पुणे : महाराष्ट्र बँकेच्या पिंपरखेड शाखेवर भरदिवसा दरोडा टाकून कोट्यवधीचा
ऐवज लुटून पसार झालेल्या पाचही दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत तसेच
त्यांचाकडून लुटीतील सोने आणि रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत भरदुपारी हा दरोडा पडला होता. बँकेचे व्यवस्थापक, रोखपाल आणि अन्य दोन कर्मचारी काम करीत बसले होते, दहा ते बारा ग्राहक बँकेत उपस्थित होते, एवढ्यात पांढऱ्या रंगाच्या सियाज कारमधून पाच जण आले आणि थेट बँकेत शिरले. या पाच जणांपैकी चार जण आत आले तर एक जण दरवाजात थांबून राहिला. त्यानंतर चौघेजण थेट केबिनमध्ये घुसले आणि व्यवस्थापक आणि रोखपाल यांना पिस्तुलाचा धाक दाखवला. मारून टाकण्याची धमकी देत त्यांचाकडून लॉकरच्या चाव्या घेतल्या. दोन कोटी रुपयांचे सोने आणि ३१ लाखाची रक्कम घेऊन परत त्याच गाडीतून पळूनही गेले.
दरोड्याचा संपूर्ण प्रकार हा बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले जवळपास पाच आरोपी हे बँकेत शिरले. ते चारचाकी वाहनातून आले होते. त्यांनी तोंड बांधलं होतं. ते बँकेत शिरले तेव्हा त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत सर्व कॅश पिशवित भरुन द्यायला सांगितली. तसेच त्यांनी बँकेच्या लॉकरमधील सर्व सोनं पिशवीत भरुन चारचाकी गाडीतून पळवून नेलं होतं. या दरोड्यामुळे पुणे जिल्ह्यासह बँकिंग क्षेत्राताही खळबळ उडवून दिली होती. या घटनेनंतर जालना येथेही बँकेवर दरोडा पडल्याची घटना घडली आहे.
पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेतून या दरोडेखोरांनी ३२ लाख ५२ हजार ५६० रुपयांची रोख रक्कम आणि २ कोटी ४७ लाख २० हजार ३९० रुपये किमतीचे ८२४ तोळे सोने पळवले होते. एकूण २ कोटी ७९ लाख ७२ हजार ९५० रुपयांचा ऐवज या दरोड्यात दरोडेखोरांनी लांबवला होता. त्यापैकी २ कोटी १९ लाखांचे सोने आणि १८ लाखांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. डॉलर ऊर्फ प्रविण सिताराम ओव्हाळ (रा. वाळद, खेड), अंकुर महादेव पावळे (रा. कावळपिंपरी, ता. जुन्नर), धोंडीबा महादु जाधव (रा. निघोज कुंड ता. पारनेर, नगर), आदिनाथ मच्छिद्र पठारे (रा. पटारवाडी, ता. पारनेर, नगर), विकास सुरेश गुंजाळ (रा. टाकळी हाजी, ता. शिरूर) या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींना पकडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी दहा पथके तयार केली होती. या पथकांनी अवघ्या काही दिवसांत या दरोड्यातील आरोपींना गजाआड केले.
दोन दिवसांपूर्वीच
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथील बुलढाणा अर्बन बँकेवर भरदिवसा
दरोडा पडण्याची घटना घडली आहे. येथेही पिस्तुलाचा धाक दाखवत रक्कम आणि दागिने
लुटण्यात आले होते. कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत २५ लाखाच्या रकमेसह सोने
लुटण्यात आले आहे. हातात शस्त्र आणि तोंडाला रुमाल बांधून तीन चोरट्यांनी ही लुट
केली होती. या घटनेशी पकडल्या दरोडेखोरांचा काही हात आहे काय ? त्यांच्याकडून या चोरीच्या तपासात काही
दिशा मिळतेय काय ? याकडेही लक्ष लागले
आहे. भरदिवसा बँकेत अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात घडत नाहीत पण यावेळी एका
आठवड्यात अशा दोन घटना समोर आल्या आहेत, त्यामुळे बँकांना अधिक सतर्क राहण्याची गरज
निर्माण झाली आहे.
आत्तापर्यंत बँकेच्या बाहेर चोऱ्या होत होत्या, ग्राहक बँकेतून बाहेर येताच त्यांच्यावर पाळत ठेवून आजवर अनेक चोरीच्या घटना घडल्या असून अजूनही असे प्रकर घडत असतात पण आता थेट बँकेत घुसून भरदिवसा दरोडे टाकण्याचे प्रकार समोर येऊ लागले असून ही निश्चित चिंतेची बाब आहे. बँक सुरक्षिततेची एवढी काळजी घेत असते, मदतीसाठी अलार्म यंत्रणा असते तरीही चोर चोरी करून जातात आणि अलार्म वाजत नाही की सुरक्षेची कोणती यंत्रणा कामाला येत नाही. कामाला येत नसलेली यंत्रणा काय कामाची असा सवाल उपस्थित झाला तर आश्चर्य वाटण्याचेही कारण नाही. पुन्हा पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी काही ठोस उपाय योजण्याची गरज असल्याचे मात्र या घटनांनी अधोरेखित केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !