BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ ऑक्टो, २०२१

बाप रे ! सोलापुरात पेट्रोलपेक्षाही महाग झाल्यात शेवग्याच्या शेंगा !

✪➤ 'लालपरी'ही रुसली ! ✪➤ आता गरीबाच्या प्रवासाची एस टी देखील महागली !✪➤ उद्यापासून तब्बल १७ टक्क्यांनी तिकीट दर महागले ! ✪➤ दिवाळीत पाच रुपयांनी तिकीट दर वाढवले आणि ही वाढ आज मध्यरात्रीपासून लागू !


पेट्रोलपेक्षा महाग 

शेवग्याच्या शेंगा 

सोलापूर : सर्वसामान्य माणूस आगीने होरपळला असताना गॅस आणि इंधनाच्या दराला आग लागली आहे आणि आता रोजच्या ताटातल्या भाज्याही भडकल्या असून सोलापुरात पेट्रोल डिझेलपेक्षाही शेवग्याच्या शेंगा आणि वांगी महाग झाली आहेत. 

अच्छे दिन येण्याची वाट पाहत सर्वसामान्य माणूस केंव्हाच थकून गेला आहे, इंधनाचे दर काँग्रेस सरकारच्या काळापेक्षा कमी होतील अशी दाखवलेली स्वप्नं देखील आभासी निघाली. आजच्यापेक्षा कितीतरी स्वस्त दरात गॅस आणि इंधन काँग्रेस शासन काळात मिळत होते तरीही भारतीय जनता पक्ष इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलने करीत होता आणि आज मात्र या दरवाढीचे समर्थन केले जात आहे. महागाईचे राजकारण होत असले तरी सामान्य माणूस आता पुरता कोलमडून पडला आहे. वाहने चालवणे आणि गॅसवर स्वयंपाक करणं हे आता आवाक्याबाहेर गेले आहे. या महागाईचे चटके बसत असताना सोलापुरातून धक्का देणारी माहिती आज समोर आली आहे. पेट्रोल आणि डिझेल यांच्यापेक्षाही शेवग्याच्या शेंगा, वांगी महाग झाली असून अन्य भाजीपालाही सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.   

सणासुदीच्या दिवसात घरातला खर्च भागवणे एक आव्हान असताना एरवी सामान्य वाटणारा भाजीपाला खाणेही अशक्य असल्याचेच आज दिसून आले आहे. शेवग्याच्या शेंगांचा दर शंभर ते एकशे वीस रुपयांवर पोहोचला असून वांगी ८० ते १०० रुपयांनी खरेदी करावी लागत आहेत. ५ ते १० रुपयांना मिळणारी कोथिंबीर पेंडी ५० रुपयापासून ७० रुपयापर्यंत महाग झाली आहे. मेथीची जुडी ४० रुपये तर शेपूची पेंडी ६० रुपयाला मिळू लागली आहे. तोंडली, फ्लॉवर ८० रुपये, टोमॅटो ४०, बटाटा ६० तर  भेंडी ७० रुपये, कोबी ४०, गवार ६०, बीट ५०, गाजर ६०,  सिमला मिरची ६०, काकडी ३० तर मिरची ४० रुपये असे अवास्तव आणि अविश्वसनीय दर पाहायला मिळू लागले आहेत. 

अतिवृष्टी आणि वाढलेले इंधनाचे दर यामुळे ही भाववाढ झाली असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना भाजीपाला दर ऐकून पिशवी रिकामी ठेवूनच घरी परतण्याची वेळ आली आहे तर काही ग्राहक एक किलोऐवजी पाव किलो भाजीवरच समाधान मानू लागले आहेत. डाळी, उसळी यावरच भूक भागविण्याची वेळ सामान्य जनतेवर आली आहे. गॅस, इंधन, खाद्य तेल याना आधीच आग लागलेली असताना भाजीपाला एवढा महागला असल्याने मध्यमवर्गीयांचे आर्थिक गणित बिघडले असून 'अच्छे दिन' ची चर्चा पुन्हा समोर आली आहे.  

कोरोनामुळे सगळे अर्थचक्र जागीच थांबून राहिल्याने आणि उद्योग व्यवसाय बंद राहिल्याने बाजारातील परिस्थिती कठीण बनली आहे. लोकांच्या हातात पैसा उरलेला नाही आणि ही परिस्थिती सुधारण्यासाठी आणखी बराच काळ जावा लागणार आहे. आता उद्योग व्यापार सुरु असला तरी लोकांचे खिसे रिकामे असल्याने बाजारात गर्दी दिसत नाही. गरजेपुरतीच खरेदी करण्याकडे लोकांचा कल आहे त्यामुळे व्यवसायात मंदी आल्याचे दिसत आहे. ग्राहक गरजेपुरतीच खरेदी करीत आहे आणि त्यातही वाढत्या महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत. हे चटके सहन करण्याची सामान्य नागरिकांची सद्या तरी परिस्थतीत दिसत नाही. प्रत्येक वस्तू सद्या महागाईत गुदमरलेल्या असून जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यापुरतीही नागरिकांची क्षमता उरलेली नाही. अशा परिस्थितीत भाजीपालाही अचानक प्रचंड महागला तर खायचे काय ? हाच प्रश्न चघळत बसावा लागणार असल्याचे दिसत आहे.      


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !