BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ ऑक्टो, २०२१

पंढरीत पुन्हा चोरी, बंद असलेल्या घरांवर डोळा !






पंढरपूर :  उपनगरातील बंद घरांना पुन्हा एकदा टार्गेट करण्यात आले असून पुंडलिक नगरात पुन्हा एकदा चोरीची घटना घडली असून आता नागरिकांनीच आपल्या सुरक्षेची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

पंढरपूर शहराचा विस्तार झपाट्याने होत असून सातत्याने नवनवी उपनगरे वसली जात आहेत. अंधाराचे साम्राज्य आणि विरळ लोकवस्ती याचा फायदा उठवत चोर चोऱ्या करून पसार होतच आहेत पण बंद असलेली घरे म्हणजे चोरांना निमंत्रण ठरू लागले आहे. सांगोला मार्गावर अलीकडेच बंद घर फोडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली होती. आता पुन्हा पुंडलिक नगर येथील बंद घरात चोरी करण्यात आली आहे. याच उपनगरात काही दिवसांपूर्वी गोविंद रघुनाथ तथा बंडोपंत सबनीस यांच्या बंद असलेल्या घरात चोरट्यांनी हात साफ केला होता. पोलिसांनी या चोरीचा छडा लावला होता. 

रेल्वे स्टेशनच्या जवळच असलेल्या पुंडलिक नगर येथे पुंडलिक नगर येथे राहणारे सुरेश दर्शने यांच्या बंद घरात घुसून चोरट्यांनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. दर्शने हे घराला कुलूप लावून सहकुटुंब परगावी गेले होते, ही संधी चोरट्यांनी साधली आहे. त्यांच्या घराची कुलुपे उचकटलेली असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळाली. दर्शने यांचे नातेवाईक अमेश न्यायाधीश यांनी जाऊन पाहणी केली असता चोरांचा प्रताप दिसून आला. दर्शने यांच्या घरातून २५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला असून बँकेची काही कागदपत्रांचीही चोरी झाली आहे. चांदीच्या गणपतीच्या दोन मूर्ती, चांदीचा पेला, वाटी असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. याबात पोलिसात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पंढरपूर शहर आणि उपनगरातील अलीकडील काही चोऱ्या पहिल्या असता बंद असलेल्या घरांवर चोरट्यांचा डोळा असल्याचे दिसून येत आहे. घराला कुलूप लाऊन परगावी गेल्यानंतर चोरी होताना दिसत आहे. नागरिकांनी ही बाब लक्षात घेण्याची गरज आहे.  वाढत्या उपनगरात लोकवस्ती विरळ असते आणि  वीज पुरवठाही पुरता सक्षम नसतो. पंढरपूर शहराच्या सर्वच बाजूनी नवनव्या वसाहती वाढत आहेत, शहराची लोकसंख्या वाढत आहे पण त्या तुलनेत पोलीसांची संख्या वाढत नाही. पंढरपूर शहरात अलीकडेच एका पोलीस ठाण्याची भर पडली आहे शिवाय करकंब येथे स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण केल्यापासून पंढरपूर तालुका पोलीसावरील मोठा ताण कमी झाला आहे. असे असले तरी कार्यक्षेत्र आणि पोलिसांची संख्या हा तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे. उपलब्ध पोलीसबळावर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. त्यामुळे नागरिकांनीच सतत सतर्क असण्याची गरज आहे. 

नागरिकांनी शक्यतो घराला कुलूप लावून परगावी जाऊ नये अशी परिस्थिती आहे, अत्यावश्यक कारणासाठी घर सोडायचे असल्यास घरी कुणीतरी थांबतील अशी व्यवस्था करूनच परगावी जाने श्रेयस्कर ठरणार आहे. शिवाय घरात दागिने अथवा रोकड रक्कम अधिक प्रमाणात ठेवणे टाळण्याची गरज आहे. घराबाहेर पडताना शेजाऱ्यांना सूचना देण्याची आणि घराकडे लक्ष ठेवण्यास सांगण्याची गरज आहे. सतत होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी नागरिकांनी आपल्या पातळीवर विशेष दक्षता घेतली तर काही प्रमाणात का होईना पण चोरीचे प्रमाण कमी होऊ शकते.      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !