मोहोळ : भीमा सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड केली असून थकित असलेली संपूर्ण एफआरपी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.
राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाची संपूर्ण बिले अद्याप दिली नसल्याने कारखाना आणि शेतकरी यांच्यातील संबंध बिघडलेले आहेत. सहकारी साखर कारखाने हे स्थानिक राजकारणाची प्रमुख केंद्रे असतात शिवाय शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासात केंद्रस्थानी असतात. अनेक कारखान्यांचे दुसरे गळीत हंगाम सुरु झाले असले तरी मागील हंगामातील उसाची बिले कारखान्यांनी दिलेली नाहीत त्यामुळे शेतकरी अडचणीत आले असून ऐन सणासुदीच्या दिवसांत तर आर्थिक अडचणी अधिक वाढल्या आहेत. मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याने मात्र संपूर्ण थकित एफआरपी ऊस पुरवठादारांच्या खात्यावर वर्ग केला असल्याने शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत केले आहे आणि कारखाना संचालक मंडळाचे आभार मानले आहेत.
थकीत असलेला २८ कोटींचा एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर गावागावात फलक लावून कारखान्याचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक सभासदांना दिवाळीसाठी २५ किलो साखर वाटप सुरु करण्यात आले असून कामगारांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्यात आला आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने या कारखान्याने सगळ्यांचीच दिवाळी गोड केली आहे. दिवाळीपूर्वीच आनंदाचे वाटप या कारखान्याने केले आहे. अनेक कारखान्याच्या दारात शेतकरी आकांत करीत असताना भीमा साखर कारखान्याने आपली एक वेगळीच चमक आणि धमक दाखवून दिली आहे.
पुळूज, टाकळी, तारापूर, अंकोली, पेनूर, कुरुळी, इंचगाव, ब्रह्मपुरी, कामती अशा गटनिहाय साखरेचे वाटपही सुरु असून थकित एफआरपी आणि साखर ऐन दिवाळीच्या सणात मिळाल्याने शेतकरी आनंदित आणि समाधानी असून कारखाना चेअरमन आणि संचालक मंडळाला धन्यवाद मिळू लागले आहेत.
साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची बिले दिली की स्थानिक बाजारपेठ फुलून जातात. तालुक्याच्या बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिसू लागते. भीमा कारखान्याने उसाची बिले दिल्याने ऐन दिवाळीत बाजारपेठेत गजबज दिसू लागली असून सुनी सुनी पडलेली दुकाने ग्राहकांनी भरून जाऊ लागली आहेत. एकेकी चलन गतिमान होऊ लागले असून कोरोनाच्या काळात मंदावलेली परिस्थिती हळूहळू सुधारताना दिसू लागली आहे. आर्थिक अडचणीत गुदमरलेला शेतकरी काहीसा मोकळा श्वास घ्यायला लागला असून शेतकरी कुटुंबाच्या चेहऱ्यावर टवटवी आल्याचे दिसू लागले आहे . अन्य कारखान्यांनी असाच प्रयत्न केला तर कोमेजून गेलेले शेतकरी पुन्हा ताजेतवाने होतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !