BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ ऑक्टो, २०२१

घरगुती गॅस दुर्घटना झाल्यास मिळतो पन्नास लाखाचा विमा !



नवी दिल्ली : घराघरात गॅसचे सिलेंडर असते पण माहिती मात्र नसते. घरगुती गॅस संदर्भात काही अपघात घडल्यास ग्राहकाला तब्बल पन्नास लाखाचा विमा मिळू शकतो पण याबाबत बहुसंख्य ग्राहकांनी माहिती नसते. 

रानावनातून सरपण गोळा करून घरात चुलीवर स्वयंपाक करण्याची आपली पारंपरिक पद्धत बदलत गेली आहे. चुलीवरच्या स्वयंपाकाचा कंटाळा आलेल्या गृहिणींसाठी घासलेटवर चालणारा स्टोव्ह आला आणि महिला आनंदल्या. चुलीला जाळ घालत बसण्याची आणि फुंकून जाळ लावताना नाका तोंडात धूर जाण्याची वेळ या स्टोव्हने संपवली होती. चुलीला जाळ लावता लावता अनेक माय माउलींच्या डोळ्यांना धुराचा अपाय होत होता. त्यानंतर एलपीजी गॅस आला तेंव्हा तर सर्व काही स्वप्नवत वाटत होतं पण गॅस कनेक्शन मिळवणं हे देखील चुलीला जाळ लावण्याइतकंच कठीण होतं. गॅस कनेक्शन सहजासहजी मिळत नव्हतं आणि त्यामुळं तर त्याचं महत्व आणखी वाढलं होतं. 

हळूहळू स्टोव्ह घराच्या कोनाड्यात आणि नंतर अडगळीत जाऊन पडला आणि स्वयपांकघरात गॅस शेगडी दिसू लागली. लालबुंद रंगाचा गॅस सिलेंडर रुबाबात अनेकांच्या किचनमध्ये जागा घेऊ लागला. 'आमच्या घरी गॅस आहे' असं अभिमानानं आणि मोठया कौतुकानं महिला एकमेकीला सांगू लागल्या. ज्यांच्याकडे अजून गॅस आलेला नाही अशा महिला 'आपलंच नशीब फुटकं' म्हणत स्वतःला दोष देत नवरोबाच्या मागे लागू लागल्या. असाही एक काळ होता पण आज घराघरात गॅस असून तो आता पूर्ण सामान्य बनून गेला आहे. 

घराघरात गॅस असला आणि आता त्याचं पूर्वीएवढं अप्रूप उरलं नसलं तरी सिलेंडरच्या वाढत्या दरानं गृहिणींना कडाक्याच्या थंडीतही घाम सुटू लागला आहे हे मात्र नक्की ! गॅस संपत आला की गृहिणी आता हजार रुपयांची तजवीज करायला सुरु करू लागली आहे.  लायटर पेटवला की गॅसची शेगडी सुरु होते आणि मग झटपट चहा बनावट येतो. पण चहा बनविणे जेवढे सोपे तेवढे गॅस वापरणे सोपे नाही. गॅस वापरात थोडीशी चूक केली तर जीवावर बेतू शकते हे मात्र नक्की ! अनेकांचे प्राण देखील या गॅसने घेतले आहेत. घरं दारं पाडून टाकली आहेत या गॅसने ! खरं तर वापरकर्त्याच्या चूकीनेच असे अपघात घडतात म्हणा ! पण काही असो, घरात गॅस सिलेंडर आले की पुरती काळजी आणि दक्षता तर घेतलीच पाहिजे शिवाय गॅस वापराचे ज्ञानही ! गॅसच्या वजनाचेही आणि सुरक्षिततेचेही !!

एवढे सगळे करूनही कधी काही होईल हे मात्र सांगता येत नाही. अनेकदा घरात सिलेंडरमधून गॅस गळती सुरु होते तर कधी गॅस सिलेंडरचा स्फोट ! घरातच असे काही घडले तर घबराट आणि गोंधळ तर होणारच. दुर्दैवाने कधी गॅस सिलेंडरचा स्फोट जाहला आणि काही अघटित घडले तर आर्थिक मदत मिळत असते हेच बहुसंख्य ग्राहकांना माहित नसते. गॅस ग्राहकाने गॅस संदर्भात सगळीच माहिती आपल्या जवळ ठेवणे आपल्याच हिताचे ठरत असते. 

ग्राहक जेंव्हा एलपीजी कनेक्शन घेतो तेंव्हाच कंपनी ग्राहकांना ऍक्सीडेन्ट कव्हर उपलब्ध करून देत असते पण हे आपल्याला माहीतच नसते. या कव्हरमुळे गॅस गळती किंवा गॅस सिलेंडर स्फोट झाल्यास तब्बल ५० लाखाचा विमा ग्राहकास मिळत असतो. गॅसमुळे झालेल्या दुर्घटनेत जर आर्थिक नुकसान झाले तर त्याच्या मोबदल्यात कंपनीकडून दोन लाख रुपये मिळतातच, गॅस दुर्घटनेत जर दुर्दैवाने कुटुंबातील कुणा सदस्यांचा मृत्यू ओढावलाच तर प्रत्येकी दहा लाख रुपये मदत मिळत असते. विमा किंवा ही मदत मिळविण्याची काही प्रक्रिया असते तेवढी पूर्ण करावी लागते. 

विमा प्राप्त करण्यासाठी झालेल्या दुर्घटनेची माहिती सर्वप्रथम पोलीस ठाण्यात द्यावी लागते. आपल्या गॅस कनेक्शनच्या कंपनीला याबाबत माहिती देणे आवश्यक असते. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआर ची एक प्रत, जखमींवर करण्यात आलेल्या उपचारासंदर्भातील कागदपत्रे, सर्व पावत्या, वैद्यकीय बिल या बाबी जपून ठेवाव्या लागतात, दुर्दैवाने कोणी व्यक्ती दगावला असल्यास त्याचा पोस्ट मार्टेम अहवाल देखील जपून ठेवावा लागतो. हे सगळं केलं की गॅस ग्राहकाला विमा आणि अन्य मदतीच्या रकमा मिळू शकतात. 

गॅस दुर्घटना घडतात पण ग्राहकांना ही माहिती नसते त्यामुळे ते या मदतीपासून वंचित राहतात. गॅस दुर्घटना घडूच नये यासाठी ग्राहकाने सदैव सतर्क असायला हवे असते. कंपनी वेळोवेळी देते त्या सूचनांचं पालन केलं आणि काळजी घेतली तर अशा दुर्घटनापासून दूर राहता येतं. ग्राहकाचा बेफिकीरपणाच अधिक दुर्घटनेत कारणीभूत असल्याचं अनुभवाला येत असतं ! तरीही कधी अशी दुर्घटना घडलीच तर अशी माहिती आपल्याला असणं आवश्यक असतं !           


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !