BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० ऑक्टो, २०२१

पंढरपूरच्या तरुणाचा पोलिसांना 'टोपी' घालण्याचा प्रयत्न उघड !




सोलापूर : पोलीस भरतीत पोलीसानाच 'टोपी' घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंढरपूरच्या एका तरुणाला पोलिसांनी बरोबर पकडले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस होण्याच्या प्रयत्नात त्याला आरोपी होण्याची वेळ आली आहे. 

पोलीस भरतीसाठी अनेक तरुण रोज व्यायाम आणि अभ्यास करीत असतात. एवढे करूनही पोलिसात भरती होण्याची संधी मिळेलच याची खात्री नसते. भरतीच्या वेळी आपले वजन, उंची आणि छाती योग्य प्रमाणात दिसावी यासाठी अनेकजण अनेक युक्त्या करीत असतात आणि त्यांचे बिंग नेमके आयत्यावेळी फुटते. आतापर्यंत अशा अनेक घटना उघडकीस आल्या असून पोलीसांचा गणवेष अंगावर येण्याआधी तुरुंगात जाऊन बसावे लागते. हा अनुभव असला तरी तरुण नोकरीच्या आशेने अशा काही अनुचित मार्गाचा अवलंब करतात आणि फसतात. सोलापूर पोलिसांच्या भरतीत पंढरपूर तालुक्यातील तरुण असाच अडकला आणि गजाआड जाऊन बसला आहे. 

सोलापूर आयुक्तालयासाठी सद्या सोलापूर येथे पोलीस भरती सुरु आहे. या भरती प्रक्रियेत उमेदवार तरुणांची मैदानी चाचणी सुरु झाली तेंव्हा पंढरपूर तालुक्यातील शेवते येथील प्रभुराम प्रकाश गुरव या तरुणाने पोलिसांची फसवणूक करण्याचा केलेला प्रयत्न उघडकीस आला. भरतीच्या वेळी आपली उंची योग्य प्रमाणात समोर यावी म्हणून या तरुणाने डोक्यावर केसाचा विग लाऊन उंची वाढविण्याचा प्रयत्न केला होता पण तो यात फसला. या फसवणूक प्रकरणी त्याच्या विरोधात जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची उंची आणि छाती मोजण्याची जबाबदारी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांच्याकडे होती. यावेळी पंढरपूर तालुक्यातील शेवते येथील प्रभुराम गुरव यांची उंची मोजण्याची प्रक्रिया सुरु झाली. उंची मोजताना पोलीस निरीक्षक बहिरट यांना काही शंका आली. गुरव याच्या डोक्यावरील केस अधिक आणि बाजूचे केस कमी दिसल्याने त्यांचा संशय बळावला. बहिरट यांनी त्याच्या केसात हात घातला असता त्यांच्या हातात केसाचा विग आला आणि उंची वाढविण्यासाठी गुरव याने केलेली भामटेगिरी उघडकीस आली. 

पोलिसांच्या भरतीसाठी उमेदवाराची उंची १६५ सेमी असणे आवश्यक असते परंतु गुरव याची उंची १६३.७ एवढी होती. डोक्यावरील केसाच्या विगसह त्याची पोलिसांनी मोजणी केली असता १६४.५ सेमी असल्याचे दिसले होते. बनावटगिरी करूनही त्याची उंची भरतीयोग्य नव्हती. खोटेपणा करूनही आवश्यक उंची त्याला करता आली नव्हती. त्याने डोक्यावर लावलेला विग पोलिसांच्या लक्षात आला असता तरीही विगसह उंची कमीच भरत होती त्यामुळे तो भरतीत पात्र ठरणार नव्हता, तरीही त्याने हा प्रकार केला आणि नोकरी तर मिळालीच नाही पण नावावर एक गुन्हा दाखल झाला आणि तुरुंगात जाऊन बसावे लागले. पोलीस भरतीत उंची दाखविण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याने त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

उंची वाढविण्यासाठी असाच प्रकार नाशिक पोलीस भरतीवेळी घडला होता आणि त्या तरुणाला अशाच प्रकारे पकडण्यात आले होते. भरतीवेळी उंची वाढविण्यासाठी एका तरुणाने पायाला पाच रुपयांचे नाणे चिकटवले होते. भरतीच्या प्रक्रीयेवळी तो अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत तो दिसत होता त्यामुळे त्याच्यावरील संशय बळावला होता आणि यातूनच त्याचे पितळ उघडे पडले आणि आयताच पोलिसांच्या तावडीत सापडला होता. रेल्वे पोलिसांच्या भरतीत एका तरुणीने डोक्यावर मेंदी लाऊन उंची अधिक दाखविण्याचा प्रयत्न केल्याही घटनाही समोर आली होती. अशीच घटना आता सोलापूर आयुक्तालयाच्या पोलीस भरतीत समोर आला.  

तरुणाने हा गुन्हा केला असला तरी दुसरीकडे बेकारी हे मोठे वास्तव या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही, पदवीधर आणि अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले तरुण शिपाई, चौकीदार अशा पदांसाठी रांगेत उभे राहतात हे भयावह वास्तव आहे. काही करून कसली का होईना नोकरी मिळावी यासाठी प्रत्येक तरुण धडपडत असतो पण वय निघून जातं तरी नोकरी मिळत नाही. नोकरी मिळाल्याशिवाय विवाह जुळत नाहीत अशा दुष्टचक्रात तरुण सापडलेला असून त्यातून अशा घटना घडतात. तरुणाने केलेला हा प्रकार कायद्याने गुन्हा असून गैरप्रकारच आहे पण त्याची दुसरी बाजूही यानिमित्ताने समोर येत आहे.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !