झाल्यामुळे समाधान व्यक्त होत असतानाच चालकाला धन्यवाद दिले जात आहेत.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !